Michong Cyclone : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. उपसागरात मिचॉन्ग नावाचे वादळ तयार झाल्याने देशात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे भारतीय हवामान खात्याने तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
या वादळाचा आणि हवामान बदलाचा फटका येत्या २४ तासांत महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे. तसंच मागील काही दिवसांत देखील राज्यात अवकाळीच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा राज्यात २४ तासात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मागील आठवड्यात राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाला आहे. यामुळे पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम आता राज्यातही पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात पुढील २४ तासांत विजांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
तापमानात चढ-उतार
राज्यात सध्या ढगाळ आणि पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे राज्यातील तापमानात चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. तर किमान तापमानातील वाढ कायम आहे. रविवारी ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १५.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Published on: 04 December 2023, 10:13 IST