लोणी (जि. जळगाव) हे गाव जळगाव शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील शेतकरी खरीप हंगामात कापूस, केळी व भाजीपाला पिके घेतात त्याचप्रमाणे रब्बी हंगामात भुईमूग, हरभरा, गहू आणि इतर पिकांची पारंपारीक पध्दतीने लागवड करत होते. मात्र मागील चार पाच वर्षापूर्वी बाजारपेठेचा अंदाज घेत शेतकरी कलिंगड, पपई लागवडीकडे वळले. लोणी गावात दरवर्षी सुमारे 50 हेक्टरवर कापसाची पूर्वहंगामी लागवड होते. केळीची मृग आणि कांदेबाग लागवड असते. गावाचे एकूण लागवड क्षेत्र सुमारे 400 हेक्टर आहे. यातील सुमारे 170 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. या क्षेत्रात केळी, ऊस आणि कापसाची लागवड असायची, परंतु मागील पाच वर्षात बदल झाले.
आता गावातील 85 हेक्टरवर कलिंगड आणि त्यात पपईचे आंतरपिक आहे. पूर्ण क्षेत्रासाठी आच्छादन आणि ठिंबक सिंचनाचा वापर केला जातो. केळीतही आंतरपीक म्हणून कलिंगड, खरबूज लागवड केली जाते. आता भर पडली ती म्हणजे एका युवकाने मशरूम उत्पादनातुन पूरक व्यवसाय सुरु केलाय त्यांचे नाव आहे डॉ. अनिल केशव माळी, हे एक उच्च शिक्षीत तरुण शेतकरी व कृषी व्यवसायिक आहेत. त्यांनी कृषी किटकशास्त्र विषयात पीएच. डी मिळविली आहे. सुरवातीला एका खाजगी बियाणे कपंनीत शास्त्रज्ञ म्हणून काम केले. त्यानंतर मोठ्या पगाराची नोकरी सोडुन अडावद ता. चोपडा येथे आपला छोटासा कृषी निविष्ठा व्यवसाय सन 2015 मध्ये सुरु केला. यासाठी त्यांना सपुंर्ण कुटुंबाने पाठींबा दिला.
व्यवसायात उतरायचे तर एका उत्पन्न स्रोतावर अवलबूंन न रहाता त्यांन भावाच्या मदतीने लोणी येथे मशरूम उत्पादन करण्याचे ठरविले. शासनाच्या कृषी विभागाकडे चौकशी केली असता एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम-राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या योजनेची माहीती मिळाली. त्यानुसार 2017-18 मध्ये मशरूम उत्पादन प्रकल्प सुरु केला. प्रकल्पासाठी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चोपडा यांच्या कडुन अर्थ सहाय्य मिळाले आहे. प्रत्यक्ष मशरूम उत्पादन जुन 2018 पासुन सुरु झाले. मशरूम उत्पादनासाठी लागणारे महत्वाचे घटक जसे गव्हाचे कुट, बियाणे, प्लास्टिक बॅग्स, सहज मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले त्यामुळे उत्पादन खर्च कमी करता आला. रोजचे काम स्वत: व कुटुंबातील सदस्य यांच्या मदतीने पुर्ण केले जाते. तसेच उत्पादन, विपणन उत्पादन विकास यासाठी मोठे भाऊ, पत्नी, मामेभाऊ यांची मोठी मदत होत असते.
डॉ. अनिल माळी यांनी सांगितलेली मशरूम उत्पादनासाठीची पद्धती:
निर्जंतुकीकरण:
- प्रथम गव्हाचे काड पोत्यामध्ये भरून घ्यावे.
- 200 लि. पाण्याच्या टाकीमध्ये पोते 10-12 तास बुडवुन ठेवावे.
- नंतर अर्धा तास पाणी नितळण्यास ठेवावे. तेच पोते निर्जंतुक टाकीमध्ये ठेवावे.
- पोते निर्जंतुक चेंबरमध्ये ठेवावे.
- बॉयलर मधुन प्रेशर चेंबरमध्ये सोडावे.
- म्हणजे गव्हाचे काड पुर्णपणे निर्जंतुक होईल.
- गव्हाचे काड नैसर्गीकरित्या थंड होऊ द्यावे.
