1. यशोगाथा

कल्पनेची कहाणी

माहेरची चंदन सर्जेराव जगताप, वडील सर्जेराव जगताप हाडाचे शिक्षक, आई यमुनाबाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा, तीन बहिणी आणि पाच भावंडे असा हा मोठा परिवार शुक्रवार पेठेत राहत होता. सर्व भावंडे हुशार, व कर्तबगार चंदन आणि वडील बंधू रामराव यांच्यात दोनच वर्षांचे अंतर म्हणून एकाच वर्गात शिकत व महाविद्यालयातून बी.एस.सी. करून एस.एन.डी.टी. मधून समाजकार्याचा डिप्लोमा झाला.

KJ Staff
KJ Staff


माहेरची चंदन सर्जेराव जगताप, वडील सर्जेराव जगताप हाडाचे शिक्षक, आई यमुनाबाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा, तीन बहिणी आणि पाच भावंडे असा हा मोठा परिवार शुक्रवार पेठेत राहत होता. सर्व भावंडे हुशार, व कर्तबगार चंदन आणि वडील बंधू रामराव यांच्यात दोनच वर्षांचे अंतर म्हणून एकाच वर्गात शिकत व महाविद्यालयातून बी.एस.सी. करून एस.एन.डी.टी. मधून समाजकार्याचा डिप्लोमा झाला. शिवणकाम, बागकाम, सामाजिक कार्याची पहिल्यापासूनच आवड होती. जगताप कुटुंब नंतर फेअर रोड वरील प्रशस्त मोठया बंगल्यात राहत होते. वडील सर्जेराव पुरंदरमधील कोथळयाचे तर आईचे माहेर वाघापूरचे. घरातले वातावरण पुरोगामी, आधुनिक होते.

विलासरावांचे मूळ गाव सांगली जिल्हयातील रांजणी. वडील लष्करी सेवेत सुभेदार 1947-48 मध्ये निवृत्त झाले. पाच भावंडे आणि दोन बहिणी. आई द्रौपदीबाई मोठया धीराच्या आणि कष्टाळू. शालेय शिक्षण सोलापूर बेळगाव सांगलीमध्ये खडतर परिस्थितीत झाले. विलासराव पुण्यातील इंजिनीअरींग कॉलेजमधून इलेक्ट्रीकल इंजिनीअर झाले. विलासरावांनी 1964 मध्ये पुण्यात मोटर रिवाइडिंगचे छोटे वर्कशॉप सुरू केले. नंतर हडपसर औदयोगिक वसाहतीत जागा घेतली आणि तेथे अ‍ॅक्युरेट इंजिनीअरींगचा कारभार सुरू झाला.

तरूण, कर्तबगार, सत्शील विलासराव हे माधवराव पवारांच्या नजरेत भरले. त्यांनी आपल्या पत्नीच्या बहिणीसाठी चंदन जगतापसाठी हे स्थळ सुचविले. विलासराव चंदन यांनी परस्परांना पाहिल्यावर, भेटल्यावर त्यांच्या पसंतीने विवाह निश्‍चित झाला. लोकमान्यनगरमधील सदनिकेत वैवाहिक जीवनाला सुरूवात झाली. विवाहानंतर कल्पनाताईंनी पहिलं काम हाती घेतलं ते पतीच्या व्यसनमुक्तीचं. वर्षभरातच विलासरावांचं धूम्रपाान सुटले ते कायमचेच नंतर अ‍ॅक्युरेट कंपनीजवळील सेंट पॅट्रीकमध्ये प्रशस्त बंगला भाडयाने घेऊन संसार बहरला. तीन मुलांचे संगोपन, बागकाम, आलेल्या पाहुण्यांची उठबस, सासू सासरे, परिवार असे 1972 पर्यंत चालले होते.

1972 च्या दुष्काळात कल्पनाताईंनीच विलासरावांना कोथळे या पुरंदर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात फराळाचे वाटप करण्यासाठी नेले. दुष्काळाचे हे भयानक चित्र पाहून सुटाबुटात वावरणारे विलासराव अंतर्मुख झाले आणि पुढे त्यांचे सारे आयुष्यच बदलले. इथून पुढे सुरू झाला पाण्याचा ध्यास, दुष्काळाचा अभ्यास. त्यांचे वैवाहिक आयुष्यच बदलून गेले.


