Success Stories

इच्छा असेल तर मार्ग दिसेल अशी म्हण आपण ऐकली असेल. ही म्हण कर्नाटकातील हरेकाला हजाब्बा यांनी खरी करून दाखवली आहे. सध्या सोशल नेटवर्किंगवर हरेकाला हजाब्बा यांची तुफान चर्चा आहे. याच्या कारण म्हणजे भारत सरकारकडून देण्यात येणारा सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एका पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

Updated on 13 November, 2021 6:38 PM IST

इच्छा असेल तर मार्ग दिसेल अशी म्हण आपण ऐकली असेल. ही म्हण कर्नाटकातील हरेकाला हजाब्बा यांनी खरी करून दाखवली आहे. सध्या सोशल नेटवर्किंगवर हरेकाला हजाब्बा यांची तुफान चर्चा आहे. याच्या कारण म्हणजे भारत सरकारकडून देण्यात येणारा सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एका पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

मागील काही वर्षांपासून सामान्यातील असामान्य म्हणजेच लोकांचे पद्म पुरस्कार विजेत्या या पद्धतीने पुरस्कार दिले जात आहेत. यावेळी कर्नाटकातील हरेकाला हजाब्बाला यांना सन्मानित करण्यात आले आहे. आता तुम्ही म्हणाल मग यांची चर्चा होणारच ना, पण हजाब्बा हे एक संत्री विक्रेते आहेत, तरी त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. हे का तर त्यामागे आहे त्यांचे समाजकार्य. उल्लेखनीय आणि समाजउपयोगी कार्याची दखल घेत सरकारने सामान्यातील असामान्य या पद्धतीने काम करणाऱ्यांना यंदाही या पुरस्कारांनी सन्मानित केले. २०२० साली प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली तेव्हा त्या यादीमध्ये सात पद्मविभूषण, १६ पद्मविभूषण आणि ११८ जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार असल्याचं निश्चित झालं. याच यादीमध्ये हरेकाला हजाब्बांचेही नाव होते.

हेही वाचा : कर्जात डुबलेले शेतकरी ते पद्मश्री! जाणुन घ्या आदर्श शेतकरी पद्मश्री कंवल सिंह चौहान यांचा प्रेरणादायी प्रवास

हजाब्बा हे एक फळविक्रेते असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांना यंदा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचे काम इतके उल्लेखनिय आहे की, मँगलोर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात हजाब्बा यांची जीवनगाथा शिवकण्यात येते.
आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, पण माझ्या पुरेसं साधन नाही असं म्हणून आपण कर्तव्यापासून दूर होत असतो. पण कठीण परिस्थितीतून मार्ग काढत हजाब्बा यांनी समाजात आदर्श ठेवला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणोपयोगी वातावरण कसं निर्माण करता येईल यासाठी हजाब्बा सतत काम करतात. हजाब्बा यांनी मुलांसाठी शाळा बांधली असून ते आता महाविद्यालय उभारण्यासाठी तयारी करत आहेत.

 

संत्री विकून १५० रुपये कमावणारे हजाब्बांनी उभारलं विद्यामंदिर

हजाब्बा हे फळविक्री करतात, त्यांना स्थानिक भाषांचे ज्ञान उत्तम आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल मग त्यांनी शाळा सुरू करण्याचं कसं ठरवलं. तर त्याचं काय झालं एकदा एक परदेशी दाम्पत्य हरेकाला यांच्याकडे संत्री विकत घेण्यासाठी आले होते. मात्र हरेकाला यांना केवळ स्थानिक भाषा येत असल्याने भाषेच्या अडचणीमुळे त्यांना परदेशी दाम्पत्याची भाषा समजली नाही. भाषा न समजल्याने ते दाम्पत्य संत्री न खरेदी करताच निघून गेले.

