कृषी क्षेत्रापुढे नवे-नवे आव्हाने आज उभे राहिलेले आपण पाहत आहोत. ती आव्हाने पेलण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी नव्या दमाचे सक्षम नेतृत्व हवे आहे आणि हे नेतृत्व तयार करण्यासाठी फाली सारख्या संमेलनातून प्रयत्न केले जात आहेत. आठवी आणि नववीतील विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रामध्ये आवड निर्माण व्हावी आणि कृषी क्षेत्रातील विविध प्रश्नांवर त्यांनी मार्ग शोधावा यासाठी संमेलनातून प्रयत्न केले जात आहे. गेल्या पाच वर्षापासून फाली हे संमेलन.
जळगावच्या जैन हिल्स परिसरामध्ये आयोजित केले जात आहे. 24 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान दोन टप्प्यात हे संमेलन पार पडले, या संमेलनातील विविध पैलूंचा घेतलेला हा वेध....फ्यूचर अॅग्रीकल्चर लीडर ऑफ इंडिया (एफएएलआय) हा भारतातील एक अद्वितीय, परिवर्तनशील कृषी शैक्षणिक कार्यक्रम आहे. येणार्या पिढीच्या मनात कृषी क्षेत्राच्या संदर्भात जाणीव आणि जागृती निर्माण व्हावी यासाठी या कार्यक्रमातून प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे नव्या पिढीतील मुलांच्या मनात कृषी क्षेत्राबद्दल आकर्षण तर आहेच पण कृषी क्षेत्रात बदल घडवून आणण्याची जिद्द देखील आहे. फाली संमेलनाचे लक्ष्य विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे विचार बदलणे आणि आधुनिक शेती व कृषी-उद्यम क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तरुणांची क्षमता वाढवणे असा आहे.
भविष्यकालीन शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी:
आज शेती आणि शेतकर्यांच्या समोर अनेक प्रश्न उभे आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी आणि प्रशासन देखील प्रयत्न करत आहे. मात्र त्यातून समाधानकारक मार्ग निघालेला दिसत नाही. कारण शेतकर्यांच्या जीवनामध्ये अद्यापही समाधानाची पहाट उगवलेली नाही. शेतीतील दृष्टचक्र थांबायचे नाव घेत नाही, त्याचा परिणाम असा झाला आहे की येणारी पिढी शेतीपासुन दूर जाण्याची भिती निर्माण झाली आहे. सर्वांचा ओढा शहरांकडे असल्याचे आपण पाहतो आहोत. कारण शहरात रोजगाराच्या काही प्रमाणात संधी असल्याने तेथे जगण्याचे प्रश्न सुटू शकतात, असे सर्वांना वाटू लागले आहे. या सर्व प्रकारातून दुसरा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, तो म्हणजे शेतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
नवी पिढी जर शेतीकडे वळली नाही तर भविष्यात शेती करणारेच उरणार नाहीत, शेतीकडे नव्या पिढीने शेतीकडे वळावे यासाठी ठोस प्रयत्न केले जायला हवे. ‘फाली’ संमेलन हे त्याच ठोस प्रयत्नांच्या दिशेने टाकलेले दमदार पाऊल म्हणता येईल. कारण ‘फाली’ हे संमेलनातून नव्या पिढीच्या मनात शेती आणि शेतीपुरक उद्योगांच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचे कार्य होत आहे. हे कार्य करण्यासाठी अमेरिकेतून आलेल्या नॅन्सी बेरी यांनी पुढाकार घेतला आहे, हे विशेष. जैन इरिगेशन आणि अॅक्शन प्लॅटफार्मच्या माध्यमातून भविष्यकालीन शेती समोरील प्रश्न सोडवण्यासाठी नॅन्सी बेरी या काम करतात. भारतातील शेती समोरील आव्हानांचा अभ्यास करून त्यांनी विद्यार्थ्यांना शेतीशी जोडण्याचा कार्यक्रम तयार केला. हाच कार्यक्रम ‘फाली’ या नावाने गेल्या पाच वर्षांपासून जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. च्या प्रांगणात सुरू झालेला आहे.
