नमस्कार,
द्राक्ष बागायतदार बंधुंनो,
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 3 महिन्यांतील 90 दिवसांपैकी 80 ते 85 दिवस तरी पावसाचा सामना करीत आलो आहोत. राज्यातील द्राक्ष उत्पादक जेव्हढा काही भाग आहे, त्यात नाशिक, सांगली, नारायणगाव, इंदापूर या सर्व परिसरांमध्ये आपण पावसाळी वातावरण बघत आहोत आणि अतिशय अतीवृष्टी म्हणता येईल अशा मोठ्या प्रमाणात हा पाऊस पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि खास करुन द्राक्ष उत्पादक पट्ट्यामध्ये आपण पाहिला. मागच्या 10 वर्षांचा आढावा घेतला तर 2009 मधील फयान वादळापासून ते आता 2019 पर्यंत दरवर्षी सातत्याने आपण नवनवीन आपत्तींना तोंड देत आहोत. त्यातले 2 वर्षे दुष्काळी पाहिलेत. त्यानंतर 3 वर्षे अतीवृष्टीचे पाहिलेत. नंतरचे 2 वर्षे गारपीट अन अवकाळी पावसाचे अनुभवले आहेत. अशा समस्या दरवर्षी येत आहेत. त्या कमी म्हणून की काय 2 वर्षे आपण मार्केटच्या समस्यांचीही पाहिली आहेत. समस्येशिवाय असं एकही वर्ष गेलं नाही. त्यातूनही आपण टिकाव धरुन आहोत. एकेक पाऊल पुढे टाकत आहोत. प्रगती करीत करीत चाललो आहोत.
मला वाटतं या सगळ्या अनुभवातून आजच्या परिस्थितीत एक गोष्ट आपण समजून घ्यायला हवी की संकटं येणं ही गोष्ट आपल्या द्राक्षशेतीचा एक भागच आहेत आणि अशा संकटांना आपण पुरुन उरलो आहोत. यावर्षीच्या संकटाला सुद्धा आपण पुरुन उरु, यात मला वैयक्तिक तरी काही शंका वाटत नाही. आपल्या सर्व द्राक्ष उत्पादकांच्या जिद्दीचे आणि त्यांच्या एकंदर कणखर मानसिकतेची आपण खूपवेळा परीक्षा दिली आहे. खूप वेळा आपण सगळ्या इंडस्ट्रीला असेल किंवा इतर शेतकऱ्यांनाही दाखवून दिले आहे की महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदार कधीच निराश होवून हारु शकत नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी जी काही आव्हानं आपल्या समोर येताहेत, ती मुख्यत्वे नैसर्गिक आपत्तीचीच आव्हानं येताहेत. त्यांना पुरुन उरायचं असेल. तर काही तरी स्ट्रॅटेजीवाईज किंवा शास्त्रीय पद्धतीनेच त्याला तोंड द्यावे लागणार आहे. पावसाच्या ज्या काही घटना आपण पाहिल्यात, त्या थेट क्लायमेटचेंजचे परिणाम दाखवणाऱ्या आहेत. सगळं जगभर असं घडतंय. कुठंतरी धो धो पाऊस पडणं. कमी कालावधीत जास्त पाऊस पडणं. कुठंतरी ड्राय स्पॅन येणं. या अशा सगळ्या घटना यापुढील काळातही घडत राहणार आहेत. त्यामुळं या समस्येला तोंड देण्यासाठी आपल्याला शास्त्राचाच पर्याय उपलब्ध आहे. शास्त्रीय पध्दतीने याकडे पाहणे. हे सगळं नीट समजून घेणे. हाच यातून पुढे जाण्याचा मार्ग राहणार आहे.
