अहमदनगर- वृक्षांच्या सान्निध्यात माणसाचं मन प्रसन्न होते. पाना-फुलांशी जपलेलं नात माणसाचं भावविश्व समृद्ध बनवते. मात्र,सिमेंटच्या जंगलात हिरव्या झाडांची वनराई लुप्त होत असताना हिरवाईशी मैत्री जोपासण्याची अनोखी किमया शहरातील किरण अजित तिवारी यांनी साधली आहे. इमारतीवरील जागेचा पूरेपूर वापर आणि जैविक खतांची सांगड घालून तिवारी यांनी गच्चीवरच बाग फुलवली आहे.
विविध रंगांच्या फुलांपासून ते औषधी वनस्पतींपर्यंत विविध जातींच्या १०० वनस्पतींचा यामध्ये समावेश आहे. हंगामानुसार रोपण, मातीचा शास्त्रीय वापर आणि नियमित निगा या त्रिसूत्रीच्या जोरावर यशस्वीरित्या झाडांचे संगोपन केले आहे. विविध आकाराच्या कुंड्यांची प्रमाणबद्ध मांडणी आणि पाना-फुलांच्या विविध रंगी छटांमुळे गच्चीवरच नंदनवन अवतरल्याचे दृश्य निर्माण झाले आहे.
इमारतीवरील गच्चीसोबतच घराच्या बाहेरील बाजूला असलेल्या झाडांमुळे तिवारी परिवाराने 'हरित इमारत' संकल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे. जणू जैवविविधतेची एक प्रयोगशाळाच तयार झाली आहे.
Published on: 18 September 2021, 09:14 IST