अफाट जिद्द,कष्ट आणि योग्य व्यवस्थापन असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही.या नियमाला शेतीक्षेत्र सुद्धा अपवाद नाही. आपण बऱ्याचदा पाहतो की चांगल्या दरा अभावी शेतकऱ्यांना त्यांनी कष्टाने पिकवलेल्या शेतमाल अगदी मातीमोल भावात विकावा लागतो.
केलेला खर्च देखील बऱ्याच वेळा निघत नाही.यावर्षी आपण सगळ्यांनी टोमॅटोची झालेली गत अनुभवले आहे.अक्षरशः बाजार भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकून देणे पसंत केले होते. हा प्रकार बऱ्याच शेतमालाच्या बाबतीत होत असतो. परंतु योग्य विक्री व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अभ्यास करून जर नियोजन केले तर काहीतरी चांगले घडू शकते.असेच काहीतरी वेगळे आणिप्रेरणा वाटेल असे प्रेरणादायक काम एका शेतकऱ्याने करून दाखवले आहे.त्यांच्याविषयी या लेखात माहिती घेऊ.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, मुरमा तालुका पैठण येथील शेतकरी एकनाथ शिवनाथ लेंभे यांची त्यांच्या मुरमा शिवारात नऊ एकर शेती आहे.त्या नऊ एकर शेतीमध्ये त्यांनी तीन एकर मोसंबी, चार एकर कपाशी आणि एक एकर कार्टूल्याची याची लागवड केली आहे.राहिलेला एक एकर मध्ये काहीतरी नवीन पद्धतीचे पीक घ्यायचे म्हणून त्यांनीही शेती तशीच ठेवली होती.या एक एकर शेतीवर त्यांनी 15 फेब्रुवारी 2020 रोजी 30 गुंठे क्षेत्रावर जी नाईन या केळीच्या वानाची पाच बाय सात या अंतरावर 1030 केळीच्या झाडाची लागवड करून त्याला ठिबक सिंचनाची व्यवस्था केली आहे.
तसेच त्यांनी पाचवड येथील प्रसाद ॲग्रो ट्रेडर्स चे भाऊसाहेब नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली लावलेल्या केळीला योग्य शेणखत,अन्नद्रव्यांचा व्यवस्थित पुरवठा,प्लेटो ॲग्रो चे सेंद्रिय खते ठिबकद्वारे दिले. कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यांनी बुरशीजन्य औषधेही फवारले. केळीची फळधारणा होईपर्यंत पाणी आणि खत व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांची पत्नी व मुलगा त्यांनी स्वतः घेतली. दहा महिन्याच्या कालावधीनंतर काही झाडाचे केळीचे घड परिपक्व झाले.परंतु केळीला दोन ते तीन रुपये प्रति किलोचा भाव असल्याने त्यांना मिळणारी उत्पन्नाची आशाधुसर झाली. परंतु त्यांनी अशाही परिस्थितीत हार न मानता व्यापाऱ्यांचा शोध सुरू ठेवला.
या शोधादरम्यान त्यांना खानापुर जिल्हा अहमदनगर येथील श्री कृष्ण बनानास एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बागेस भेट दिली व सात रुपये प्रति किलोप्रमाणे केळीची खरेदी केली. केळी संबंधित कंपनीने इराणला पाठवल्याचे एकनाथ लेंभेयांनी सांगितले. त्यांच्या पिकलेल्या केळी च्या प्रति घडाचे वजन 36 ते 38 किलोपर्यंत भरत असून पहिल्या तोडणीत नऊ टन 130 किलो व अन्य खर्च असे 78 हजार रुपये हाती आले.अजुनही दहा ते अकरा टन उत्पन्न येत्या पंधरवड्यात निघेल. एकंदरीत विचार केला तर अवघ्या तीस गुंठ्यात दीड लाख रुपये त्यांच्या हाती आले आहेत.
Published on: 24 January 2022, 06:43 IST