- पुर्णपणे निर्जंतुक झालेले काड बॅग (18×24 इंच) भरण्यास वापरावे.
बी पेरणे:
- आपले हात स्वच्छ धुऊन घ्या. (फॉरमॅलिनने निर्जंतुक करा)
- निर्जंतुक काड व प्लास्टिक पिशवी घ्या, प्लास्टिकच्या पिशवीत काडाचा थर द्यावा.
- अंदाजे 2-3 इंच थर दयावा.
- नंतर बी चा थर द्यावा.
- बीच्या थरावर पुन्हा काडाचा थर द्यावा पुन्हा बी चा असे करुन पिशवी भरावी.
- पिशवी भरल्यावर दोर्याच्या सहाय्याने तोंड बांधावे व पिशवीला सुईने 25-30 छिद्रे पाडावीत.
- बी पेरून बांधलेल्या पिशव्या निर्जंतुक खोलीत ठेवाव्यात.
- खोलीत अंधार ठेवावा व तापमान 22 ते 26 अंश सेल्सियस ठेवावे.
- दिवसातुन 3-4 वेळा फक्त पोते लावलेल्या भिंतीवर पाण्याची फवारणी करावी.
- वीस दिवस ह्या पिशव्या अंधार्या खोलीतच ठेवाव्यात.
पिशवी काढणे:
- पिशवीमध्ये बुरशीची पूर्ण वाढ झाल्यावर ती पांढरी दिसते.
- ती (पिशवी) ब्लेडने कापून काढावी व टांगत्या रॅकवर ठेवावी.
- तापमान 20 ते 30 अंश सेल्सियस व आर्द्रता 70-85 % राहिल याची दक्षता घ्यावी. खोलीमध्ये अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश (संधीप्रकाश) व हवा खेळती ठेवावी.
- पिशवीतून काढलेल्या बेडवर एक दिवसानंतर पाण्याची हळुवार फवारणी करावी.
- दिवसातुन 3-4 वेळा पाण्याची फवारणी करावी.
काढणी:
- मशरूमची पूर्ण वाढ पिशवी फाडल्यानंतर 4-5 दिवसात होते.
- वाढ झालेले मशरूम हाताने वळवून काढावेत.
- मशरूम काढल्यानंतर बेड एक ते दीड इंच खरडावा व पाणी द्यावे.
- 10 दिवसांनी दुसरे पिक, परत 10 दिवसांनी तिसरे अशी तीन पिके मिळतात.
- शिल्लक राहिलेल्या बेडचा वापर झाडांना खत, जनावरांना पौष्टिक चारा म्हणून करण्यात येतो.
साठवण:
ताज्या मशरूमची साठवण छिद्रे पाडलेल्या गेजच्या प्लास्टिक पिशवीत करतात. मशरूम 4-5 दिवस फ्रीज मधे उत्तम राहते. मशरूम 45-50 अंश से.ला उत्तम वाळते. मशरूम सीलबंद पिशवीत भरून ठेवावे.
विक्रीचे नियोजन:
विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठ व स्थानिक विशिष्ठ वर्ग यांना मशरूमचे महत्व पटवून देऊन मशरूम बद्दल जनजागृती करुन मशरूम बाजारपेठ तयार केली आहे. आई-वडीलांच्या आशिर्वादाशिवाय कोणताच व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही. त्यांच्या प्रेरणेने देवकी-केशव ‘ देवकेश मशरूम्स’ असा ब्रँड तयार केला आहे. ओल्या मशरूमची विक्री 400 रूपये तर सुक्या मशरूमची विक्री 2,000 प्रमाणे केली जाते. मशरूमची मुख्यता सूपर शॉपी, रीटेल शॉपस्, डॉक्टर्स, सरकारी अधिकारी, शिक्षक वर्ग इ. विक्री केली जाते. देवकेश मशरूमचे आऊटलेट भुसावळला सुरु झाले आहे तसेच लवकरच जळगाव, पुणे, मुबंई, चोपडा येथे सुरु करण्याचा मानस आहे.
