Monsoon 2024 Rain Update : शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याने एक आनंदाची बातमी दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान देशात १०६ टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी आज (दि.१५) रोजी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. २०२४ चा पावसाचा हा पहिलाच अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी हवामान खात्याचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा म्हणाले की, हवामानाची स्थिती पाहता यंदा ८ जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मागील वर्ष अल निनोच असल्याने त्याचा परिणाम अजूनही काहीसा आहे. मात्र पावसाळा सुरु झाला की अल निनो संपले. तसंच हवामानातील बदल पाहता अल निनोचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. यामुळे यंदा देशात १०६ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मागील वर्षी पावसाने ओढ दिल्याने नागरिकांना पाण्याचा सामना करावा लागला. परिणामी काही शेतकऱ्यांचे पाण्याअभावी पिकांचे नुकसान देखील झाले. तसंच सध्या देशात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे ८ जूनला मान्सून दाखल झाला तर नागरिकांना पाण्याच्या टंचाई पासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
तसंच हवामान खात्याकडून पावसाच्या विविध पाच श्रेणी जाहीर करण्यात आला आहेत. त्यानुसार पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. तर त्या श्रेणी नेमक्या कशा आहेत. ते पुढीलप्रमाणे :
१) कमी - ९० टक्के
२) सरासरीपेक्षा कमी - ९० ते ९५ टक्के
३) सरासरी इतका - ९६ ते १०४ टक्के
४) सरासरी पेक्षा जास्त - १०४ ते ११० टक्के
५) सरासरी पेक्षा अधिक जास्त - ११० टक्के पेक्षा जास्त
दरम्यान, दरवर्षी एप्रिल महिना आला की सर्वजण आतुरतेने हवामान विभागाकडून येणाऱ्या पावसाच्या अंदाजाची वाट पाहत असतात. सर्वात जास्त आतुरता असते ती म्हणजे शेतकऱ्यांना तर हवामान खात्याने यंदाचा पावसाचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. तर पुढील अंदाज हवामान खात्याकडून मे महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे मे महिन्यात पावसाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
Published on: 15 April 2024, 06:11 IST