‘फाली’चे प्रत्यक्ष कार्य:
महाराष्ट्र आणि गुजरात मधील काही शाळांमध्ये कृषी विषयक आवड असलेल्या आठवी आणि नववीतील विद्यार्थ्यांची निवड यासाठी करण्यात आली. 2014 पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शेतीचे प्रात्याक्षिकांसह शिक्षण मिळावे यासाठी जैन इरिगेशनेतर्फे निवडलेल्या शाळांत ग्रीनहाऊस व शेडनेटची उभारणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना शेती विषयक परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी आठवड्यातून एक तास शेतीचा ठरविण्यात आला. शेतीतील अडचणी आणि त्यावर उपाय योजनांबाबत तसेच कृषी अर्थशास्त्राचे व्यवहारीक शिक्षण दिले जाते. वर्षभर या विद्यार्थ्यांना शेती आणि शेतीसमोरील अडचणी, प्रश्न आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग याबाबत सखोल माहिती तज्ञांच्या माध्यमातून दिली जाते.
आधुनिक शेती कशी करावी, पशु-पालनासारखे शेती पुरक उद्योग कोणते असू शकतात, ते कसे केले पाहिजे या बाबतही विद्यार्थ्यांना सांगितले जाते. वर्षभर विद्यार्थी या सर्व गोष्टी आत्मसात करतात. वर्षभरात विविध स्पर्धा घेतल्या जातात जसे कृषी विषयक मॉडेलचे सादरीकरण करणे आणि शेती उत्पादनांच्या व्यवसायासाठी भविष्यकालीन योजना तयार करणे. या स्पर्धांतून संपूर्ण राज्यातून आलेल्या निवडक विद्यार्थ्यांचे सादरीकरण फालीच्या वार्षिक संमेलनात केले जाते. त्यातून मग कृषी मॉडेल आणि व्यवसाय वृद्धी मॉडेल प्रत्येकी पाच-पाच निवडले जातात. त्यातील काही व्यवसाय मॉडेलला चालना दिली जाते आणि त्याच्या वाढीसाठी सहकार्य केले जाते. जैन इरिगेशन बरोबरच ‘फाली’ला गोदरेज अॅग्रोवेट, युपीएल, बायर, स्टार अॅग्री या सारख्या कंपन्यांचे सहकार्य लाभत आहे.
‘फाली’ सारख्या उपक्रमांची आपल्या देशाला खर्या अर्थाने गरज आहे. त्यामुळेच शेतीच्या समोरील प्रश्नांची उत्तरे शोधली जाणार आहेत. नव्या पिढीच्या मनात शेती विषय आस्था निर्माण करण्यासाठी अशा सामुहीक प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी देशातील मोठ्या संस्था, कंपन्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
‘फाली’ने घडवला बदल (विद्यार्थी प्रतिक्रीया):
फुल शेतीकडे वळलो
अथर्व गिरीगोसावी (भारतमाता विद्यालय, मायणी सातारा)
दोन वर्ष फाली मध्ये सहभागी झाला होतो. वडील प्रदीप गिरीगोसावी यांना शेवंती फुलांची लागवड औषधी वनस्पती शतावरी या पिकाबरोबर घेण्यास पटवून सांगितले. फाली माती परीक्षण आठवड्यात माती परीक्षण केले आणि खताची मात्रा निश्चित केली. आमच्या शेतात शेवंती फुलाची जुलैमध्ये आणि शतावरीची ऑक्टोबरमध्ये एका एकरात लागवड केली. त्यांना नोव्हेंबरमध्ये 75 ते 80 किलो फुलांचे उत्पादन प्रत्येक दिवशी मिळाले आणि हे उत्पादन मे महिन्यापर्यंत असेच मिळत राहील. स्थानिक बाजारपेठेत 40 रूपये प्रती किलो असा दर मिळाला. शतावरीचे उत्पादन तर नोव्हेंबर 2019 पासून पुन्हा मिळू लागेल. दोन लाख रूपयांचा नफा होईल आणि निव्वळ उत्पन्नात 40 टक्के वाढ होईल असे वाटते.
