सततच्या दुष्काळात होरपळणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकरी आता आधुनिक शेतीचा स्वीकार करत आहेत. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावात ७०० एकरांवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. येथील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीतून आधुनिक क्रांती घडवून आणून आपल्या गावाची आर्थिक गती परत आणली आहे.
रुई हे सध्या इतर गावांसाठी आदर्श गाव आहे. यासंदर्भात न्यूज १८ लोकमतने वृत्त प्रसारित केले आहे. बीड जिल्हा कायम दुष्काळी असून पाऊस वेळेवर पडत नाही. बीड जिल्ह्यात पारंपरिक शेती केली जाते. रुई गावातही पारंपरिक शेती होती. मात्र, अलीकडच्या काळात या गावातील शेतकऱ्यांनी आपले लक्ष पारंपारिक शेतीतून रेशीम शेतीकडे वळवले आणि येथूनच क्रांती झाली.
२०१८ पासून या गावात तुती लागवड सुरू झाली असून सध्या रुई येथे ७०० एकरवर रेशीम शेती फुलत आहे. त्यामुळे गावाची आर्थिक उलाढालही वाढली असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. रुई हे हमालांचे गाव म्हणून ओळखले जात होते. मात्र, आधुनिक काळात हे गाव रोजगार देणारे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
गेल्या काही वर्षांत या गावातील ३०० लोक कामानिमित्त दुसऱ्या गावात जात होते. मात्र, आता गावाबाहेरील २०० मजुरांना या गावात रोजगार मिळाला आहे. उच्च शिक्षण असूनही रोजगार मिळत नाही, त्यामुळे अनेक तरुण निराश आणि असहाय होतात. मात्र, याच गावातील श्रीनाथ भाईगुडे यांनी शिक्षक असूनही रेशीम शेतीचा मार्ग निवडला आहे.
श्रीनाथने जेव्हापासून रेशीम शेतीची निवड केली, तेव्हापासून तो महिन्याला दीड लाख ते दोन लाख रुपये कमावत आहे. बीड जिल्ह्यापासून जवळच असलेल्या जालना जिल्ह्यात रेशीम विक्रीसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे, त्यामुळे आता बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात रेशीम उत्पादनात वाढ होत आहे.
महत्वाच्या बातम्या
केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय, खाद्यतेल होणार स्वस्त
आर्थिक नियोजनाची ही ६ सूत्रे तुमचे भविष्य उज्ज्वल करतील
Published on: 26 May 2022, 11:33 IST