आपल्या कृषि प्रधान देशात अनेक प्रकारचे पिकांचे वाण उपलब्ध आहेत. परंतु हरितक्रांती नंतर देशात संकरित (हायब्रीड) बियाणांचा पुरवठा मोठया प्रमाणात होऊ लागला, भरमसाठ उत्पादनामुळे शेतकरी हायब्रीड बियाणांकडे वळले. आणि पारंपारिक, गावरान वाणांच्या वापराकडे, जतनाकडे दुर्लक्ष झाले. अशा पारंपारिक आणि गावरान वाणांचे जतन “सीडमदर” राहीबाई करत आहे. राहीबाई या निरक्षर असून, ज्ञानाने समृद्ध आहेत त्यांच्या विषयी आज आपण जाणून घेऊया.
विविध क्षेत्रात काम करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या जगातल्या १०० महिलांची यादी दरवर्षी बीबीसी प्रसिध्द करते. २०१८ हे वर्ष “जागतिक स्त्री हक्क” वर्ष म्हणून साजर केल्याची औचित्य साधत बीबीसी च्या यादीत समाविष्ट झालेल्या १०० महिला नवप्रवर्तनाच्या निदर्शक आहेत या यादीत राहीबाई ७६ व्या स्थानावर आहेत. बीबीसी च्या प्रेरणादायी महिलांच्या जागतिक यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांनी आंतरिक ओढ, असमाधान आणि उद्वेगाच्या उद्रेगातून भोवतालच्या जगात मुलभूत बदल घडविले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील “कोंभाळणे” या खेडेगावातील राहीबाई पोपेरे या जगाच्या पटलावर सीड मदर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. जेष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात राहिबाईंचा उल्लेख “मदर ऑफ सीड” असा केला होता. आदिवासी समाजाच्या राहीबाई निरक्षर आहेत, पण निसर्गाच्या शाळेत त्या खूप काही शिकल्या. लहानपणापासून त्यांना बियाणे जमविण्याचा छंद होता. राहीबाईंच्या वडिलांकडून त्यांना हे ज्ञान मिळाले त्यांचे वडील नेहमी म्हणायचे “जून ते सोन” त्याचा अर्थ राहीबाईंनी चांगला समजून घेतला. राहीबाईंच्या आजूबाजूच्या परिसरातील बहुतांश शेतकरी आजही पारंपारिक देशी वाणाचे बियाणे वापरूनच शेती करतात. सुरुवातीच्या काळात राहीबाईंना हे काम करताना अनेकांनी वेड्यात काढलं. राहीबाई हे काम पूर्वी छंद म्हणून करायच्या. सुरुवातीला अनेक लोकांकडून त्यांना अनेक प्रकारची बोलणी ऐकावी लागली पण त्यांनी मार्ग सोडला नाही. पारंपारिक पद्धतीने त्या बियाणे गोळा करायच्या, शेतात त्याचा वापर करायच्या.
बायफ या संस्थेच्या मार्गदर्शन व सहकार्याने अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी या गावरान बियाणांच्या प्रसार व प्रचाराचे कार्य केले. पुढे त्यांच्या या कार्याला एक दिशा मिळाली त्यांनी गावरान बियाणांची बँक सुरु केली. कळसूबाई परिसरातील पारंपारिक बियाणे गोळा केले आणि गावरान बियाणांचा मोठा संग्रह करून सीडबँक सुरु केली. त्यांच्या बँकेत सफेद वांग, हिरव वांग, सफेद तूर, टोमॅटो, घेवडा, वाल, उडीद, हरभरा, हुलगा, बाजरी, गहू, नागली, तीळ, भुईमुग, सूर्यफुल, जवस, भात, राळा, नाचणी, रायभात, वरंगल, अनेक प्रकारच्या रानभाज्या अनेक प्रकारच्या पिकांची वाण आहेत.
