Weather update : देशभरातील तापमानाचा पारा वाढल्याने नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रेमन चक्रीवादळामुळे वातावरणावर त्याचा चांगला परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. याच दरम्यान आंध्र प्रदेशातील गुटूल हवामान खात्याने मान्सूनबाबती मोठी अपडेट दिली आहे. पुढील ५ दिवसांमध्ये मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आयएमडीनं वर्तवली आहे. यामुळे देशात लवकरच आता मान्सून दाखल होणार आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता आता कमी होत आहे. हे वादळ ताशी १५ किमी इतक्या वेगानं उत्तरेकडे पुढे सरकत असून, त्याची तीव्रता आता आणखी कमी होत जाणार आहे. यामुळे या वादळाचे रुपातंर आता कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनला त्याचा फायदा होणार आहे.
मान्सूनला आता पोषक वातावरण तयार झाल्यामुळे मान्सूनची श्रीलंकेतून पुढे चांगलीच आगेकूच होत आहे. यामुळे पुढील ५ दिवसांत मान्सून केरळात दाखल होणार आहे. केरळात दाखल झाल्यानंतर साधारणता ६ ते ७ तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे.
रेमन चक्रीवादळाचा राज्यातील वातावरणावर देखील परिणाम झाला आहे. यामुळे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यासोबतत विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत ढगाळ आकाश असून हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३°C आणि २९°C च्या आसपास असेल. यवतमाळ येथे ४६°C कमाल तापमानाची नोंद झाली. तर धाराशिव येथे २२.६°C हे सर्वात कमी किमान तापमान होते.
Published on: 27 May 2024, 04:32 IST