या जगात अशक्य असे काहीच नाही मग ते कुठलंही क्षेत्र असो. जर त्या क्षेत्रात केवळ परिश्रम परिश्रम आणि परिश्रमच केले तर 100% यश संपादन केले जाऊ शकते. शेती क्षेत्रात देखील अगदी तसेच काहीसं आहे. जर शेतकरी बांधवांनी शर्तीने कष्टाची पराकाष्टा केली आणि योग्य नियोजन आखले तर शेतीमधून लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते.
याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते उस्मानाबाद जिल्ह्यातून. जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्याच्या मौजे माळुंब्रा येथील नवयुवक शेतकरी राजकुमार तात्या वडणे दुसऱ्याच्या वावरात फवारणी साठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर वर ड्रायव्हर म्हणून काम करीत स्वतःच्या 40 गुंठे क्षेत्रात द्राक्ष लागवड करून पहिल्याच वेळेला 24 टन द्राक्षाचे उत्पादन घेतले आहे. राजकुमार यांनी शेतीक्षेत्रात प्राप्त केलेले यश तरुण शेतकऱ्यांसाठी विशेष आदर्श ठरीत आहे.
द्राक्ष ओरिसामध्ये विक्रीसाठी- गेल्या आठ वर्षांपासून राजकुमार दुसऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर वर ड्रायव्हर म्हणून कार्य करीत होते. राजकुमार जास्त वेळ फवारणी मारण्याचे कार्य करीत असल्याने त्यांना द्राक्ष साठी आवश्यक असणाऱ्या फवारणीची आणि औषधंची गहन माहिती झाली होती.
याचाच उपयोग करीत व महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे येथील संचालक महादेव वडणे यांच्या सल्ल्याने द्राक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने राजकुमार यांनी 40 गुंठे क्षेत्रावर माणिकचमन या जातीच्या द्राक्षांची लागवड केली. 40 गुंठे क्षेत्रात सुमारे अकराशे रोपांची लागवड करण्यात आली. या द्राक्षाच्या बागेतून त्यांना पहिल्याच वर्षी 24 टन दर्जेदार उत्पादन प्राप्त झाले. विशेष म्हणजे द्राक्षांची खरेदी त्यांच्या बांधावरच झाली आणि 34 रुपये प्रति किलो एवढा दर मिळाला. म्हणजेच त्यांना यातून साडेअकरा लाख रुपये उत्पादन प्राप्त झाले. राजकुमार यांनी उत्पादित केलेला द्राक्ष विक्रीसाठी ओरिसा राज्यात गेला असल्याचे सांगितले जात आहे.
दुसऱ्याच्या शेतात मजुरी करूनही प्राप्त केले दर्जेदार उत्पादन- अगदी लहानपणापासून राजकुमार दुसऱ्याच्या शेतात शेतमजूर म्हणून कार्य करीत होते. विशेष म्हणजे स्वतःच्या शेतात द्राक्ष लागवड झाल्यानंतरही राजकुमार दुसऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर वर फवारणी साठी जात असे. दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून देखील राजकुमार यांनी आपली द्राक्ष बाग चांगल्या पद्धतीने जोपासली आणि त्यातून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले. राजकुमार यांनी प्राप्त केलेल्या या दर्जेदार उत्पादनामुळे पंचक्रोशीत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे, यामुळे अनेक युवक शेतीसाठी प्रोत्साहित होतील असे देखील सांगितले जात आहे.
Published on: 05 March 2022, 06:49 IST