त्यांच्या घराभोवती असणाऱ्या अडीच तीन एकर परिसरात विविध प्रकारची चारशे-पाचशे झाडे आज उभी आहेत. त्यांचे घर म्हणजे एक प्रकारच संशोधनाचे केंद्र आहे. प्रत्येक बियाण्याची माहिती त्यांना तोंडपाठ आहे, ते बियाणे औषधी आहे का? त्याचा उपयोग काय, त्याची वैशिष्ट्ये त्यांना मुखोतगत आहे. त्यांच्या कडील उपलब्ध असलेल्या सर्व पिकांच्या वाणांची खडानखडा माहिती त्यांना आहे. त्या म्हणतात देशी वाणांच धान्य हे केवळ पावसाच्या पाण्यावर येते या बियाण्याला कोणतेही रासायनिक खत व पाणी देण्याची आवश्यकता नाही. राहीबाईंच्या बियाणे बँकेतील बियाणे आज राज्याच्या विविध भागात पोहोचले आहेत. राहीबाई म्हणजे बियाण्यांचा चालता बोलता ज्ञानकोशच.
पारंपारीक गावरान वाणांची बियाणे बँक “बायफ” या सेवाभावी संस्थेच्या मदतीने सुरु केलेल्या या बँकेमार्फत आतापर्यंत हजारो गरजू शेतकऱ्यांना गावरान देशी वाणांचा पुरवठा केलेला आहे. त्यांच्याकडे सुमारे ५३ पिकांचे ११४ गावरान वाण शास्रशुद्ध पद्धतीने जतन करण्यात आलेले आहेत. गावरान बियाणे संवर्धन प्रचार व प्रसार यामध्ये केलेल्या भरीव कार्यासाठी यापूर्वी त्यांना कृषी विभागाने आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत या पुरस्काराने त्यांचे काम जगाच्या पटलावर अधिक ठळकपणे आले आहे यात शंका नाही. नुकताच त्यांना सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
राहीबाईच्या बियाणे बँक साठी साकारले चिरेबंदी घर
अत्यंत दुर्मिळ, पारंपारिक गावरान वाणांच्या बियाण्यांचे जतन करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील अकोले तालुक्यातील सीडमदर राहीबाई यांच्या मातीकुडाच्या छपरातील “जनुक कोष” साठी हक्काचे ब्रिटीशकालीन विश्रामगृहासारखे पण मध्यभागी दगडी चौक आवार असलेले पारंपारिक वाड्यासारखे चिरेबंदी घर साकारले आहे. साबरमती आश्रमाच्या धर्तीवर दगडी चिऱ्याचे चौमाळी, मंगलोरी, कौलारु पक्के घर अकोले तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. हे घर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे. राही मावशी यांच्या बियाणे बँकेसाठी या भागात पडणारा पाऊस, वारा यांच्या अनुषंगाने पर्यावरणपूरक घराचा आराखडा तयार करून घर साकारण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातून दगडी चिरे आणून बांधकाम केले गेले आहे. घरात शेणाने सारवलेल्या भूईची बियाणे बँक, अभ्यागत कक्ष, पुरस्कारासाठी स्वतंत्र दालन, बियाणे प्रदर्शनाची खोली, स्वयंपाकघर, बैठक हॉल अशी रचना आहे.
सध्याच्या काळात शेतमालातील सदोषतेणे माणसाला कर्करोगासारखे अनेक निरनिराळे आजार होत आहेत, यावर बरीच चर्चा सुरु आहे. या परिस्थितीतही एक गोष्ट मान्य करावी लागते ती म्हणजे आपल्या अन्नाची, म्हणजे अगदी फळे, भाज्या, अन्नधान्य यांची जी चव पूर्वी होती ती कुठेतरी गमावली आहे. याचे कारण संकरीत बियाणे हे आहे या बियाण्याचे काही फायदे आहेत ते नाकारून चालणार नाहीत पण आधीच्या बियाणांची साठवण, जतनही तितकच महत्वाच आहे. जैविविधतेसाठी आदिवासी भागांमध्ये काही लोक असे बियाणे जतन करून ठेवतात. राहीबाई पोपेरे यांचे या क्षेत्रातील काम अजोड असेच म्हणावे लागेल. राहीबाईंच्या या कामातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्याकडे असलेल्या उपलब्ध साधनांचा शेतीला उपकारक ठरेल असा प्रयत्न करावयास हवा. जागतिक महिला दिनाच्या सर्वाना शुभेच्छा.
लेखक:
डॉ. आदिनाथ ताकटे
प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
9404032389
Published on: 08 March 2019, 08:39 IST