गोचीड नियंत्रणात आणली
जीवन बनकर (सोमश्वर विद्यालय, अंजगाव, बारामती)
आमच्याकडे दुध उत्पादनाच व्यवसाय केला जातो. गोचिडीसारखा कीटक हा एक मोठा रोग गुरांवर पडतो. फालीच्या पाचव्या अतिथी सत्रात, कडूलिंबाच्या बिया आणि पानांचा अर्क हा गोचीड नियंत्रण करण्यास परिणामकारक आहे हे लक्षात आले. त्यानुसार मी गोचीड नियंत्रण करण्याचा निर्णय घेतला आणि लक्षात आले की हे मिश्रण पर्यावरणपूरक असून ते आर्थिकदृष्टया परवडण्यासारखे आहे. आमच्या शेजारील शेतकर्यांना देखील मी ही माहिती दिली त्यामुळे त्याचा त्यांना देखील लाभ झाला आहे.
पॉलीहाऊसकडे वळलो
साक्षी सुरेश (श्री संत मुक्ताबाई विद्यालय शेलगाव, पुणे)
एका कृषी विज्ञान केंद्राच्या फाली शिवार भेटीत, पॉलीहाऊसच्या उपयोगाने पिकांच्या उत्पादनात आधुनिक कृषी तंत्रांचे फायदे प्रत्यक्ष मी बघितले. वडिलांना शिवारभेटीला बोलावून त्यांना पॉलीहाऊसमधील शेतीचे फायदे समजावून सांगितले. त्यामुळे माझे बाबा आता पॉलीहाऊसमध्ये लाल ढोबळी मिरची आणि काकडीचे पिकाची लागवड करतात.
शेळीपालन व्यवसाय सुरू केला
राहूल पारामा चव्हाण (नवजीवन सेकंडरी आश्रम स्कुल, अंबातांडा, औरंगाबाद)
फालीच्या विविध सत्रांमुळे आणि शिवार भेटींमुळे प्राण्यांच्या कार्यक्षम प्रजनन पद्धतींबद्दल माहिती मिळाली. त्याने वडिलांना एक शेळी प्रजनन केंद्र सुरू करण्यास सांगितले. त्याच्या वडिलांनी 4 बकरे खरेदी केले आणि नवीन व्यवसाय सुरू केला. आता नफा मिळवल्यानंतर, त्यांच्याकडे 25 बकरे आहेत. म्हणजेच त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात जवळजवळ 70 टक्के इतकी वाढ झाली.
दुध व्यवसाय वाढवला
सोनाली हांडगे (कर्मवीर अॅडव्होकेट जनता विद्यालय, चाटोरी, नाशिक)
फालीच्या एका शिवारभेटीत, प्रगतीशील दूध उत्पादन व्यवसायिकाचा अभ्यास केला आणि उच्च दूध उत्पादन देणार्या म्हशींच्या जातींचे प्रजननाचे फायदे समजून घेतले. मी वडिलांना दोन मुर्हा जातीच्या म्हशी पाळायला सांगितले. त्यापूर्वी वडिल फक्त स्थानिक जातीच्या म्हशी पाळत. आता ते दररोज 7 ते 8 लिटर दूध या म्हशीपासून मिळते आणि त्यांच्या निव्वळ उत्पन्नात यामुळे 20 टक्के वाढ झाली.
कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला
लकी प्रयाकर (जिजामाता विद्यालय, खापा, नागपूर)
एका प्रगतीशील शेतकर्याच्या शेताला भेट दिल्यानंतर कुक्कुटपालन हा एक खूप नफा देणारा कृषीपूरक व्यवसाय आहे हे समजले. वडिल आणि भावाच्या मदतीने कोंबडीपालन सुरू करण्याचे ठरवले. कुक्कुट पालनाविषयी फालीच्या सत्रांमधून आणि शिवार भेटींमुळे त्याचे व्यवस्थापन समजले. तीन साथीदारांसह 3,000 चौरस फूट जागा भाड्याने घेतली आणि तिथे कोंबडीपालन व्यवसाय चालू केला. चार महिन्यापूर्वी करार करून 5,000 कडकनाथ कोंबड्यांची पिले 3.75 लाखांचे कर्ज देना बँकेतून घेऊन विकत घेतली. तसेच त्यांनी इरेटस् प्रा. लि. बरोबर कडकनाथ परत विकत घेण्याचा करार केला आणि या कराराच्या पूर्तीनंतर अंदाज आहे की 32 लाख रूपयांचा नफा त्यांना होईल.
लेखक:
श्री. दिनेश दिक्षित
(जैन इरिगेशन, जळगाव)
९४०४९५५२४५
Published on: 16 October 2019, 01:13 IST