या घटनेचं हरेकाला यांना खूप वाईट वाटलं. विक्री झाली नाही यापेक्षा आपण इंग्रजीत संवाद साधू शकलो नाही याचं त्यांना वाईट वाटलं. मात्र याच निराशेमधून एक आशेचा किरण दिसावा तसा त्यांनी एक आयुष्य बदलणारा निर्णय घेतला. या घटनेनंतर हजाब्बा यांना आपल्या गावात प्राथमिक शाळा असणं गरजेचे असल्याची जाणीव त्यांना झाली. तसेच येणाऱ्या पिढीला अशा गोष्टीचा सामना करावा लागू, नये यासाठी शाळा उभारण्याची गरज वाटली.

दिवसभर संत्री विकून अवघे १५० रुपये कमावणाऱे हजाब्बा यांनी गावामध्ये शाळा उभारण्यासाठी पैसे साठवायला सुरूवात केली. पैसे साठवून हजाब्बा यांनी ज्या गावात शाळा नव्हती तिथे लहान मुलांसाठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा उभारली.

शाळेत स्वत: करायचे काम

सुरुवातीला केवळ २८ विद्यार्थी त्यांच्या शाळेत यायचे. पण विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर जागेची कमतरता जाणवू लागली आणि हजाब्बांनी पुन्हा एकदा नवीन निश्चय केला. हजाब्बा यांनी जागा कमी पडू लागल्यानंतर नवीन शाळेसाठी अजून पैसे साठवले आणि एक लहानशी शाळा बांधली गेली. गावापासून २५ किलोमीटर दूर असलेल्या जिल्हा पंचायत कार्यालयात जाऊन ते शिक्षणासंदर्भातील आपल्या गावातील कामांबद्दल अधिकाऱ्यांची भेट घेतात तसेच शैक्षणिक सुविधांचीही माहिती वरचेवर घेत असतात.

स्वतःच्या उभारलेल्या शाळेत सुरुवातीला मुलांनी यावं म्हणून ते स्वत:च शाळेची देखभाल करायचे. अगदी साफसफाई ते विद्यार्थ्यांसाठी उकळलेल्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यापासून सर्व काम ते सुरुवातीच्या दिवसांमध्ये करायचे. हरेकाला यांना एका प्रसंगामधून शिक्षणाचं महत्त्व कळलं आणि त्यांनी गावकऱ्यांना समजावलं. त्यानंतर गावकऱ्यांमध्ये त्यांनी शिक्षणासंदर्भात जागृकता निर्माण केली आणि विश्वास संपादन केला. आज त्याच विश्वासाच्या जोरावर आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी पद्मश्रीपर्यंत झेप घेतली.

 

विश्वविद्यालय उभारण्याचा निश्चय

सध्या ते विश्वविद्यालय उभारण्याच्या तयारीत आहेत. हजब्बा २०१२ पासून आपल्या गावात महाविद्यालय सुरू करण्यासाठी झटत आहेत. सरकारकडे त्यांनी तशी मागणीही केली आहे. लवकरच त्यांचं हे स्वप्नदेखील पूर्ण होईल अशी अशा त्यांना वाटत आहे. त्यासाठी या पद्मश्री पुरस्काराच्या रुपाने मिळालेली कौतुकाची थाप काम वगाने होण्यासाठी मदत करणारी ठरेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.

“गृह मंत्रालयाकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याचा फोन आला. पुरस्कार जाहीर झाला यावर विश्वासच बसत नाही. पद्मश्री पुरस्कार मिळेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. खूप आनंद झाला आहे’ अशी प्रतिक्रिया हरेकाला हजाब्बा यांनी पुरस्काराच्या घोषणेनंतर दिली होती. हजब्बा यांचं रहाणीमान अगदी साधं आहे. पुरस्कार घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांचं राहणी पाहून सर्वांकडून त्यांच कौतुक केलं जात आहे.

English Summary: orange vendor harekala hajabba gets Padmashri , know his Socialwork
Published on: 13 November 2021, 05:01 IST