यशस्वी होण्यासाठी फक्त शिक्षण आवश्यक असते असे नाही तर यासाठी कठोर मेहनत आणि जिज्ञासु वृत्ती असणे आवश्यक असते. असेच एक उत्तम उदाहरण समोर आले आहे औरंगाबाद जिल्ह्यात, जिल्ह्यातील कुंभपेळ येथील रहिवासी शेतकरी अनिल गोजे यांनी शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू करून चांगले मोठे यश संपादन केले आहे. अनिल गोजे यांनी द्राक्षापासून वाईन निर्मिती करण्याची कंपनी सुरू केली आहे. त्यांनी आपल्या कंपनीला कुंभ वाईनरी असे नाव दिले आहे.
अनिल गोजे यांनी कुंभपेळ येथील जिल्हा परिषद शाळेत आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले व गावातच दहावीपर्यंतचे शिक्षण केले मात्र त्यांना दहावीत यश संपादन करता आले नाही व ते दहावी नापास झाले. त्यांची वडिलोपार्जित पंधरा एकर शेतजमीन आहे म्हणुन नापास झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ शेती करण्याचा निर्धार केला. डाळिंब, पेरू आणि सिताफळ या फळबाग पिकांची अनिल शेती करू लागले. शेती समवेतच अनिल यांनी प्रिंटिंगचा देखील व्यवसाय सुरू केला, तसेच हायड्रोजन क्रेन आणि जेसीबी विकत घेतली. यासोबतच अनिल यांनी ट्रॅक्टर चालवीण्याचे देखील काम केले. एवढेच नाही तर आपल्या शेतात उत्पादित होणाऱ्या फळांची त्यांनी स्वतः स्टॉल मांडून विक्रीदेखील केली.
अनिल नेहमी कामानिमित्त नाशिकच्या दौऱ्यावर असायचे, त्यामुळे नाशिक मधील द्राक्षाच्या बागा त्यांना चांगल्याच भावल्या, त्यांनी तेथील द्राक्ष बागायतदारांच्या भेटीगाठी घेतल्या त्यांच्याशी द्राक्ष बागेविषयी चर्चा केली. हे सर्व करत असताना त्यांना एक गोष्टीची जाणीव झाली ती म्हणजे, नाशिकमध्ये द्राक्ष बागायतदार फळप्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात करत आहेत. ते बघूनच त्यांना देखील फळप्रक्रिया उद्योगात पदार्पण करण्याची इच्छा झाली. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नाशिक जिल्ह्यात असे अनेक द्राक्षबागायतदार आहेत जे स्वतः आपल्या द्राक्षांपासून वाईन ची निर्मिती करतात आणि त्यातून चांगला मोठा नफा कमवितात. हीच गोष्ट लक्षात घेऊन अनिल यांनी द्राक्ष पासून वाईन उत्पादित करण्याचे ठरवले. त्यांनी यासाठी नाशिक येथील वाईन उत्पादित करणाऱ्या द्राक्ष बागायतदाराकडून व्यवसायातील बारकावे देखील समजुन घेतले.
अनिल गोजे यांनी 2020 मध्ये आपली कंपनी रजिस्टर केली. कुंभपेळ येथे स्वताची जागा असल्यामुळे त्यांनी आपल्या स्वतःच्या जागेवर कंपनी साठी लागणाऱ्या शेडची बांधणी केली. त्यानंतर वाईन निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी केली आणि द्राक्षे पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक नगरीतून द्राक्ष मागवले. व वाईन निर्मितीला प्रारंभ केला. अनिल गोजे सांगतात की, भविष्यात डाळिंब पेरू पासून त्यांना वाईन निर्मिती करायची आहे व त्या दृष्टीने ते प्रयत्न करणार आहेत.
Published on: 18 January 2022, 02:18 IST