भारतात सध्या सेंद्रिय शेतीला विशेष महत्त्व दिले जात आहे. यासाठी मायबाप शासन देखील प्रयत्नरत आहे. मात्र असे असले तरी देशातील शेतकरी बांधव सेंद्रिय शेतीचा फायदा होत नाही असे म्हणत सेंद्रिय शेतीला अजूनही आत्मसात करीत नाही.
सेंद्रिय शेती ही केवळ वेळेची बरबादी असा समज शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र असे असले तरी देशात असेही शेतकरी आहे जे सेंद्रिय पद्धतीने शेती करून लाखो रुपयांचे उत्पन्न कमवीत आहेत विशेष म्हणजे सेंद्रिय शेतीसाठी उत्पादन खर्च देखील कमी असल्याने या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा खूप मोठा फायदा होत आहे. सेंद्रिय शेती करून कशा पद्धतीने लाख रुपयांचे उत्पन्न कमविले जाऊ शकते हे दाखवून दिले आहे मध्यप्रदेश मधील एका अवलिया शेतकऱ्याने.
मित्रांनो केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील बुरहानपूर भागातील एका शेतकऱ्याने सेंद्रिय शेती कशा पद्धतीने लाखों कमवून देऊ शकते हे दाखवून दिले आहे. या शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीत मोठे यश संपादित करून एक नवी यशोगाथा लिहिली आहे. उग्र हवामान, हवामानातील बदल आणि पारंपरिक शेतीत अडकलेला शेतकरी यामुळे शेतीचा खर्च अधिक आणि नफाही कमी होऊ लागला आहे.
पण शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला तर शेतीतुन चांगले उत्पन्न प्राप्त केले जाऊ शकते. मध्यप्रदेश मधील बुरहानपूर येथील मौजे नाचणखेडा येथील प्रशांत चौधरी या अवलिया शेतकऱ्याने सेंद्रिय पद्धतीने पेरू, कोथिंबीर, मिरची आणि टोमॅटोची शेती करून लाखो रुपयांचे उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे. प्रशांत यांनी सांगितले की, त्यांच्या या यशात फलोत्पादन आणि कृषी विभागाचा देखील मोलाचा वाटा आहे.
चौधरी यांच्या मते, त्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला मंडईत हातोहात विक्री होतं आहे शिवाय व्यापारी देखील हा भाजीपाला चढ्या भावाने विकत घेतात. प्रशांत एक एकर शेतीतुन सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादित करण्यासाठी सुमारे 25 हजार रुपयांचा खर्च करतात आणि जवळपास 2 लाखांचा निव्वळ नफा कमावतात. विशेष म्हणजे प्रशांत यांनी पीकपद्धतीत बदल करत सेंद्रिय पद्धतीने फळबाग लागवडीचा निर्णय घेऊन इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
चौधरी यांच्या यशोगाथेवरून असे दिसून येते की सेंद्रिय शेती ही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते शिवाय यामुळे शेत जमिनीचा पोत देखील अबाधित राखला जाऊ शकतो. यामुळे जमिनीचे आरोग्य तसेच मानवाचे देखील आरोग्य जोपासण्यास मदत होत असल्याचे प्रशांत नमूद करतो.
रासायनिक पद्धतीने शेती केल्यास उत्पादन खर्च अधिक आणि नफा कमी
चौधरी सांगतात की, तो भोसले मिलिटरी स्कूल, नाशिक, महाराष्ट्र येथे शिकत असे. याच दरम्यान वडिलांची प्रकृती खालावली आणि घराची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यानंतर त्यांनी मधेच शिक्षण सोडून शेती सुरू केली.
चौधरी सांगतात की, पूर्वी ते पारंपरिक शेती करायचे. त्यांच्या शेतात रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे त्यांना शेतीत जास्त खर्च आणि कमी नफा मिळायचा. एवढेच नाही तर रसायनयुक्त कृषी उत्पादनांमुळे शरीराला यामुळे नुकसान होण्याचे देखील चान्सेस अधिक होते. त्यानंतर त्यांनी मात्र रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारला.
इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहेत प्रशांत
चौधरी सांगतात की, जेव्हा सेंद्रिय शेतीचे चांगले परिणाम मिळू लागले, तेव्हा सेंद्रिय शेती करण्याचा त्यांचा उत्साह दिवसेंदिवस वाढतचं गेला. त्यांनी आपल्या 10 एकर शेतीत कोथिंबीर आणि मिरचीची लागवड केली आहे. येत्या हंगामात टोमॅटोची लागवड करण्याचा त्यांचा विचार आहे. जेव्हा त्यांनी सेंद्रिय शेती सुरू केली तेव्हा पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी त्यांना थोडे कमी उत्पादन मिळाले. पण त्याने हार मानली नाही. आज ते सेंद्रिय शेतीतून बंपर उत्पादन घेत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतर शेतकरीही सेंद्रिय शेती शिकण्यासाठी त्यांच्याकडे येत आहेत.
सेंद्रिय खतांचा वापर करून मिळवले लाखोंचे उत्पादन
प्रशांत यांनी लावलेली पेरू आणि कोथिंबीरची झाडे 5 वर्षांची झाली असून आता त्यापासून त्यांना चांगले उत्पादन मिळू लागले आहे. विशेष म्हणजे प्रशांत पिकांचे अवशेष आणि शेतातील पाला-पाचोळा कचरा जाळत नाहीत.
ते सेंद्रिय खते आणि कीटकनाशके तयार करण्यासाठी त्यांचा वापर करतात. ज्याचा पिकांमध्ये वापर केल्यास पिकांचा वाढीचा वेग वाढतो. शेतजमिनीची सुपीकता वाढते. घरी तयार केलेल्या पिकांना ते चांगले कुजलेले शेणखत, गांडूळ खत, कचरा कंपोस्ट, जीवामृत, घन जीवनामृत, गोकृपा अर्क देतात. जेणेकरून पिकांना पोषक तत्वांचा पुरवठा होतो.
कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी सेंद्रिय कीटकनाशकांची फवारणी
पिकांचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी घरी तयार केलेल्या सेंद्रिय कीटकनाशकाचा प्रशांत वापर करत असतात. यामध्ये दशपर्णी अर्क आणि निंबोळी अर्क यांचा समावेश असल्याचे प्रशांत सांगतात. प्रशांत चौधरी यांच्या प्रेरणेने इतर शेतकरीही त्यांच्या शेतातील सेंद्रिय शेती पाहण्यासाठी येतात आणि त्यांच्याकडून सेंद्रिय शेतीचे बारकावे जाणून घेतात आणि समजून घेतात. चौधरी यांच्या प्रेरणेने आपल्या शेतात रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेती करणारे अनेक शेतकरी आहेत आणि चांगले उत्पादनही घेत आहेत.
Published on: 02 May 2022, 03:19 IST