पुण्यातील तरूण उदयोजक स्वत:चा उत्तम चालणारा कारखााना, सर्व सुखसोयी असलेला बंगला, एैश्‍वर्य सोडून पत्नी व तीन मुलांसह वय वर्षे सात, पाच, दोन नायगावसारख्या दुष्काळी खेडयात येऊन राहतो. 1974 मध्ये नायगावच्या उजाड, निकस, खडकाळ दगडगोटयांच्या 40 एकर जमिनीवर प्रयत्नांची शिकस्त करून जलसंधारण, चराईबंदी, वनीकरण, पिक नियोजन असे सारे उपाय करून जमिनीचा कायाकल्प होतो. तीन हजार झाडांचे जंगल, ज्वारी, बाजरी, हरभरा, भुईमूग, सीताफळ, 40 गायी असा नायगावचा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राच्या दुष्काळाला प्रत्यक्ष कृतीतून, अभ्यासातून, लोकसहभातून शोधलेले अचूक असे उत्तर म्हणजे नायगाव पॅटर्न.

हाच नायगाव पॅटर्न पुढे अनेक गावांमध्ये राबविण्यात आला. पुढार्‍यांना दाखविण्यात आला. आय.ए.एस. अधिकार्‍यांना समजविण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर याची दखल घेण्यात आली. स्विडीश सरकारने ’International Inventors Award Water’ या विषयातील पुरस्कार दिला. नंतर भारतातही ‘जमनालाल बजाज’ पुरस्कार मिळाला. ‘पाणी पंचायत’ संकल्पना चंद्राबाबूंनी आंध्रप्रदेशमध्ये राबविली. ओरीसा, गुजरातमध्येही प्रयोग सफल झाले. आण्णा हजारे, पोपटराव पवार यांनी येथूनच प्रेरणा घेतली.

विलासरावांनी यापुढील सारे जीवन पाण्यासाठी, दारिद्रयरेषेखालील शेतकर्‍यांसाठी वाहून घेतले. अ‍ॅक्युरेट कंपनीही तितक्याच धडाडीने वाढविली आणि या सर्वात अर्धा वाटा म्हणजे त्यांना कल्पनाताईंची सक्षम साथ होती. संसार, मुले, नातेसंबंध, सासू-सासरे, घराचे बांधकाम, कंपनीची जबाबदारी सारे काही कल्पनाताईंनी समर्थपणे पेलले. कधी कंपनीच्या कामात विलासराव व्यग्र असताना कल्पनाताईंनी नायगाव प्रकल्प कार्यवाहीही तितक्याच समर्थपणे झेलली. सकाळी डबा करून एसटीने सासवडला जाणे. दिवसभर काम करून संध्याकाळी तितक्याच उत्साहाने मुलांचे संगोपन करणे अशा नानाविविध जबाबदार्‍या विनातक्रार पार पाडल्या. ग्राम गौरव प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेची स्थापना झाली. पुण्यातील उदयोजक शंतनुराव किर्लोस्कर, हासीमलजी फिरोदीया, एस. के. खांडेकर, मा. मुख्यमंत्री शरदचंद्र पवार, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील इ. राजकीय नेते, जे.पी. आणि चित्रा नाईक, ना.ग.गोरे, एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान, असे सामाजिक कार्यकर्ते नायगाव पॅटर्न  अभ्यासक विदयार्थी यांच्या प्रकल्पास सतत भेटी देत असत. त्या सगळयांची उठबस करण्यात कल्पनाताईंचा दिवस कसा संपत होता हे त्यांचे त्यांनाच समजत नव्हते. वैचारिक नेतृत्व विलासरावांकडे आणि कार्यवाही, अंमलबजावणी कल्पनाताईंकडे अशी कामाची विभागणी होती.

1982 मध्ये पाणी पंचायतीच्या 22 योजनांना विज मिळत नव्हती. कार्यकर्त्यांनी 2-3 वर्षे पाठपुरावा करूनही प्रतिसाद नव्हता. यासाठी सत्याग्रह करावा लागला. विलासराव, कल्पनाताई आणि कार्यकर्ते बेमुदत उपोषणाला बसले आणि त्यासाठी तुरूंगवासही भोगला. अ‍ॅक्युरेटच्या उत्पादनासाठी लागणारे सुटे भाग बनविण्यासाठी अहिल्या उद्योग हा कारखाना सूरू झाला. कल्पनाताईंनी अपार मेहनत करून कारखान्याची खळदला उभारणी केली. त्यासाठीच्या भांडवल उभारणीसाठी आपले दागिनेही गहाण ठेवले.