यातून एक महत्वाचा मुद्दा प्रकर्षाने आता समोर येतोय, की ज्या पारंपारिक व्हरायटी आपण लावत आहोत. या बदलत्या वातावरणाला तोंड देण्यातली या व्हरायट्यांची ताकद कमी पडतांना दिसत आहे. आपल्याकडील थॉम्पसन किंवा थॉम्पसनचे जे काही म्युटेशन्स असतील. ब्लॅक असो की रेडमधील फ्लेम सारखी व्हरायटी असो. या व्हरायट्या या अशा वातावरणात टिकाव धरु शकत नाही. हे असे एकप्रकारे सिध्द झालेले आहे. आपल्याला अशा व्हरायटीज हव्या आहेत की ज्या अशा प्रतिकूल वातावरणातलाही सक्षमपणे तोंड देऊ शकतील. पाऊस पडला तरी फुलोऱ्याच्या काळात फुलोरा गळून पडणार नाही किंवा तिचा फ्रुटफूलनेस तिचा एकदम स्ट्रॉंग असेल. घड निघतांना चांगल्या पध्दतीने निघतील. पाऊस पडला तरी घड जिरणार नाहीत किंवा माल तयार झाला तरी पाऊस झाला तरी त्यात क्रॅकींग होणार नाही. अशी काही अंगभूत ताकद असलेल्या व्हरायट्यांकडे आपल्याला बघावे लागणार आहे. याचा आता खरोखर गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.
जसं आपण पाहिलं की, नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव या अर्ली हंगामाच्या पट्ट्यात मागील 3 महिन्यांपासूनच्या पावसाने उपलब्ध सर्व व्हरायटी क्रॅक झाल्यात. या सर्व व्हरायट्यांचे नुकसान झालेले दिसते. त्यातही तुलनात्मक अभ्यास केला असता 'क्रिमसन' या व्हरायटींमध्ये सर्वात कमी नुकसान आहे. अगदी फुलोऱ्याच्या अवस्थेत क्रिमसनच्या बागा असतांनाही त्यातील फार मोजक्या बागांना अत्यल्प प्रमाणात फटका बसला आहे. हा निश्चितपणे व्हरायटीचाच गुणधर्म आहे. जसं की आरा-15 ही जी व्हरायटी आहे, तिच्यात खूप चांगल्या प्रमाणात फ्रुटफूलनेस आढळून आला आहे. त्यामुळे जरी काही प्रमाणात घड जिरले तरी पूर्ण क्षमतेच्या उत्पादनासाठी जेव्हढे घड अपेक्षित आहेत तेव्हढे घड या वातावरणातही मिळताहेत. समजा नाही उत्पादन मिळाले तरी परत एकदा रिकट करुन, रिप्रुनिंग करुन पुन्हा एकदा घड घेऊ शकतो. यामुळे हंगाम फारतर 2 महिने लांबणीवर जातील. मात्र पूर्ण हंगाम काही वाया जाणार नाही.
अशा प्रतिकूल वातावरणाशी लढतांना अशा प्रकारची व्हरायट्यांची ताकद हे आपल्याकडील महत्वाचे हत्यार असणार आहे. या शिवाय पिकविम्याचे चांगल्या प्रकारे संरक्षण मिळणे हा एक दुसरा मार्ग या परिस्थितीत आहे. यातून चांगल्या प्रकारे सोल्यूशन मिळणं गरजेचं आहे. आपण मागील 5-6 वर्षांपासून विम्या संदर्भात चर्चा करीत आहोत. मात्र यावर अजूनही खात्रीशीर असा उपाय आपल्याला मिळालेला नाही.
या संदर्भात एक चर्चा सह्याद्री मार्फत सुरु झाली होती की, आपण शेतकऱ्यांनीच पुढाकार घेऊन द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील किंवा त्यांना जोडून इतर फळ उत्पादक शेतकरी असतील. जसे, डाळिंब, आंबा, अंजीर, संत्रा या सर्व प्रकारच्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र आणून जर आपण सर्व फळ उत्पादक शेतकऱ्यांचीच विमा कंपनी तयार करु शकलो तर एक खूप महत्वाचं पाऊल असणार आहे. कारण त्यातुनच आपल्या शेतकऱ्यांना नेमक्या गरजेप्रमाणे विम्याचे पर्याय तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणे हे आपण चांगल्या उत्तम पध्दतीनं करु शकतो. अशी एखादी कंपनी उभी राहीली तर आता सध्या ज्या विमा कंपन्या मार्केट मध्ये आहेत. त्यांनाही स्पर्धा तयार होईल. त्यांना ग्राहकांची गरज केंद्रस्थानी ठेवून एकतर मार्केट मध्ये यावं लागेल किंवा बाहेर पडावं लागेल. असाही विचार आता इथून पुढे नेण्याची गरज आहे.