मशरूमचे मुल्यवर्धीत पदार्थ:
धिगंरी मशरूम हे चांगल्या प्रकारे वाळविता येत असल्याने त्याचे मुल्यवर्धीत पदार्थ उत्तम बनविता येतात. वाळविलेल्या मशरूम पासुन पापड, लोणचे, सुप, बिस्किट, प्रो-विटा पावडर, बासुंदी, व्हेज पकोडा, जॅम इ. पदार्थ बनविता येतात. सर्व पदार्थांना बाजारात ग्राहकांची चागंली पसंती मिळत आहे.
उत्पन्न व आर्थिक बाबी:
योग्य वातावरण व वेळेचे नियोजन केल्यास मशरूमचे उत्पादन चांगले मिळते. माझ्या मशरूम प्रकल्पाची क्षमता 400-500 कि. ग्रॅ. ओले मशरूम व 40-50 कि. ग्रॅ. प्रती महिना सुके मशरूम इतकी आहे. महिन्याकाठी 10 ते 20 हजार रूपयांपर्यंत विक्री होत आहे.
ग्राहक समाधानासाठी विशेष प्रयत्न:
देवकेश मशरूम ने सोशल मिडियाच्या (फेसबूक, व्हाटस्अॅप, प्रिंट मिडिया) मदतीने आपले ग्राहक जोडले आहेत. मशरूमची विक्री वाढत आहे. देवकेश मशरूम्स आपल्या मशरूमची गुणवत्ता पडताळणीसाठी गुण नियंत्रक प्रयोगशाळेत वेळोवेळी परिक्षण करुन घेत असते. तसेच त्याची माहिती त्यांच्या उत्पादन पॅकिंगवर दिली जाते.
देवकेश मशरूमचे उपक्रम:
देवकेश मशरूम हे आपल्या नाविन्यपुर्ण उपक्रमाचा प्रसार व जनजागृती व्हावी म्हणुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. यात शेतकरी अभ्यास सहल, मशरूम जनजागृती, शेतकरी मशरूम उत्पादक कार्यशाळा इ. तसेच कृषी विभाग आयोजित प्रदर्शनामध्ये देवकेश मशरूम सक्रिय सहभाग नोंदवत असते. या सर्व कामाची दखल दुरदर्शन सह्याद्री वाहिनीने घेतली आहे.
अपेक्षित उत्पन्न:
- 1 पिशवी पासून 1,000 ग्रॅम ताजे विक्रीचा घाऊक दर प्रति 200/- रुपये कि.ग्रॅ. 200.00/-
- 1 कि. ग्रॅ. उत्पादनासाठी येणारा खर्च 60.00
- प्रति कि. ग्रॅ.फायदा 140.00
1,000 चौ. फुटात 400 पिशव्यांचे 2 महिन्यात उत्पन्न घेता येईल.
400 पिशव्या प्रति 60/- रू. खर्च 24,000.00
1 वर्षात 5 वेळा उत्पन्न घेता येईल x 5 खर्च 30,000/-
अपेक्षित फायदा प्रति वर्षी
2,000 पिशव्यांपासून प्रति वर्षी 140 रू. निव्वळ नफा 2,80,000.00/-
(टिप: उत्पादन हे योग्य वातावरण व निगा यावर अवलंबुन असते)
पाल कृषी विज्ञान केंद्राची होतेय मदत
पाल कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने परिसरातील तरुण शेतकरी, महिला व नवीन कृषी उद्योग सुरु करणाऱ्यांना क्षेत्र भेट तसेच प्रशिक्षण करिता प्रोत्साहन दिले जाते डॉ. माळी यांच्याकडे देखील प्रशिक्षण घेण्यास सोय केली जाते. जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा व्यवसाय सुरु करून आर्थिक उन्नती साधण्यासाठी केंद्राच्या प्रक्षेत्रावर देखील मशरूम उत्पादन युनिट सुरु करण्यात आले आहे.
डॉ. अनिल केशव माळी
पत्ता: गट न. १६२, लोणी, चोपडा, जळगाव
९४२०२२८०३५/९५८८६६३७३०
लेखक:
श्री. विठ्ठल महाजन
विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण)
कृषी विज्ञान केंद्र, पाल, रावेर, जळगाव
Published on: 12 August 2019, 04:27 IST