विलासराव व कल्पनाताई हे सहप्रवासी होते. जमेल तेव्हा एकत्र प्रवास आणि कामाविषयी  चर्चा करीत असत कल्पनाताईंनी विलासरावांसोबत युरोपचा दौरा केला. इस्त्राईलचे पाणी व्यवस्थापन पाहण्यासाठी स्वतंत्रपणे पण प्रवास केला. अमेरीकेतील श्री. ब्राझील हे प्रोफेसर नायगाव पॅटर्नसाठी विदयार्थ्यांकडून वर्गणी घेऊन आले आणि घनिष्ठ मित्र झाले. पुढे कित्येक वर्ष दर डिसेंबर महिन्यात त्यांचा मुक्काम पुण्यातील घरी असे. पू. ल. देशपांडे व निळूभाऊ फुले ही मंडळी नायगावला भेट देऊन गेली. हडपसरला घरी असले की विलासरावांची कल्पनाताईंची चर्चा व्हायची ती पुरंदर तालुक्यातील दुष्काळ, पाणी तुटवडा, शेती असल्याच विषयांवर कल्पानाताईंना स्वत:ला सामाजिक कार्याची आवड पतीच्या व्यग्रतेविषयी नाराजी नव्हती 1980 मध्ये नागपूरला हिवाळी अधिवेशनाच्यावेळी दोघे पाण्याची दिंडी घेऊन गेले जाताना वाटेत विनोबा व बाबा आमटेंची भेट घेतली 1993 मध्ये अमरावती जवळील महादापूर या अदिवासी गावात विलासरावांचा वर्षभर मुक्काम होता. कल्पनाताई तेथेही जाऊन राहील्या. यानंतरचा काळ विविध ठिकाणी व्याख्याने चर्चा यात गेला. विलासरावांचे वाचन, चिंतन व प्रवास चालूच राहीले. पुढे सेंद्रीय शेती याविषयावर काम सूरू झाले. चिकोत्रा प्रकल्पाचेही काम सूरू झाले. अजूनही श्री. आनंदराव पाटील, कल्पनाताई, श्री. विजय परांजपे हे सर्वजण समन्यायी पाणी हक्क परिषदेद्वारे चिकोत्राच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर काम करीत आहेत. 23 एप्रिल 2002 रोजी विलासरावांचा स्वर्गवास झाला.


याच दरम्यान वीणाताई गवाणकर यांनी विलासरावांचे चरित्र लिहिण्याचा मानस केला आणि त्यांना लागणार्‍या सर्व साहित्याची जुळवाजुळव, अनेकांबरोबर गाठीभेटी याची जबाबदारी कल्पनाताईंनीच घेतली इतक्या वेगाने घडलेल्या घटनांची, सहजीवनाची ही उजळणीच झाली. ‘भगिरथाचे वारस’ हे विलासरावांचे चरित्र पहिल्या स्मृतीदिनी प्रकाशित झाले. पाणी क्षेत्रात काम करणार्‍या सर्वांसाठी आणि ग्रामीण युवकांसाठी प्रेरणादायी असे हे संग्राहय पुस्तक आहे.

कल्पनाताई आजही त्याच जोमाने कार्यरत आहेत. त्यानंतर आदिवासी भागात घरकुल योजना, पोंढे गावाचा संपूर्ण ग्राउंडवॉटर सर्व्हे व सामुदायिक जलसिंचन योजना सर दोराबजी ट्रस्टच्या सहकार्याने 10 गावांचा ग्राउंडवॉटर सर्व्हे इ. अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबविले. ‘महाराष्ट्राच्या जलसंपत्तीचे नियोजन’ या पुस्तकाची  नवीन सुधारणांसह आवृत्ती प्रकाशित झाली आहे.

सध्या संस्थेमार्फत राबविण्यात येणार्‍या सेंद्रीय शेती अभ्यासगटात संपूर्ण महाराष्ट्रातून 100 हून अधिक शेतकरी सहभागी होत असून अनेक शेतकर्‍यांना याचा लाभ होत आहे. 2012 मध्ये महाराष्ट्रात पुन्हा दुष्काळाची छाया होती. खळद परिसरातील पंचक्रोशीच्या गावांमध्ये ग्राम गौरव प्रतिष्ठान संस्थेने स्थानिक लोकसहभाग आणि शहरातील मदत यातून अनेक योजना राबविल्या आणि कुंभारवळण सारखे गाव टंँकरमुक्त झाले. ‘पाणी पंचायत’ संकल्पना राबविणे पाणलोटक्षेत्र विकास हाच ग्रामीण उत्कर्षाचा मंत्र आहे. हे पुन्हा सिध्द करून दाखविले कल्पनाताई अजुनही गावांना भेटी देणे लोकांचे प्रश्‍न समजावून घेणे, योजनांच्या कार्यवाहीचा आराखडा तयार करतात.

