शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी अनेक वस्तूंची गरज पडते, मात्र यामध्ये अनेक महाग गोष्टींमुळे त्या वस्तू प्रत्येकाला घेणे परवडत नाही. यामुळे शेतकरी वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. असे असताना एका शेतकऱ्याने असेच काहीसे केले आहे. इस्लामपूर येथील कुमार पाटील या तरुणाने फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव आणि कौशल्ये वापरत चारचाकी गाडीची निर्मिती केली आहे. दुचाकीच्या इंजिनचा वापर केलेली चारचाकी गाडी शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. शेतीमध्ये अंतर्गत मशागतीची कामे या गाडीने सहज करता येत आहेत. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे.
गेल्या एका वर्षांपासून त्यांची ही खटपट सुरूच होती. या गाडीची अंतिम चाचणी यशस्वी झाल्याने कुमार पाटील यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. त्यांची मेहनत कामी आली आहे. रविवारी त्यांनी या गाडीची अंतिम चाचणी घेतली. कोळपणी, नांगरट, पेरणी तसेच औषध फवारणी या शेती कामासाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे. या गाडीला जास्त जागा देखील जास्त लागत नाही. तसेच पशुखाद्याची पोती वाहतूक तसेच वैरणीसाठी देखील ही गाडी फायद्याची आहे. ही गाडी १ लिटर पेट्रोलमध्ये १ एकर क्षेत्रातील कोळपणीचे काम करत आहे.
विष्णूनगर येथे पाटील यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. गेली वीस वर्षे ते व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना छोटी-छोटी सायकल कोळपी व इतर लोखंडी अवजारे बनवून देत आहेत. हे करत असतानाच शेतकऱ्यांना उपयुक्त असे नवीन काही करता येईल का? याचा विचार त्यांनी केला. आणि यामधूनच या गाडीचा शोध लागला. यामुळे परिसरातील शेतकरी ही गाडी बघण्यासाठी आवर्जून येत आहेत.
त्यांनी १०० सीसी इंजिन घेत त्यापासून चारचाकीची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. घरामध्ये सर्वांचा विरोध असताना दोनवेळा तयार झालेल्या चारचाकी गाडीचा सांगाडा मोडीत काढला. नवनिर्मितीचा ध्यास घेत पुन्हा ही गाडी तयार केली. गाडी तयार करीत असताना स्टेरिंगऐवजी हॅण्डलचा वापर केला. तसेच रिव्हर्स घेयर तसेच अवजारांची जोडणी कशी करता येईल, यासाठी त्यांनी अनेकांशी चर्चा केली, यावर त्यांनी मोठी मेहनत घेऊन त्यांनी शेवटी ही गाडी तयार केली आहे. आता यामधून अनेक कामे उरकली जात आहेत. यामुळे वेळेची मोठी बचत होत आहे.
Published on: 17 January 2022, 01:58 IST