मागील दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. अनेक जिल्ह्यात गारपीटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यात अजून दोन दिवस पावसाची स्थिती कायम राहणार आहे असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
या अवकाळी पावसाचा मोठा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसत आहे. तसेच ढगाळ हवामान आणि पावसामुळे काही जिल्ह्यातील तापमानात घट झाली असून थंडीचा जोर वाढत आहे. त्याचबरोबर 1 डिसेंबर दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील हवमानामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागानच्या माहिती नुसार, विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर व वर्धा येथे विजांचा कडकडाटासह वादळी वारे व मुसळधार पावसासहित गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुढील तीन दिवसात किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होवून सकाळी धुके पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
Published on: 28 November 2023, 12:01 IST