देशात बदलत्या काळानुसार शेती क्षेत्रात मोठा अमुलाग्र बदल घडून आला. या बदलांमुळे काही सकारात्मक तर काही नकारात्मक बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. देशातील प्रगत शेतकरी बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासून शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल करत उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केलेत. उत्पादनवाढीच्या अनुषंगाने देशातील तमाम शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा सर्रासपणे वापर सुरू केला, अद्यापही देशात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर सुरूच आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे तात्पुरता उत्पादन वाढीत फायदा झाला मात्र त्याचा दूरगामी तोटा शेतकरी बांधवांच्या लक्षातच आला नाही.
आता अनेक शेतकरी बांधवांना रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापराचे नुकसान लक्षात येत आहे. रासायनिक खतांच्या अंदाधुंद वापरामुळे जमिनीचा दर्जा खालावला गेला आहे परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की, अनेक शेतकऱ्यांची सुपीक शेतजमीन आता नापीक होऊ लागली आहे. धरणी आईला पुन्हा संजीवनी देण्यासाठी, पुन्हा बळीराजाची सोन्यासारखी शेतजमीन सुपीक बनवण्यासाठी मराठवाड्यातील एका अवलिया शेतकरी पुत्राने एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. बीड मधील अमरनाथ अंदुरे या अवलिया शेतकऱ्यांने सेंद्रिय शेतीचे महत्व ओळखून गांडूळ प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पाचा उपयोग केवळ बीड जिल्ह्यासाठी, मराठवाड्यासाठी, राज्यासाठी किंवा देशासाठी होत आहे असे नाही तर याचा उपयोग विदेशी शेतकरी बांधवांसाठी देखील होत आहे. सेंद्रिय शेतीची कास धरून गत सहा वर्षापासून सेंद्रिय शेतीबाबत संशोधन कार्य बीड मधील नेचर ॲग्रोटेक येथे होत आहे. सेंद्रिय शेतीसाठी अहोरात्र काबाडकष्ट करणारा अवलिया शेतकरी अमरनाथ यांनी हा प्रकल्प उभारला आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात मौजे पारनेर येथे सजवलेल्या या प्रकल्पातून देशभरातील नव्हे नव्हे तर विदेशातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे धडे दिले जात आहेत. सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत एक उपयुक्त जैविक खत म्हणुन संबोधले जाते. गांडूळ खतांची दिवसेंदिवस वाढणारी मागणी लक्षात घेता अमरनाथ यांनी पारनेरला नेचर ॲग्रोटेक नावाचा गांडूळ प्रकल्प कार्यान्वित केला. आपल्या या कंपनीद्वारे अमरनाथ यांनी संपूर्ण देशात तसेच विदेशात देखील गांडूळ खत व गांडुळाची निर्यात केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमरनाथ यांनी उमान या देशात आठ लाख किमतीचे चार टन गांडूळ रवाना केले.
अमरनाथ यांनी मौजे पारनेर स्थित आपल्या शेतात उभारलेल्या गांडूळखत प्रकल्पात सहा वर्मी बेंड आहेत. यामध्ये तयार होणारे कंपोस्ट खत ते आपल्या शेतात वापरात आणतात तसेच परिसरात विक्रीदेखील करतात. या प्रकल्पात त्यांची आई आणि त्यांचे बंधू दोघेजण कार्य करत असतात. अमरनाथ यांची अर्धांगिनी त्यांना खतांच्या आणि गांडूळांच्या विक्रीसाठी मदत करत असते. परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे गांडूळ खत उपलब्ध होत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीचा अवलंब केला जात आहे. अमरनाथ हे उच्चविद्याविभूषित आहेत आपल्या शिक्षणाचा उपयोग त्यांनी शेती क्षेत्रात यथायोग्य केल्याचे त्यांच्या या प्रयोगातून सिद्ध होते. अमरनाथ यांचा हा खताचा व्यवसाय आता फक्त स्थानिक शेतकऱ्यांना पुरता मर्यादित राहिला नसून आता त्यांची खतेही विदेशात देखील निर्यात होत आहेत.
अमरनाथ यांच्या मते, या प्रकल्पातून प्राप्त होणारेखत गांडूळ तसेच वर्मी बेड विक्रीतून महिन्याकाठी पाच लाख रुपयांची कमाई करतात. अमरनाथ यांच्या प्रकल्पात आजूबाजूच्या अनेक गरजूंना रोजगार देखील मिळाला आहे. एकंदरीत अमरनाथ यांचा हा प्रकल्प शेती क्षेत्रात एक नवीन क्रांती घडवीत आहे आणि हा नेचर ॲग्रोटेक प्रकल्प सेंद्रिय शेतीची पायाभरणी करण्यासाठी एक मोलाचा दगड सिद्ध होऊ शकतो.
Published on: 31 January 2022, 11:57 IST