मित्रांनो भारतात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची शेती केली जाते. राज्यात देखील टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड बघायला मिळते. सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची मोठी चांदी होत आहे.
कारण की, सध्या टोमॅटोचे भाव आकाशाला गवसणी घालत आहेत. किरकोळ बाजारात तर टोमॅटोच्या दराने चक्क शंभरी पार केली आहे. यामुळे टोमॅटोची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याची सध्या लॉटरी लागली असल्याचे सांगितले जातं आहे.
मित्रांनो राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी बांधव टोमॅटोच्या शेतीतुन चांगली जंगी कमाई करत असतात. बारामती तालुक्यातील मौजे सस्तेवाडी येथील युवा शेतकरी गणेश कदम यांनी देखील यंदा टोमॅटोची लागवड केली होती.
विशेष म्हणजे गणेश यांनी लागवड केलेल्या टोमॅटो पिकाला यंदा चांगला बहर देखील आला अन अपेक्षित असा दर देखील मिळाला यामुळे या पट्ठ्याने अवघ्या 4 महिन्यांत टोमॅटोच्या उत्पादनातून 18 लाखांची तगडी कमाई देखील केली आहे. त्यामुळे पंचक्रोशीत गणेश यांची मोठी चर्चा रंगली असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
पूर्वी गणेश आपल्या 12 एकरात भाजीपाला पिकवायचे. मात्र, यंदा गणेश यांनी थोडासा बदल केला अन आपल्या 12 एकर क्षेत्रापैकी दहा एकरात भाजीपाला लागवड केली अन उर्वरित दोन एकरात त्यांनी टोमॅटोची लागवड केली.
किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ
खरं पाहता ज्यावेळी टोमॅटो लागवड केली त्यावेळी गणेश वातावरणातील बदल आणि इतर कारणांमुळे मोठे चिंतेत होते. मात्र टोमॅटो काढणीच्या वेळी बाजारभाव वाढल्याने चिंतातूर गणेश यांनी सुटकेचा मोकळा श्वास सोडला आणि गणेश यांना टोमॅटो पिकातून चांगला नफा मिळाला. सध्या बारामतीच्या किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव 100 रुपये किलो आहे. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये हाच दर 130 रुपयांवर पोहोचला आहे.
बाजारपेठेत टोमॅटोला चांगला भाव मिळतं असल्याने गणेश यांनी चालून आलेली संधी साधण्याचा निर्णय घेतला. आणि मग काय गणेश कदम यांनी आपले टोमॅटो राज्यात न विकता गोव्यातील म्हापसा मार्केटमध्ये पाठवण्याचे ठरवले. गोव्याच्या बाजारपेठेत त्यांना पुणे-मुंबईच्या तुलनेत कॅरेटमागे 200 ते 250 रुपयांनी अधिक दर मिळाला.
दोन एकर लागवडीसाठी 4 लाखांचा केला खर्च
मित्रांनो गणेश यांना दोन एकर क्षेत्रात टोमॅटो लागवड करण्यासाठी आतापर्यंत सुमारे चार लाख रुपये खर्च आला आहे. यामध्ये लागवड, स्टेजिंग, मल्चिंग पेपर आणि औषध फवारणी अशा खर्चांचा समावेश आहे.
चार लाख रुपये खर्च केल्यानंतर त्यांना आतापर्यंत 18 लाखांचा नफा झाला आहे. टोमॅटो अजूनही एक महिना विकले जाणार आहेत. त्यामुळे गणेश कदम यांना आणखी चार ते पाच लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे. निश्चितचं गणेश यांना मिळालेले हे यश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारे आहे.
Published on: 09 June 2022, 10:08 IST