राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात खानदेश मध्ये विदर्भात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड बघायला मिळते. राज्यातील नाशिक जिल्ह्याचा कांदा हा विशेष प्रसिद्ध आहे मात्र या नाशिकच्या कांद्याची लागवड फक्त पश्चिम महाराष्ट्रातच बघायला मिळते. नाशिक जिल्ह्यात उत्पादित केल्या जाणाऱ्या कांद्याला मोठी मागणी असते. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी या कांदा पिकातून चांगली मोठी कमाई करताना दिसतात. विदर्भातील अमरावती मध्ये कांदा लागवड केली जाते मात्र येथील कांदा हा रब्बी हंगामात लावला जातो, आणि या भागात उत्पादित केला जाणारा पांढरा कांदा शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा नफा मिळवून देत नाही. अनेकदा विदर्भात लावला जाणारा हा कांदा ऐन काढणीच्या वेळी नैसर्गिक संकटात सापडतो आणि त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
या वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे अमरावती जिल्ह्यातील एका आदर्श शेतकऱ्याने एक नवीन प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. आणि त्यामुळे या शेतकऱ्याला मोठा फायदा देखील मिळाला आहे. जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी या तालुक्यातील मौजे कापुसतळणी येथे वास्तव्यास असलेले राजेश मळसने यांनी परिसरात पिकवला जाणारा पांढरा कांदा ऐवजी नाशिक चा लाल कांदा आपल्या वावरात लावला. खरीप हंगामात लागवड केलेल्या या लाल कांद्यापासून राजेश यांना चांगला फायदा मिळाला आहे.
राजेश यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात खरीप हंगामात नाशिकच्या लाल कांद्याची लागवड केली, त्यांनी कांद्याच्या पिकासाठी संपूर्ण सेंद्रिय खताचा वापर केला. त्यामुळे राजेश यांना लागवडीसाठी कमी खर्च करावा लागला. राजेश यांनी शेणखत गोमूत्र इत्यादी सेंद्रिय खतांचा वापर करून कांदा पिकवला. राजेश यांनी लावलेल्या कांद्याचे योग्य ते व्यवस्थापन करून यातून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त केले. राजेश यांनी कांदा लागवडीसाठी विशेष नाशिकहुन दर्जेदार बियाणे उपलब्ध करून घेतले, कांदा लागवड केल्यानंतर योग्य नियोजन करून चांगल्या सेंद्रिय खताचा वापर करून, योग्य वेळी संतुलित प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करून अवघ्या एक एकर क्षेत्रात 90 क्विंटल कांद्याचे उत्पादन प्राप्त केले. राजेश यांनी दावा केला की अमरावती जिल्ह्यात नाशिकच्या लाल कांद्याचे उत्पादन घेणारे ते पहिले शेतकरी आहेत.
कांदा उत्पादक शेतकरी राजेश यांच्या मते त्यांना एक एकर कांदा लागवडीसाठी सुमारे 50 हजार रुपये खर्च आला आणि त्यांना या एवढ्याशा क्षेत्रातून जवळपास 90 क्विंटल उत्पादन मिळाले. त्यांना एक लाख 53 हजार रुपयांचे उत्पन्न कांदा पिकातून प्राप्त झाले. खर्च वजा जाता राजेश यांना एक एकर क्षेत्रातून एक लाख रुपयांची कमाई झाली. त्यांच्या यशाचे परिसरात मोठे कौतुक केले जात आहे. तसेच यामुळे इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत असल्याचे देखील सांगितले जात आहे.
Published on: 07 January 2022, 10:02 IST