Capcicum Chili :- शेतीमध्ये विविध तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची लागवड आणि व्यवस्थापन केले तर नक्कीच उत्पादन भरघोस मिळतेच यामध्ये शंकाच नाही. परंतु जर या भरघोस उत्पादनाला जर चांगल्या बाजारभावाची साथ मिळाली तर नक्कीच शेतकरी आर्थिक प्रगती करू शकतात. तसेच शेतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करण्याकरिता अनेक बाबींना योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्यात येते.
अशा योजनांचा फायदा घेऊन देखील शेतकरी अनेक प्रकारचे शेतीला सुलभ ठरतील अशा सोयी शेतीमध्ये करतात व या माध्यमातून उत्पादनात वाढ करतात. असेच सरकारी अनुदानाचा फायदा घेऊन पैठण तालुक्यातील हर्षी या गावचे कृष्णा आगळे यांनी शेडनेट उभारून यामध्ये शिमला मिरचीची लागवड केली व भरघोस उत्पादन घेऊन लाखोत नफा देखील मिळवला. याच शेतकऱ्याची यशकथा आपण या लेखात बघणार आहोत.
शिमला मिरचीतून पाच लाखांचा नफा
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पैठण तालुक्यातील हर्षी या गावचे कृष्णा आगळे यांनी शेडनेटमध्ये जानेवारी महिन्यामध्ये शिमला मिरचीची लागवड केली होती. शेडनेटमध्ये योग्य वातावरणाचे संतुलन ठेवून लागवडीनंतर दोन महिन्यामध्ये मिरचीचे उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला त्यांनी पुणे आणि मुंबई या ठिकाणी मिरचीची विक्री केली व गुजरात राज्यातील सुरत पर्यंत त्यांनी मिरची विक्रीसाठी पोहोचवली.
त्यानंतर बऱ्याचदा व्यापाऱ्यानी बांधावर येऊन मिरचीची खरेदी करत होते. या सगळ्या बाबीतून त्यांनी सव्वा पाच लाखांचा नफा सात महिन्याच्या आत मिळवला. त्यांच्याकडे एकूण नऊ एकर शेती असून यामधून मागच्या वर्षी अनुदानावर त्यांनी एक एकर क्षेत्रावर शेडनेट उभारले. या शेडनेटमध्ये त्यांनी 19 जानेवारीला शिमला मिरचीची लागवड केली.
या मिरचीच्या व्यवस्थापनामध्ये मजुरांऐवजी त्यांना घरच्यांची मदत झाली. या शेडनेट उभारण्यासाठी त्यांनी नानाजी देशमुख कृषी सहाय्य योजना म्हणजेच पोखरा या योजनेतून 18.15 लाख रुपयांचे अनुदान मिळवले आणि स्वतःचा चार लाखाचा खर्च केला. असे 22 लाख रुपये खर्च करून त्यांनी शेडनेट उभारले. विशेष म्हणजे एका एकर क्षेत्रामध्ये त्यांना नऊ एकर क्षेत्रापेक्षा जास्त उत्पादन मिळाले.
त्यांच्या मते मोकळ्या क्षेत्रापेक्षा शेडनेट मध्ये जर शेती केली तर खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. बाहेर तापमान जास्त असल्यामुळे मिरचीचे पिक घेता येत नाह.परंतु शेडनेटमध्ये मिरची पीक खूप चांगले आणि दर्जेदार निघते. तसेच मालाचा दर्जा हा उत्तम असल्यामुळे त्याची विक्री देखील चांगल्या पद्धतीने करता येते.
जर आपण कृष्णा आगळे यांच्या शिक्षणाचा विचार केला तर ते कला शाखेत पदवीधर असून त्यांनी या शेतीमध्ये दोन गुंठ्यात नर्सरी देखील सुरू केली असून यामध्ये दोन लाख रोपे विक्रीतून सव्वा सहा लाख रुपयांचा नफा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
Published on: 08 August 2023, 08:48 IST