आज अनेक नवयुवकांचा शेती म्हणजे केवळ आणि केवळ काबाडकष्ट आणि कष्टांची पराकाष्टा करून देखील तोट्यातला व्यवसाय असाच समज आहे. मात्र, शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड मिळाली तर शेतकरी अल्प कालावधीतच लखपती होतो याचा प्रत्यय समोर आला आहे तो उस्मानाबाद जिल्ह्यातून. उस्मानाबाद तालुक्यातील मौजे वाघोली येथील सतीश खडके यांनी शेतीला दुग्धव्यवसायाची सांगड घातली आणि लाखो रुपयांची उलाढाल करण्यास सुरुवात केली.
सतीश यांनी दुग्धव्यवसाय हा पूरक व्यवसाय म्हणून सुरू केला खरी मात्र, याच व्यवसायालाप्राथमिक व्यवसायाचा दर्जा द्यायचा अशी मनाशी खूणगाठ बांधली. त्यांनी होलस्टिन फ्रिजीयन या विदेशी गाईचे संगोपन करण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी सहा होल्स्टिन फ्रिजियन गाईंची खरेदी केली. सतीश यांनी आपल्या जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर चार वर्षे अथक परिश्रम करून दुग्ध व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे. सध्या सतीश यांना या व्यवसायातून दीड लाखांची कमाई होत आहे. फक्त शेती क्षेत्रावर अवलंबून राहिल्यास आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवता येऊ शकतो, याव्यतिरिक्त चार पैसे शिल्लक पाडण्यासाठी शेती समवेतच शेतीपूरक व्यवसाय करणे काळाची गरज बनली आहे. हीच बाब मौजे वाघोली येथील सतीश यांनी हेरून घेतली, आणि त्या अनुषंगाने त्यांनी हौलण्ड देशाच्या होलस्टिन फ्रिजीयन गाईचे संगोपन करण्याचे ठरवले.
त्यांनी पंजाब मधील लुधियानातुन या जातीच्या सहा गाई आणल्या यासाठी त्यांना तब्बल सहा लाख रुपये खर्च झाला या व्यतिरिक्त गाईंना शेड उभारण्यासाठी त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत खर्च आला एकंदरीत आठ लाख रुपयात त्यांनी आपला दुग्ध व्यवसाय उभारला. सुरवातीचे चार वर्ष अथक परिश्रम करून देखील सतीश यांना होणारा खर्च आणि उत्पादन यामध्ये सांगड घालता आली नाही, असे असले तरी स्वभावात जिद्द आणि चिकाटीपणा असल्याने तोटा सहन करत सतीश यांनी चार वर्षे हा व्यवसाय सुरूच ठेवला, आणि मग अखेर तो सोन्याचा दिवस उजाडला ज्या दिवशी सतीश सक्सेसफुल ठरलेत. हो आज तब्बल चार वर्षांनंतर का होईना सतीश दुग्ध व्यवसायात यशस्वी वाटचाल करीत आहेत.
सतीश यांच्या मते, गाईचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी त्यांच्या खुराकावर व्यवस्थित लक्ष घालणे गरजेचे असते. त्यांनीदेखील गाईंच्या आहारावर विशेष लक्ष ठेवले आणि त्यांना सकस आहार देऊ केला. गाईंच्या आहारासाठी सतीश महिन्याला 50 हजार रुपयांचा खर्च करत असतात. सतीश यांच्या गाईच्या दुधाला गावातच बाजार मिळाला आहे, त्यांच्या गावातच डेअरी असल्याने त्यांचा वाहतुकीचा खर्च वाचला आहे. शिवाय त्यांच्या गाईंच्या दुधाला 28 रुपये प्रतिलिटर पर्यंत भाव मिळत असतो. त्यामुळे सतीश वर्षाकाठी गाईच्या दुधातुन आणि शेणखतातून लाखो रुपयांची उलाढाल करतात. सतीश यांच्या मते त्यांना वार्षिक आठ लाख रुपये निव्वळ नफा मिळत आहे.
Published on: 04 March 2022, 12:10 IST