Weather News :
देशाच्या काही भागात चांगला तर काही भागात अजून पावसाची प्रतिक्षा कायम आहे. यातच हवामान खात्याने (IMD) पावसाच्या टक्केवारीची माहिती दिली आहे. हवामान खात्याने १ जून ते आतापर्यंत देशात ९१ टक्के पाऊस झाल्याची माहिती दिली आहे.
दरवर्षी ३० ऑगस्टपर्यंत देशात ६८७ मिमी सर्वसाधारणपणे पाऊस होत असतो. यावर्षी मात्र प्रत्यक्षात ६२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे, असं हवामान खात्याने म्हटले आहे. केरळसह महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
देशात सरासरीच्या ९ टक्के कमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत देशात ९१ टक्के पाऊस झाला आहे. यात केरळ आणि महाराष्ट्रात सर्वांत कमी पाऊस झाला आहे. जूनपासून केरळात आत्तापर्यंत सरासरीच्या ४८ टक्के पावसाची तूट झाली आहे.
मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या २२ टक्के पावसाची तूट आहे. मराठवाड्यात देखील १ जूनपासून सरासरीच्या १९ टक्के पावसाची तूट पाहायला मिळत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
राज्यात एक जून ते २७ ऑगस्ट दरम्यान ७०९.५ मिलिमीटर म्हणजेच सरासरी पेक्षा आठ मिलिमीटर कमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा २१ टक्के कमी पाऊस झाला आहे. तर मराठवाड्यात सरासरीपेक्षा १८ टक्के कमी पाऊस झाला आहे. तर विदर्भात सरासरीपेक्षा ९ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील ७६ तालुक्यांत यंदा पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. तसंच शेती सिंचनासाठी सुद्धा पाणी वापरण्यावर आता बंधने येण्याची शक्यता आहे. कारण तिथं सरासरीच्या केवळ २८ टक्के पाऊस झाला आहे.
Published on: 30 August 2023, 03:30 IST