आपण मागच्या तीनेक महिन्यांपासून एक विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे की, महाराष्ट्रात द्राक्ष पिक घेणारे जे काही 80 हजार शेतकरी आहेत. त्यातील जवळजवळ 50 हजार नाशिक भागात आहेत. उर्वरित राज्यातील इतर भागात आहेत. हे सर्वच जर एकत्र यायला सुरुवात झाली तर, त्यामुळे नैसर्गिक संकटे असतील किंवा मार्केटच्या समस्या असतील, तसेच विमा किंवा इतरही फायनान्स संबंधित समस्या असतील या सगळ्या रोजच्या अत्यावश्यक बाबींवर मार्ग काढणे शक्य होईल. जसं सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही जशी शेतकऱ्यांची उभी राहीली आहे. तशा शेतकऱ्यांच्या 50 कंपन्या महाराष्ट्रात उभ्या राहिल्यात. या सर्व कंपन्या एकमेकांशी को-ऑर्डिनेशन करुन काम करायला लागल्या तर, मला वाटतं द्राक्षशेतीच्या वाटचालीतील ते एक महत्वाचं पाऊल असेल आणि आपली द्राक्षशेती शाश्वत होण्याच्या दिशेने आपण नक्कीच वाटचाल करु यात काही शंका नाही.
जाता जाता मला एवढंच सांगायचंय की, द्राक्षशेती ही एक आज मोठी खर्चिक बाब झाली आहे. आज महाराष्ट्रात जेवढे काही पिकं आहेत, या सर्व पिकांमध्ये, यात पॉलिहाऊसचे पिकं जर सोडले तर सगळ्यात जास्त खर्च तसेच सर्वात जास्त गुंतवणूक असलेलं द्राक्ष हे आज तरी एकमेव पिक आहे. जवळ जवळ 4 ते 5 लाख रुपये एकरी यासाठी भांडवली खर्च येतो. त्या शिवाय 2 ते 3 लाख रुपये एकरी हा दरवर्षीचा उत्पादनासाठी चालू खर्च असतो. त्यासाठी द्राक्ष उत्पादक एकरी 4 ते 5 लाख रुपये कर्ज घेतो. 2 एकराचा शेतकरी जरी असला तरी त्याच्यावर आज बँकेचे किमान 8 ते 10 लाखाचे कर्ज आहे. बँकेचं एवढं ओझं घेऊन जेव्हा आपण काम करतो तेव्हा शाश्वत व्यवस्था असणं ही खूप गरजेची गोष्ट ठरते.
आज नुकसान होतांना लक्षात येतंय की, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी पासून ते टोमॅटोसारखा भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब, केळींपर्यंत सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या सर्व पिकांत द्राक्षशेती सर्वात जास्त अडचणीत आहेत. कारण तिच्यावर सर्वात जास्त बोजा आहे. आपल्याला या सर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण स्वत: मनाने कणखर असणं आणि आपली कणखर वृत्ती लोकांना दाखवून देणं. हे अत्यंत महत्वाचं आहे. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही हार मानत नाही. आम्ही झगडतोय. आम्ही लढतोय. या परिस्थितीला पुरुन उरतोय. जे आतापर्यंत आपण केलेलं आहे. त्याच बरोबर या परिस्थितीवरील मार्ग सुद्धा आम्ही शास्त्रीय पध्दतीने काढतोय. आतापर्यंत मागील 50 वर्षातील आमच्या द्राक्ष उत्पादकांनी केलं. त्याच मार्गाने आपल्याला पुढं जावं लागणार आहे. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे.
धन्यवाद.
आपला
विलास शिंदे
(सह्याद्री फार्म्स, मोहाडी, नाशिक) 7030915075
शब्दांकन: ज्ञानेश उगले
Published on: 28 November 2019, 03:58 IST