पुण्यातील मावळमध्ये इंजिनिअर अश्विन अरुण काशीद आणि केतकी अरुण काशीद या बहिण भावाने सोनचाफ्याची शेती सुरू केली आहे. दोघेही उच्चशिक्षित असून त्यांना शेतीची आवड आहे. ते सकाळपासून आई वडिलांसोबत शेतात काम करतात. सोनचाफ्याची फुले वर्षातून आठ महिने येतात.
सोनचाफा शेतीतून खर्च वगळून त्यांना वर्षाला २.५ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत असल्याचे अश्विनने सांगितले आहे. अश्विन सिव्हिल इंजिनिअर आहे, तर बहीण केतकी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर आहे. अश्विनला फोटोग्राफीचीही आवड आहे. पण, त्यांना शेतीत विशेष रस आहे. वडील अरुण काशीद हे मावळ परिसरातील इंदोरी येथे पारंपरिक शेती करायचे.
ऊस, टोमॅटो, धान्ये लावली. मात्र, अश्विनला आपण काहीतरी वेगळं करायचं होतं. सोनचाफा शेतीची माहिती त्यांनी घेतली आणि सोनचाफ्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. बहीण, आई आणि वडिलांच्या मदतीने त्यांनी सोनचाफ्याची तीन वर्षांची रोपे लावली. अश्विन सांगतो की, त्याची बहीण केतकी हिनेही त्याला योग्य सल्ला देऊन पाठिंबा द्यायची.
रात्रंदिवस मेहनत करून सोनचाफ्याला अखेर फुले आली. पण तोपर्यंत करोनाने भारतात घुसखोरी केली आणि त्याचा थेट फटका अश्विनला बसला. लॉकडाऊनमुळे बाजारपेठाही बंद होत्या. रोज हजारो फुले उमलताना पडत असत. अश्विनला लाखोंचे नुकसान सहन करावे लागले, पण त्याने हार मानली नाही. सध्या सोनचाफ्याच्या शेतीतून अश्विनला दिवसाला हजारो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
तो जवळपासच्या बाजारात दिवसाला १००० ते २००० फुलं विकतो. सहसा ही फुले देवाच्या चरणी, हॉटेल्समध्ये पाहुणचारासाठी वापरली जातात. दहा फुलांचे पाकीट बनवले जाते. ते बाजारात १०-२० रुपयांना विकले जातात, असे अश्विनने सांगितले. अश्विन अवघ्या अर्ध्या एकरात चाफ्याची लागवड करत आहे. अश्विन आणि केतकी नोकरी न शोधता कष्टाने शेतीतून लाखो रुपये कमवत आहे.
Published on: 29 May 2022, 10:53 IST