Chili Production :- बाजारपेठेचा अभ्यास करून आणि कोणत्या कालावधीमध्ये कोणत्या पिकाला जास्त बाजारभाव राहील याचा अभ्यास करून जर पिकांची लागवड केली तर नक्कीच शेतकऱ्यांना बाजार भाव चांगला मिळून खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होतो. कारण बरेच शेतकरी आता परिपूर्णरितीने अभ्यास करून आणि नेमका अंदाज घेऊनच पिकांची लागवड करतात.
ही बाब यावर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी दिसून आली. काही महिन्या अगोदर जेव्हा टोमॅटो रस्त्यांवर फेकला जात होता अगदी त्याच वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली तर काहींनी लागवड केलेल्या टोमॅटो येणाऱ्या काळात भाव वाढ होईल या आशेने जतन केला व अशा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झाल्याचे आपण आता बघितले.
तसेच पिकांमधील सातत्य ठेवण्याचा फायदा देखील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून आला. टोमॅटो उत्पादनामध्ये बरेच शेतकरी पाच ते दहा वर्षापासून सातत्य ठेवून आहेत व यावर्षी त्यांना खूप मोठा फायदा झाला. अगदी याच पद्धतीने गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून मिरची लागवडीत सातत्य ठेवलेले भोकरदन तालुक्यातील धावडा या गावच्या एका शेतकऱ्याने मिरची उत्पादनातून तब्बल 50 लाखाच्या पुढे उत्पादन मिळवले आहे.
मिरची पिकातून घेतले 55 लाखाचे उत्पादन
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा या गावचे इक्बालखा पठाण यांनी मिरची पिकामध्ये सातत्य ठेवले आणि गेल्या 16 वर्षापासून ते मिरची लागवड करत आहेत. परंतु यावर्षी त्यांनी मिरची लागवड क्षेत्रामध्ये वाढ केली व धोका पत्करून मिरचीसाठी खर्च केला. गेल्या वर्षी त्यांनी चार ते पाच एकर क्षेत्रावर मिरची लागवड केली होती. मागच्या वर्षी बऱ्याच लोकांना मिरची पिकाने फटका दिला होता परंतु पठाण यांना चांगलं उत्पन्न मिरचीच्या माध्यमातून मिळाले होते. यावर्षी त्यांनी मिरची लागवडीचे क्षेत्र जवळजवळ दुप्पट केले.
यावर्षी त्यांनी अकरा एकर मिरची लावली व यामध्ये त्यांनी अंदाज बांधला होता की यावर्षी अवकाळी पाऊस झालेला असल्यामुळे तर शेतकरी जास्त प्रमाणात मिरची लागवड करणार नाहीत हा अंदाज त्यांचा खरा ठरला. पठाण यांनी एप्रिल महिन्यामध्ये मिरचीचे शिमला,
बलराम तसेच पिकाडोर आणि तेजा यासारख्या विविध वाणांची लागवड केलेली होती. एप्रिल महिन्यामध्ये लागवड केलेली त्यांचे मिरचीचे उत्पादन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाले. अगदी सुरुवातीला शिमला मिरचीला 40 ते 45 रुपये प्रति किलो आणि पिकाडोर मिरचीला 65 रुपये प्रति किलो तर बलराम या वानाच्या मिरचीला 71 रुपये किलोचा दमदार बाजार भाव मिळाला.
आज पर्यंत आठ तोडे मिरचीचे झाले असून त्यातून त्यांना 55 लाख रुपयांचे उत्पन्न मिळालं आहे व आणखी या माध्यमातून उत्पन्न मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. तसेच यामध्ये दुसरी जमेची बाब म्हणजे त्यांनी लागवड केलेल्या तेजा या वाणाची मिरची अजून शिल्लक असून ती मार्च महिन्यापर्यंत चालते. एवढेच नाही तर या व्हरायटीची लाल मिरची उत्पादन देखील चांगले येते व याला दोनशे रुपयांपर्यंत भाव मिळतो. या आधारावर त्यांना अपेक्षा आहे की अजून देखील वीस ते पंचवीस लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळेल.
बाजारपेठेचा अंदाज ठरतो फायद्याचा
इक्बालखा पठाण यांनी त्यांचा अनुभव सांगितला की मिरची लागवड करण्याअगोदर ते बाजारपेठेचा अंदाज घेतात व त्यानंतरच लागवड करतात. त्यामुळे नक्कीच फायदा मिळतो. त्यांनी त्यांचा अनुभव सांगताना सांगितले की लोक काय करत आहेत त्यांच्या मागे न जाता आपण आपल्या पातळीवर थोडा विचार करणे गरजेचे आहे.
बाजारपेठेची स्थिती काय आहे? येणाऱ्या कालावधीमध्ये इतर शेतकरी कोणते पीक कमी लागवड करू शकतात किंवा कोणते पीक जास्त लागवड करू शकतात? या मुद्द्याआधारे अभ्यास करून बाजारपेठेचा अंदाज घेतला व पिकाची लागवडीकरिता निवड केली तर नक्कीच फायदा मिळतो. त्यांना जो काही मिरचीच्या माध्यमातून आर्थिक फायदा झाला त्यामध्ये अतिपाऊस आणि कमी लागवड क्षेत्र यामुळे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना चांगला बाजार भाव मिळाला.
Published on: 13 August 2023, 09:37 IST