सध्या राज्याचा पावसाचा विचार केला तर काही ठिकाणी चांगला पाऊस झाला तर काही ठिकाणी अजूनही पावसाने दांडी मारलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात अजूनही पेरण्यांना मुहूर्त लागलेला नाही.
सध्याचा विचार केला तर काही भागात चांगला पाऊस झाला असून मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात रात्रभर पावसाने हजेरी लावली.
गडचिरोली त्यासोबतच चंद्रपूर मध्ये देखील समाधानकारक पाऊस झाला असून काही ठिकाणी पडलेल्या पावसामुळे शेतकरी आनंदी दिसत आहेत. तर काही ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा असून शेतकरी पेरणीसाठी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.
दरम्यान पुढील येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असून पश्चिम महाराष्ट्रात देखील त्यामध्ये प्रामुख्याने घाट विभागांमध्ये काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
झाला दमदार पाऊस तर पेरणीना येईल वेग
चंद्रपूरचा विचार केला तर या ठिकाणी दहा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर चांगला पाऊस पडला आहे.
या पावसामुळे चंद्रपूर करांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असून अचानक झालेल्या या पावसामुळे शहरातील वाहतूक काही काळासाठी विस्कळित झाली होती.
अजूनही चंद्रपूर सहित बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पेरण्या खोळंबल्या असून केवळ पाच टक्केच पाऊस झाल्याने बळीराजाला अजूनही दमदार पावसाची आवश्यकता आहे.
तीन ते चार दिवसात वाढू शकतो पावसाचा जोर
पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून यामुळे येत्या तीन ते चार दिवसात कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पुणे सोबतच पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नक्की वाचा:जून तर गेला कोरडा,जुलै ते सप्टेंबर महिन्यात कसा राहील पाऊस? वाचा हवामान खात्याचा अंदाज
Published on: 30 June 2022, 01:50 IST