शेतकरी बांधवांसाठी शेती हेच जगण्याचे साधन आहे. मात्र सध्याच्या घडीला कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कित्येक कांदा उत्पादकांनी कांदा फुकटात वाटून टाकला तर कोणी जाळून टाकला. काही शेतकरी तर जनावरांना कांदा खाऊ घालत आहेत. कांद्याचे दर घसरल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले.
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत असतात. सध्या राज्यात कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचा खर्च देखील वसूल होत नाही. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील दिवे परिसरातील शेतकरी बंधू कांद्याचे व कांदा पातीचे अधिक उत्पादन घेत असतात. कांद्याचा एवढा भाव घसरला असताना कांदा पातीने मात्र साथ दिली आहे. दिवे परिसरातील एका शेतकरी दाम्पत्याला कांदा पात विक्रीतून लाखोंचा नफा झाला आहे.
सध्या बाजारात पंचतारांकित हॉटेलमध्ये कांदा पातीला बरीच मागणी आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कंदापातीतून दिलासा मिळत आहे. दिवे परिसरातील शेतकरी ताराचंद झेंडे यांनी सुमारे दीड एकर सिताफळाच्या बागेत आंतरपीक म्हणून कांदापातीची लागवड केली होती. त्यांनी सुरुवातीला सिताफळाच्या बागेत वाफे तयार करून जमीन भिजवून घेतली. जेव्हा जमीन ओलिताखाली आली तेव्हा शेतकरी ताराचंद यांनी कांदा बियाणे पेरले. तसेच फ्लड पद्धतीचा अवलंब करून त्यांनी कांदा बियाण्याला पाणी भरले.
त्यांनी स्प्रिंकलर लावून पाण्याचे व्यवस्थापन केले. कारण कांदा पातीला अति उष्ण वातावरण सहन होत नाही. स्प्रिंकलरचा वापर करून त्यांनी यशस्वी उत्पादन घेऊन दाखवले आहे. तसेच पिकाचे उत्पादन दर्जेदार मिळावे यासाठी त्यांनी जीवामृताचा देखील वापर केला आहे. या कामात त्यांच्या पत्नीचाही मोलाचा वाटा आहे. त्यांनी उत्पादित केलेली कांदा पात प्लॉट बघण्यासाठी अनेक शेतकरी बांधव त्यांच्या बांधावरच गर्दी करत आहेत.
बांबूच्या सायकलीची होतीये सगळीकडे चर्चा; आरोग्यासाठीही आहे फायदेशीर
या शेतकरी दाम्पत्याने कांद्याचीदेखील लागवड केली होती. मात्र दिवसेंदिवस कांद्याचा भाव इतका कमी होत आहे की, शेतमालातून त्यांना अतिशय नगण्य उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. कांदापात दर्जेदार असल्यामुळे व्यापारीही थेट बांधावरूनच खरेदी करत आहेत. त्यांनी एक एकरात लागवड केलेली कांदापात दीड लाख रुपयाला खरेदी केली आहे. यासाठी त्यांचे पूर्वनियोजन कामी आले. एवढ्या विपरीत परिस्थितीतही त्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर मोदींचा महाराष्ट्रात दौरा; या कार्यक्रमांना लावणार हजेरी
गव्हाच्या निर्यात बंदीचा परिणाम; किमतीत मोठी घसरण, शेतकऱ्यांची होतेय आर्थिक नुकसान
Published on: 13 June 2022, 10:12 IST