राज्यातील तापमानात घट होत असल्यामुळे गुलाबी थंडी सर्वत्र पडली आहे. यामुळे उन्हाच्या चटक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पहाटेच्या वेळी हवेत गारवा निर्माण होत आहे. मात्र राज्यातील तापमानात सध्या चढ उतार होताना दिसत असून राज्याच्या काही भागात येत्या दोन दिवसांमध्ये पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात सकाळी थंडी जाणवत आहे. ऑक्टोबर हिटच्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही काही भागात दुपारी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. तसंच नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी राहण्याचा अंदाजही हवामान खात्याने दिलेला आहे, त्यासोबतच हवामान विभागाने काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे .
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनूसार, येत्या दोन दिवसांत सिंधुदूर्ग जिल्ह्यामधील काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होवु शकतो. तसेच रत्नागिरीमध्ये विजांसह काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. त्याचबरोबर वारे प्रतितास ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे .
Published on: 02 November 2023, 05:45 IST