Success Stories

कृषी यांत्रिकीकरण हा शेतीचा अविभाज्य भाग बनला असून शेतातील विविध कामं करीता आता यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. शेतीतील सगळ्याच कामांसाठी आता यंत्रांचा वापर झाल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत झाली आहे. मजूर टंचाईच्या पार्श्वभूमीवर यंत्राचा वापर हा कृषी क्षेत्रासाठी वरदान ठरणारा आहे. यातील जर आपण कीड व रोगांचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता करण्यात येणाऱ्या फवारणीचा विचार केला तर हे खूप कष्टाचे आणि अवघड काम असून मजुरांकरवीच करण्यात येते. तसेच यासाठी वेळ देखील भरपूर वाया जातो.

Updated on 16 August, 2023 10:48 AM IST

कृषी यांत्रिकीकरण हा शेतीचा अविभाज्य भाग बनला असून शेतातील विविध कामं करीता आता यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. शेतीतील सगळ्याच कामांसाठी आता यंत्रांचा वापर झाल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत झाली आहे.

मजूर टंचाईच्या पार्श्वभूमीवर यंत्राचा वापर हा कृषी क्षेत्रासाठी वरदान ठरणारा आहे. यातील जर आपण कीड व रोगांचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता करण्यात येणाऱ्या फवारणीचा विचार केला तर हे खूप कष्टाचे आणि अवघड काम असून मजुरांकरवीच करण्यात येते. तसेच यासाठी वेळ देखील भरपूर वाया जातो.

या दृष्टिकोनातून कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन सारख्या आधुनिक तंत्राचा वापर खूप महत्त्वाचा आहे. अगदी कमीत कमी वेळेमध्ये ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करता येते. याच ड्रोनच्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्यातील चांगतपुरी या गावचे प्रयोगशील युवा शेतकरी दामोदर खेडकर यांनी ड्रोनची खरेदी केली व त्याबरोबर स्वतः आणि इतर लोकांना देखील रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांचीच यशोगाथा आपण पाहणार आहोत.

 दामोदर खेडकर यांची यशोगाथा

 औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चांगतपुरी या गावचे रहीवाशी असलेले युवा शेतकरी दामोदर खेडकर यांनी शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत विविध प्रयोग केले आहेत. यास तंत्रज्ञान विषयी असलेल्या प्रयोगांचा भाग म्हणून  त्यांना ड्रोन विषयी माहिती घेतली व नागपूरच्या एका एजन्सीशी याबाबतीत कॉन्टॅक्ट केला.

त्यानंतर त्यांनी तब्बल चार लाख 75 हजार रुपयांचे ड्रोन विकत घेतले. तसेच या ड्रोनच्या वापराला आवश्यक असलेल्या दोन बॅटरी त्यांनी विकत घेतल्या. तसे पाहायला गेले तर एका एकरची फवारणी करिता एकाच बॅटरीच्या चार्जमध्ये ती शक्य होते. परंतु जेव्हा जास्त क्षेत्राची फवारणी करायची असते तेव्हा दोन किंवा तीन बॅटरी असल्या तर समस्या निर्माण होत नाही.

त्यामुळे त्यांनी 65 हजार रुपये खर्च करून दोन जास्तीच्या बॅटऱ्या देखील घेतल्या. ड्रोनच्या माध्यमातून एक एकर ऊसाला फवारणी करणे देखील शक्य झाले असून ती फक्त दहा ते पंधरा मिनिटात होते असे देखील त्यांनी सांगितले. तसेच कपाशीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर वाढ झालेल्या कपाशीमध्ये फवारणी करणे खूप अवघड व धोक्याचे काम असल्यामुळे अशा कपाशीमध्ये ड्रोनचा वापर करून जर फवारणी केली तर एका एकर करिता दहा ते बारा लिटर पाण्यात फवारणी होते.

 वेळेची झाली बचत आणि रोजगार देखील मिळाला

 ड्रोनच्या माध्यमातून अवघ्या 15 मिनिटांमध्ये एक एकर क्षेत्राचे फवारणी करता येते. जर साधारणपणे आजच्या मजुरीचा दर पाहिला तर एका एकर करिता 400 ते पाचशे रुपये इतका खर्च येतो. साधारणपणे याच रेटमध्ये म्हणजेच पाचशे ते सहाशे रुपये प्रति एकर याप्रमाणे खेडकर हे ड्रोनच्या सहाय्याने इतर शेतकऱ्यांची शेतीमध्ये देखील फवारणी करून देतात.

याकरिता त्यांनी त्यांच्या गावातील एका तरुणाला ड्रोन चालवण्याचे ट्रेनिंग थेट कंपनीच्या माध्यमातून दिले असल्यामुळे त्या तरुणाला देखील एकरी शंभर रुपये हिशोबाने ड्रोन पायलट म्हणून रोजगार मिळाला आहे. अशा पद्धतीने या युवा शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची जोड शेतीला देत शेतीत देखील फवारणीचा खर्च वाचवला आणि स्वतःसाठी रोजगार देखील निर्माण केला आहे.

English Summary: This young farmer is creating employment through drones
Published on: 16 August 2023, 10:48 IST