राज्यात सर्वत्र कांद्याचे यशस्वी उत्पादन घेतले जाते महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादनात देशात शीर्षस्थानी काबीज आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रमध्ये व मराठवाड्यात कांद्याचे यशस्वी उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र कांद्याची लागवड नजरेस पडते विदर्भात व कोकणात देखील कांदा लावला जातो. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आपल्या कष्टाच्या जोरावर यशस्वी उत्पादन प्राप्त करतात. मराठवाड्यात देखील एका शेतकऱ्याने आपल्या कष्टाच्या जोरावर अवघ्या वीस गुंठे क्षेत्रात लावलेल्या कांदा पिकातून नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामधील औसा तालुक्यातील बेलकुंड गावाचे रहिवासी शेतकरी शरद नवनाथ हलकरे यांनी अवघ्या वीस गुंठे क्षेत्रात विक्रमी एक लाख रुपयांचे उत्पन्न अर्जित केले आहे. कांद्याचे सुधारित बियाणे, योग्य खत व्यवस्थापन, योग्य पाणी व्यवस्थापन या सर्व गोष्टींची सुयोग्य सांगड घालून शरद यांनी हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे. शरद यांना 20 गुंठे कांदा लागवडीसाठी सुमारे पंधरा हजार रुपये उत्पादन खर्च आला आहे म्हणजे अवघ्या वीस गुंठे क्षेत्रात 85 हजार रुपयांचा निव्वळ नफा शरद यांना प्राप्त झाला आहे. शरद यांच्याकडे मात्र 80 गुंठे शेतजमीन आहे अल्पभूधारक शेतकरी असतानादेखील त्यांचे नेत्रदीपक यश सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का देत आहे. शरद सांगतात की त्यांच्या यशामध्ये कृषी तज्ञांचा मोठा वाटा आहे, कृषी तज्ञांच्या सल्ल्यानेच त्यांना नेत्रदीपक यश प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
शरद यांनी ऑक्टोबर महिन्यात कांदा लागवडीचे नियोजन आखले त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या वीस गुंठे क्षेत्रावर कांद्याची लागवड केली, सुयोग्य पाणी व्यवस्थापन करून, कृषी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन त्यांचे कांदा पिक व्यवस्थित पोसले गेले. शरद यांनी अवघ्या वीस गुंठे क्षेत्रात पाच क्विंटल कांदा उत्पादित केला, त्यांनी आपला कांदा सोलापूर बाजार समिती मध्ये विक्री केला व तेथे त्यांना 2300 रुपये प्रति क्विंटल दराने बाजार भाव प्राप्त झाला. अशा रीतीने त्यांना अवघ्या वीस गुंठे क्षेत्रातून एक लाख रुपयांची कमाई झाली. 20 गुंठे क्षेत्रात कांदा लागवडीसाठी शरद यांना बियाण्यासाठी दोन हजार रुपये खर्च आला, कांदा लागवडीसाठी आणि काढण्यासाठी दहा हजार रुपये खर्च आला तसेच फवारणी साठी त्यांना तीन हजार रुपये खर्च आला असल्याचे सांगितले जात आहे, असा एकंदरीत त्यांना पंधरा हजार रुपये खर्च 20 गुंठे कांदा पिकासाठी आला.
उत्पादन खर्च वजा जाता त्यांना तब्बल 85 हजार रुपये प्राप्त झाले. अल्पभूधारक शेतकरी देखील आपल्या मेहनतीला योग्य नियोजनाची सांगड घालून चांगल्या सदन शेतकऱ्याला मात देऊ शकतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कष्टाचे सार्थक तेव्हाच होऊ शकते जेव्हा त्याच्या सोन्यासारख्या शेतमालाला अपेक्षित भाव प्राप्त होईल. मात्र असे असले तरी शरद यांचे हे नेत्रदीपक यश इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श सिद्ध होत आहे.
Published on: 17 January 2022, 11:10 IST