देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. राज्यात देखील कडाक्याचे ऊन पडत असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तापमानात वाढ झाली असल्याने लिंबाच्या मागणी देखील मोठी वाढ झाली आहे.
खरं पाहता उन्हाळ्यात लिंबाला मोठी मागणी असते मात्र यंदा तापमानात मोठी वाढ झाली असल्याने लिंबाला नेहमीपेक्षा अधिक मागणी आहे यामुळे लिंबाला चांगला विक्रमी बाजार भाव देखील मिळत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या बाजारपेठेत लिंबाला तब्बल पंधराशे रुपये प्रति दहा किलो असा दर मिळत आहे. यामुळे लिंबाला सोन्यासारखा दर मिळत असल्याचे सांगितले जात आहे. या विक्रमी बाजार भावामुळे लिंबू उत्पादक शेतकरी सुखावला आहे. हिंगोली मधल्या कांडली येथील शेतकरी श्रीकांत पतंगे यांनादेखील लिंबाच्या बागेतून लाखों रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याची आशा आहे. श्रीकांत यांनी अडीच एकर क्षेत्रात लिंबाची बाग फुलवली आहे त्यांना या लिंबाच्या बागेतून सुमारे 13 लाख रुपयांच्या उत्पन्नाची आशा आहे.
श्रीकांत यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीत नवीन पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरवले. मात्र, श्रीकांत यांची वडिलोपार्जित जमीनीचा पोत चांगला नव्हता म्हणून त्यांनी कृषी विभागाचा सल्ला घेतला. कृषी विभागाने त्यांना काटेरी वनस्पती लागवड करण्याचा सल्ला दिला. या अनुषंगाने श्रीकांत यांनी अडीच एकर क्षेत्रात लिंबाची झाडे लावण्याचा विचार केला. त्यांनी अडीच एकर क्षेत्रात 600 लिंबाची झाडे लावली.
आतापर्यंत त्यांना तीन लाख रुपये खर्च आला आहे. लिंबाची बाग लावून त्यांना 6 वर्षे उलटत आली. लिंबाच्या बागेसाठी ठिबक सिंचन प्रणालीचा यशस्वी वापर केला आहे. मागील दोन-तीन वर्ष लिंबाच्या बागेतून श्रीकांत यांना कवडीमोल उत्पन्न मिळत होते.
मागच्या वर्षी तर केवळ 50 हजार रुपये नफा त्यांना मिळाला होता. मात्र यावर्षी लिंबाला चांगली मागणी असल्याने बाजारभावात वाढ झाली असून त्यांना यापासून चांगल्या उत्पन्नाची आशा आहे. सध्या बाजारात लिंबाला दीडशे रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे आणि श्रीकांत यांना अडीच एकर क्षेत्रातून 90 क्विंटल उत्पादनाची आशा आहे. अर्थातच त्यांना या बागेतून 13 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
Published on: 03 April 2022, 10:51 IST