पश्चिम महाराष्ट्र कांदा लागवडीसाठी संपूर्ण भारतात ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर हे दोन जिल्हे विशेषता कांदा लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नाविन्यपूर्ण उपक्रम शेती क्षेत्रात राबविताना बघायला मिळत आहेत. असाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे कांदा लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर. अहमदनगर जिल्ह्यातही मल्चिंग पेपर उपयोगात आणून कांदा लागवड केली गेल्याचे दृश्य बघायला मिळालेत. जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या तांभोळ या गावात हे मनमोहक आणि नावीन्यपूर्ण प्रयोगाचे दृश्य मनाला विशेष प्रसन्न करीत होते.
राज्यातील शेती कशी हायटेक बनत चालली आहे याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. मौजे तांभोळ येथील एका प्रगतिशील शेतकऱ्यांने पारंपारिक शेती पद्धतीत बदल घडवून आणला आणि चक्क मल्चिंग पेपरचा वापर करून कांद्याची लागवड यशस्वी करून दाखवली. तांभोळ गावचे रहिवाशी शेतकरी विलास काशिनाथ भांगरे गेल्या अनेक वर्षांपासून आपली वडिलोपार्जित शेती करीत आले आहेत. मात्र त्यांना शेती क्षेत्रात नेहमीच निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागला त्यामुळे उत्पन्नात तर सोडाच पण झालेला उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याचा त्यांना अनुभव आला. म्हणून त्यांनी शेती पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचा निश्चय मनाशी केला, याच निश्चयापोटी त्यांनी मल्चिंग पेपरचा वापर करून कांदा लागवड केल्याचे समजत आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, विलास काशिनाथ भांगरे अकोले महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत; परंतु काळ्या आईच्या कुशीत जन्मलेल्या या अहमदनगरच्या सुपुत्राला शेतीशी विशेष लगाव असल्याचे सांगितले जाते, आणि म्हणूनच प्राध्यापक असूनही शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम व प्रयोग करण्यास यांचा हात कोणी धरू शकत नाही. आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे प्रा.विलास भांगरे पंचक्रोशीत ओळखले जातात, आपल्या नावीन्यपूर्ण प्रयोग यामुळेच अकोले तालुक्यातील एक चर्चेत असलेले नाव म्हणून त्यांची ओळख आहे. प्राध्यापक विलास भांगरे यांना दोन वर्षापासून कांदा पीक लागवडीत बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसत होता. अशीच परिस्थिती संपूर्ण राज्यात असल्याचे सांगितले गेले, तसेच वातावरणातील बदलामुळे आणि अवकाळी पडलेल्या पावसामुळे उत्पादित केलेला कांदा अगदी उन्हाळा कांदा देखील कांदा चाळीत साठवणे कठीण होऊन बसले होते. कांदा चाळीत साठवला म्हणजे कांदा सडायलाच हवा. या परिस्थितीचा भांगरे यांनी अगदी जवळून अभ्यास केला, आणि म्हणूनच शेती पद्धतीतच बदल करणे गरजेचे असल्याचे समजले त्या अनुषंगाने त्यांनी मागील वर्षी प्रायोगिक तत्त्वावर एक गुंठे क्षेत्रात मल्चिंग पेपरचा वापर करीत कांदा लागवड केली.
मल्चिंग पेपरचा वापर करून केलेल्या कांदा लागवडीचे अनेक फायदे असतात. मल्चिंग पेपरचा वापर करून उत्पादित केलेला कांदा एकसमान आकाराचा असतो, मल्चिंग पेपरचा वापर केल्याने कांद्यावर रोगराई जवळपास नगण्य असते त्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ होत असल्याचे सांगितले जाते, मल्चिंग मल्चिंग पेपरचा वापर करून केलेल्या कांदा लागवडीत अतिशय अत्यल्प खतांची आवश्यकता भासत असते, यामुळे पाण्याची बचत होते. खतांची सुयोग्य मात्रा दिल्याने उत्पादन खर्च कमी होतो तसेच पिकावर याचा विपरीत परिणाम होत नाही. मल्चिंग पेपरचा वापर करून कांदा लागवड करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या पद्धतीने उत्पादित केलेला कांदा हा दीर्घकाळ टिकण्यास सक्षम असतो असे भांगरे यांच्या प्रयोगातून सिद्ध झाल्याचे सांगितले गेले. मागील वर्षी प्रायोगिक तत्त्वावर फक्त एक गुंठे क्षेत्रात मल्चिंग पेपरचा उपयोग करून कांदा लागवड केली होती, त्या प्रायोगिक तत्त्वावर त्यांना मोठे यश संपादन झाले आणि म्हणूनच त्यांनी या वर्षी मल्चिंग पेपरचा वापर करीत जवळपास साडेतीन एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली. एक महिन्यापूर्वी त्यांनी कांदा लागवड केली आहे, त्यांच्यामते पारंपारिक पद्धतीने लावलेल्या कांद्यापेक्षा हा एक महिन्याचा कांदा अधिक सुदृढ आणि निरोगी असल्याचे दिसत आहे.
मल्चिंग पेपरच्या साहाय्याने एक एकर क्षेत्रात एक लाख कांदा रोपांची लागवड होते, एकरी 70 मजूर लागवडीसाठी आवश्यक असतात. लागवड एक सारखी असल्याने कांद्याचा आकार देखील एक समान असतो. यामुळे 25 टक्केच पाणी कांदा पिकाला पुरेसे असते. कांदा पिकात तण वाढत नाही त्यामुळे निंदनी खुरपणीचा खर्च वाचतो. मल्चिंग पेपरचा वापर करून जर कांदा लागवड केली तर एकरी अडीचशे क्विंटल पर्यंत दर्जेदार उत्पादन मिळू शकते. मल्चिंग पेपरसाठी एकरी मात्र पंधरा हजार रुपये खर्च येतो जो की निंदणी आणि खुरपणीत होत असलेल्या खर्चातच निघू शकतो.
Published on: 11 February 2022, 09:37 IST