खळद येथील पाणी पंचायतच्या प्रशिक्षण केंद्राच्या 10 एकर परिसरातील शेतात त्या सतत प्रयोगशील असतात. नुकताच त्यांनी केलेला प्रयोग म्हणजे संपूर्ण सेंद्रीय पध्दतीने उत्तमरित्या तुरीचे उत्पन्न घेतले. पंचक्रोशीतील शेतकरीही ही तूर पाहून आश्‍चर्यचकित झाले. विलासरावांचे खळद येथील शेतकरी विकास प्रशिक्षण केंद्र्राचे स्वप्न कल्पनाताईंनी आज पुर्ण केले. आज येथे शेतकर्‍यांसाठी, शाळकरी मुलांसाठी, महिलांसाठी शेती, पाणी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण या विषयांवर प्रशिक्षणे घेतली जातात. आजही त्या प्रयोगशिल शेतकर्‍यांना भेटी देतात. पोंढे गावात शेतीला पाणी आल्यावर प्रथमच तेथील धनगर समाजातील शेतकर्‍यांनी शेती केली आणि ही योजना आणणार्‍या कल्पनाताई म्हणजे दैवतच बनल्या.

पाणी प्रश्‍नासाठी विलासराव व कल्पनाताईंनी आयुष्य वेचले अचूक उत्तरेही शोधली महाराष्ट्रातील राजकीय उदासीनता, ऊसासारख्या पिकांना राजाश्रय, शेतमालाला हमीभाव नसणे या महत्वाच्या मानवनिर्मित अडचणी आहेत महाराष्ट्रातील पाणी टंचाई ही निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे. आतातरी आपण आपल्या मातेचे शोषण थांबवावे अशी कळकळीची विनंती कल्पनाताई करतात. गावातील पाण्याचा ताळेबंद, वनीकरण, जलसंधारण, मृदासंंधारण, वृक्ष लागवड या सर्व उपक्रमांमध्ये त्यांची कन्या डॉ. सोनाली शिंदे, श्री. प्रशांत बोरावके आणि पाणी पंचायतीचे कार्यकर्ते त्यांना मदत करतात. ग्रामीण भागात काम करणारी ही संस्था 43 वर्षे पूर्ण करीत आहे.

मातीत हात घालून काम करणे कल्पनाताईंना मनापासून आवडते. आजही त्याच उत्साहाने त्या शिबीरार्थिंना स्वत:च्या हाताने जेवण बनवून वाढताात. गुणी लेक, आदर्श सहचारिणी, उत्तम माता, प्रेमळ भगिनी, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका त्यांनी उत्तमरित्या सांभाळल्या खुप दमछाक झाली बरेचदा, अतिप्रवासाने मानदुखी झाली, कधी गाजर गवताची अ‍ॅलर्जी पण तरीही कल्पनाताई समाधानी आहेत, आशावादी आहेत.

मागच्याच वर्षी मा. राजेंद्र सिंहजींनी खळदला भेट दिली. कल्पनाताई आणि सहकार्यांनी ‘कर्‍हा संवर्धन अभियान’ या माध्यमातून 35 गावांचा पाणलोटक्षेत्र विकास करण्याचा संकल्प केला आहे. खळदला पहाटे लवकर उठून शेतात काम करणार्‍या कल्पनाताई आजही तुमची हसतमुखाने स्वागत करतील आणि त्यांच्या हातची चवीष्ट भाजी-भाकरीही तुम्हाला चाखता येईल. कार्यकारी विश्‍वस्त म्हणून त्या पूर्णवेळ ग्राम गौरव प्रतिष्ठानचे काम पाहतात. योगाभ्यास, वाचन, प्रवास यात त्या रमतात.

पंच्याहत्तरीतील सुती साडीतील सडसडीत कल्पनाताईंच्या चेहर्‍यावर आपल्याला त्यांची पराकोटीची सहनशीलता जाणवल्यावाचून राहत नाही. पाणी पंचायतीच्या कामात सक्रिय सहभाग घेण्यासाठी www.panipanchayat.org व www.aarogyabhumi.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्यावी.

लेखक:
डॉ. सोनाली शिंदे
(कार्यकारी विश्वस्थ, ग्रामगौरव प्रतिष्ठान) 
खळद, ता. पुरंदर, जि. पुणे

English Summary: Story of Kalpanatai Salunkhe Published on: 16 July 2019, 03:26 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters