Pune News : राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. आता अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम देशभरासह राज्यात देखील जाणवू लागला आहे. वातावरण बदलामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे.
राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दक्षिण तामिळनाडूमध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे. गोव्यासह तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. यामुळे राज्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर काही ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे हवामान राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
देशातील हवेची पातळी घसरली आहे. दिल्ली, पुणे आणि मुंबई शहरांत हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुक्याची पांढरी चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. तसंच प्रशासनाने आता काही निर्बंध लावण्यास देखील सुरुवात केली आहे.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या उच्च उंचीच्या भागात नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स प्रवेश केल्याने या भागात पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Published on: 07 November 2023, 10:27 IST