अलीकडे देशातील नागरिक शेतीकडे मोठे आकृष्ट होतं आहेत. सुशिक्षित लोक देखील आता शेती करू लागले आहेत, विशेष म्हणजे शेती करतच नसून शेतीतुन चांगली कमाई देखील करत आहेत. शेती समवेतचं पशुपालन देखील आता मोठ्या प्रमाणात केले जाऊ लागले आहे. मध्य प्रदेश राज्यातील बुरहानपूर जिल्ह्यातील तुषार नेमाडे यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये डिझाईन अभियंता पदावर काम केले. या काळात त्यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांची भेट घेतली.
त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तुषारने शेळीपालन सुरू केले. आज ते या व्यवसायातून लाखो रुपयांचा नफा कमावत असून आजूबाजूच्या तरुणांसाठी ते प्रेरणास्त्रोत बनले आहेत. त्यांचा शेळीपालन 27 एकरात पसरलेला आहे. येथे शेळ्यांना राहण्यासाठी सुसज्ज सेड बांधण्यात आले आहे.
तुषार सांगतो की, कामाच्या दरम्यान त्याची भेट एका पशुवैद्यकीय डॉक्टरांशी झाली. त्यांच्यामुळे प्रभावित होऊन तुषारने व्हेटर्नरीमध्ये डिप्लोमा केला आणि अतिशय विचारपूर्वक शेळीपालनाचा व्यवसाय स्वीकारला. शेळीपालन सुरू करण्यापूर्वी त्यांनी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर 6 महिन्यांसाठी एक छोटासा प्रयोग म्हणून हा व्यवसाय सुरु केला गेला. यशस्वी झाल्यावर, 1000 ते 1200 शेळींचे शेळी फार्म स्थापन केले. आता तुषार शेतकऱ्यांना यशस्वी शेळीपालनासाठी प्रशिक्षणही देत आहे.
शेळीपालनामध्ये शेळी-मेंढी आणि त्यांचे करडे यांचे गुणोत्तर सतत राखावे लागते. मित्रांनो आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, तुषारकडे प्रजननासाठी नेहमी 40 शेळ्या आणि 10 बोकड असतात. शेळीपालनाचे योग्य तंत्र अवलंबल्यामुळे त्यांच्याकडे वर्षभरात 120 करडे विक्रीसाठी तयार होतं आहेत.
करडाचे वजन सरासरी 25 किलो झाले की, शेळी 10 ते 12 हजारांना सहज विकली जाते. अशा प्रकारे 100 करडे विकली तरी 10 ते 12 लाखांचे उत्पन्न मिळते. यापैकी, संगोपनावरील अडीच लाखांपर्यंतचा खर्च वजा केल्यावर तुषारचा निव्वळ नफा सात ते आठ लाखांवर येतो. मात्र यासाठी तुषार मार्केटिंगचीही विशेष काळजी घेतो. म्हणजेच शेळ्या बाजारात कधी आणाव्यात, ही वेळ फार महत्त्वाची आहे.
तुषार प्रमाणे शेळीपालन व्यवसायातून बंपर उत्पन्न प्राप्त करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागणार एवढं मात्र नक्की. उदाहरणार्थ, शेळ्यांच्या वेगवेगळ्या जातींसाठी स्वतंत्र गोठे अथवा शेड असावे. लहान प्राण्यासाठी सरासरी 5 चौरस फूट आणि मोठ्या प्राण्यासाठी 10 चौरस फूट जागा असणे महत्वाचे राहणार आहे.
त्याचप्रमाणे शेळीपालन सुरू करताना शेळ्यांच्या जातीची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी लागणार आहे. तुषारने आपल्या शेतात उस्मानाबादी, जमनापारी, सिरोही, सोजत, आफ्रिकन बोर आणि बारबरी या जाती निवडल्या. तसेच शेतातील शेळ्यांचे उत्तम संगोपन करण्यासाठी त्यांच्या आहार व्यवस्थापनाची विशेष काळजी घ्यावी लागते. वेगवेगळ्या वयोगटातील शेळ्यांना भिन्न आहार लागतो. यामुळे शेळ्यांच्या आहारावर देखील विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
आहाराव्यतिरिक्त शेळ्यांच्या आरोग्याची देखील विशेष काळजी घेणे हे या व्यवसायातील यशाचे गमक आहे. विविध आजारांमुळे जनावरांचा अकाली मृत्यू झाल्यास मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे आजारी शेळी वेळेत ओळखून त्यावर उपचार करणे अतिशय महत्वाचे ठरते. याशिवाय, 3-4 प्रकारचे लसीकरण देखील शेळ्यांसाठी करावे लागते असे केल्यास शेळ्या आजारी पडणार नाहीत. अशाप्रकारे पद्धतशीर आणि तांत्रिक आधार घेतल्यास शेळीपालन व्यवसायातून दुप्पट नफा मिळु शकतो.
Published on: 01 May 2022, 10:55 IST