छत्रपती संभाजीनगर
ऑगस्ट महिन्याचे १५ दिवस उलटले तरी पावसाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अनेक भागात सरासरी एवढा देखील पाऊस झाला नाही. तुरळक पावसात केलेल्या पेरण्या वाया जातात की काय, अशी काही भागातील शेतकऱ्यांना धास्ती सतावत आहे. काही ठिकाणी पावसाअभावी पेरण्याही झालेल्या नाहीत. पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यात हलका पाऊस होत असल्यामुळे पाणी टंचाईचे संकटही समोर उभे ठाकले आहे.
मराठवाड्यामध्ये अवघा 31.70 टक्के सरासरी पाणीसाठा आतापर्यंत उपलब्ध आहे. त्यात आता पावसाचा फक्त दीड महिना उरला आहे. त्यामुळे पुढील काळात दमदार पाऊस न झाल्यास मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला रिमझिम पावसावरती शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये कपाशी सोयाबीन बाजरी तूर या पिकाची लागवड केली. मात्र या पिकासाठी शेतकऱ्यांनी विविध बँकेकडून तसेच घरातील सोनेतारंन ठेवून बी-बियाणे घेतली आता ही कपाशी जोमात आहे. मात्र पावसाअभावी जळू लागली आहे.
सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस खतावर असताना, अचानक पाऊस गायब झाला आहे. यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला असल्याने, शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. येत्या चार- पाच दिवसात जोरदार पाऊस न पडल्यास शेतातील उभी पिक जळण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये आहे. पावसाची सुरुवात चांगली झालेली असली, तरी काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे, शेती आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. गत वर्षी जुलै महिन्याच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वच चिंतेत पडले आहेत. यंदा रिमझिमशिवाय एखादा अपवाद वगळता जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, औरंगाबाद, खुलताबाद,कन्नड, सोयगाव तालुक्यात दमदार पाऊस झालाच नाही. सुरूवातीला झालेल्या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी लागवड व पेरणी केली. ती वाया जाते की काय, अशी चिंता निर्माण झालेली असतांना रिमझिम स्वरूपात पावसाने हजेरी लावली.
तसेच आता पावसाने हजेरी लावली नाही तर शेतकरयांच्या गुरा ढोरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. पावसाचे आडीच महिने पूर्ण झाले. आता पुढील दीड महिन्यात काय होईल, असा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे. अत्यल्प पावसाने शहरासह ग्रामीण भागातही दैनंदिन होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती असून काही दिवस पावसाने दांडी मारल्यास पाणी पुरवठ्याची स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.
Published on: 17 August 2023, 05:48 IST