गेल्या अनेक वर्षांपासून सुलतानी आणि अस्मानी संकटामुळे बळीराजा पुरता बेजार झाला आहे. मात्र 'जो अनहोनी को होनी कर दे' त्याचंच नाव आहे 'शेतकरी' याचाच प्रत्येय समोर आला आहे तो पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून. जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात मौजे आव्हाने गावचे रहिवासी रविराज खैरे यांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. एकीकडे दिवसेंदिवस उत्पादनखर्चात वाढ होत असल्यामुळे शेती करणे खूपच खर्चिक आणि न परवडणारे झाले आहे.
शेती एक जुगार बनला असतानाच रविराज यांचे नेत्रदीपक यश इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देऊन शेती क्षेत्रात यशस्वी बनवण्यासाठी पेटविण्याचे कार्य करणार आहे. रविराज यांनी खरीप हंगामात आपल्या जिरायती वावरात तुर लागवडीचा निर्णय घेतला आणि तुरीच्या पिकातून एकरी 12 क्विंटलचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. योग्य नियोजनाची व अमाप कष्टाची सांगड घालत या अवलिया शेतकऱ्याने ही किमया साधली आहे. कमी क्षेत्रात देखील लाखोंचे उत्पन्न पदरी पाडले जाऊ शकते हे आव्हाने बुद्रुक गावचे रहिवाशी रविराज यांनी दाखवून दिले आहे. रविराज यांनी सिद्धांत सीड्स कंपनीचे BDN 711 या तुरीच्या वाणाची पेरणी केली.
त्यांनी आपल्या दीड एकर वावरात या वाणाची पेरणी केली, तुरीची पेरणी तर केली मात्र त्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागला. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे रविराज यांच्या तुरीच्या पिकाला मोठा फटका बसला होता मात्र आपल्या नेहमीच्या कृषी सेवा केंद्र चालकाच्या सल्ल्याने आणि आपल्या कष्टाच्या जोराने अतिवृष्टीमुळे झालेल्या रोगावर त्यांनी नियंत्रण मिळवले व त्यांच्या तुरीच्या पिकाला संरक्षण दिले. अहोरात्र कष्ट करून रविराज यांनी अवघ्या दीड एकर तुरीच्या पिकातून सुमारे 18 क्विंटल दर्जेदार उत्पादन प्राप्त केले. या खरीप हंगामात अनेक तूर उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे तसेच बदललेल्या वातावरणामुळे मात्र सहा ते सात क्विंटल प्रति एकर एवढेच उत्पादन प्राप्त झाले आहे.
मात्र रविराज याला अपवाद आहेत त्यांनी खरीप हंगामात येऊ घातलेल्या अतिवृष्टीचा सामना करत चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले आहे. शेती क्षेत्रात जर योग्य व्यवस्थापन केले तसेच कष्ट, कष्ट आणि केवळ कष्टचं केले तर काळी आई म्हणून संबोधली जाणारी शेती शेतकऱ्याला यश मिळवूनच देईन याचेच एक उत्तम उदाहरण रविराज सिद्ध झाले आहेत. त्यांच्या या नेत्रदीपक यशाचे परिसरातून तोंड फोडून कौतुक केले जात आहे.
Published on: 01 February 2022, 11:38 IST