कर्जत तालुक्यातील नेटकेवाडी येथील विशाल अंबर भोसले हा विद्यार्थी सदगुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव या ठिकाणी शिक्षण घेत आहे. मात्र शिक्षण घेत असतानाच त्याने ४० गुंठे क्षेत्रामध्ये पेरूचे झाडे लावून पंधरा लाख रुपये उत्पादन घेत शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळसदृश परिस्थिती, अपूर्ण पाणी यासह सातत्याने विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. पारंपरिक शेती, व पारंपारिक पीक पद्धती याच पद्धतीने शेतकरी पिढ्यानपिढ्या शेती करत आहे.
पारंपरिक पद्धतीला फाटा.
बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडे पीक चांगले आले, तर त्याला भाव मिळत नाही. भाव असेल तर पीक नाही आणि सर्व काही सुरळीत असेल, तर अतिवृष्टी, किंवा दुष्काळाचा फटका ठरलेला. मात्र, सर्व पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत कृषी महाविद्यालय मध्ये शिक्षण घेणाऱ्या विशाल भोसले यांनी तालुक्यातील नेटकेवाडी येथील त्याच्या स्वतःच्या शेतीमध्ये तैवान जातीची पेरूची ४० गुंठे क्षेत्रामध्ये झाडे लावली. आणि त्यांनी कृषी महाविद्यालयामध्ये ज्या पद्धतीची शिक्षण घेतले,
त्या ज्ञानाचा वापर करून आधुनिक पद्धतीने या पेरूच्या झाडांची लागवडीपासून सर्व शास्त्रीय पद्धतीचा वापर केला.
अनेकांकडून कौतुक.
आपल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर केल्यामुळे अवघ्या कमी क्षेत्रामध्ये या विद्यार्थ्याने तब्बल पंधरा लाख रुपयांचे उत्पादन घेतले. त्याच्या या वाटचालीमध्ये त्याचे वडील अंबर भोसले यांनी त्याला मोलाची साथ दिली, व तो राबवत असलेल्या या प्रकल्पाला त्यांनी त्याला पाठिंबा दिला. विशाल भोसले त्याने लावलेली पेरूची बाग पाहण्यासाठी कृषी महाविद्यालयातील त्याची सर्व शिक्षक, याप्रमाणे सद्गुरु उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव नेवसे यांच्यासह अनेकांनी भेट देऊन त्याचे कौतुक केले.
सर्व विद्यार्थ्यांनी व शेतकऱ्यांनी देखील विशालचा आदर्श घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करावी असे आवाहन केले आहे.
Published on: 28 December 2021, 03:04 IST