शेतकरी बांधवांनी जर पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत नगदी पिकांची लागवड केली तर कमी क्षेत्रात देखील लाख रुपयांचे उत्पन्न अर्जित केले जाऊ शकते. याचेच एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातून. तालुक्याच्या मौजे बारूळ येथील रहिवासी उच्चशिक्षित तरुणाने अवघ्या 20 गुंठे क्षेत्रात स्पायसी या जातीच्या मिरचीची लागवड करून तब्बल तीन लाखांचे उत्पन्न पदरी पाडले आहे. या उच्चशिक्षित तरुणाने लागवड केलेल्या या मिरचीची सध्या काढणी प्रगतीपथावर आहे, आणि खुल्या बाजारपेठेत मिरचीला चांगला समाधानकारक बाजार भाव मिळत असल्याने या तरुणाच्या भुवया उंचावल्या आहेत.
या उच्चशिक्षित तरुणाने आपल्या शिक्षणाचा योग्य तो वापर करून आणि आधुनिकतेची कास धरून मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन प्रणालीचा यथायोग्य वापर करीत लाखो रुपयांचे उत्पन्न अर्जित केले आहे. मौजे बारूळ येथील शिवकांत इंगळे या उच्चशिक्षित नवयुवक शेतकऱ्यांने आधुनिक पद्धतीने स्पायसी या जातीच्या मिरचीची लागवड करून हे नेत्रदिपक यश मिळविले असल्याचे सांगितले जात आहे. या युवकाने मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून आपल्या वीस गुंठे क्षेत्रात स्पायसी या जातीच्या मिरचीची लागवड केली, त्याने बेड बनवून मिरचीची लागवड केली होती आतापर्यंत त्याने लागवड केलेल्या मिरचीतून सुमारे अडीच लाखांचे उत्पन्न त्याच्या पदरात पडले आहे सध्या बाजारपेठेत मिरचीला चांगला भाव मिळत आहे आणि त्याच्या वावरात अजूनही मिरची उपलब्ध असल्याने कमाईत अजून वाढ होऊ शकते असा त्यांचा अंदाज आहे.
हा उच्चशिक्षित नवयुवक शेतकरी नांदेड या जिल्ह्याच्या ठिकाणी एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करत होता. मात्र नोकरीतून प्राप्त होणारे तुटपुंजी मानधन आणि नोकरी करतांना मन रमत नसल्याने त्याने गावाकडे येऊन शेती करण्याचा निर्धार केला. त्या अनुषंगाने त्याने शेतीचा व्यवस्थित अभ्यास केला आणि स्पायसी या जातीच्या मिरचीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्याने केवळ 20 गुंठे क्षेत्रात अडीच हजार मिरचीच्या रोपांची लागवड केली, यासाठी त्याने आधुनिक पद्धतीचा अवलंब केला. त्याने मिरची पिकासाठी ठिबक सिंचन प्रणाली व मल्चिंग पेपरचा वापर केला. एवढेच नाही तर त्यांनी विद्राव्य सेंद्रिय खतांचा वापर करून मिरची चांगली वाढवली आणि त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले.
आतापर्यंत या युवा शेतकऱ्याने अडीच लाखांचे उत्पन्न प्राप्त केले आहे आणि अजून वावरात 70 क्विंटल मिरचीचे उत्पादन शिल्लक असल्याचा त्यांचा अंदाज आहे त्यामुळे त्याला 20 गुंठे क्षेत्रात तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते असे सांगितले जात आहे. या युवकाचा हा आधुनिक शेतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग परिसरात मोठ्या चर्चेचा विषय आहे अनेक शेतकरी आगामी काही दिवसात मिरचीची लागवड करतील असे चित्र परिसरात बघायला मिळत आहे.
Published on: 23 February 2022, 06:28 IST