त्रिपुरामधील विक्रमजीत चकमा या युवा शेतकऱ्यानं कमाल करुन दाखवली आहे. विक्रमजीत चकमा याचं वय अवघ 32 वर्ष आहे. विक्रमजीत चकमा यानं काश्मीरमधील बेर सफरचंदाची यशस्वी शेती केली आहे. कष्टाच्या जोरावर पहिल्याच हंगामात त्याला 6 लाख रुपयांची कमाई झाली आहे. चकमा याची बेर सफरचंदाची शेती पाहून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळतेय. त्रिपुराच्या डोंगरी भागात बेर सफरचंदाची लागवड करण्याचा शेतकऱ्यांचा मानस आहे.
3.5 लाखांचा नफा
त्रिपुरा राज्य पूर्व भारतात येत असून तेथील प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. विक्रमजीत चकमानं त्याच्या शेतीमध्ये बेर सफरचंदाची शेती सुरु केली. पश्चिम बंगालमधून आणलेली रोपं त्यांनी सव्वा एकर शेतीमध्ये लावली. पहिल्याच हंगामात सर्व खर्च वजा जाता विक्रमजीत चकमा याला साडेतीन लाखर रुपयांचा फायदा झाला आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी देखील त्याचं कौतुक केलं आहे. चकमा त्रिपुराच्या पूर्वेकडील पेंचरथाल येथील आहेत. बेर सफरचंदाविषयी त्यांना बांग्लादेशमधून माहिती मिळाली.
इंटरनेटवर माहिती मिळाली
विक्रमजीत चकमा यांनी बेर सफरचंदाच्या शेती विषयी इंटरनेटवरुन माहिती मिळवली. यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की बांग्लादेशमध्ये बेर सफरचंदाची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. बांग्लादेश आणि त्रिपुराचं वातावरण साऱखंच असल्यानं विक्रमजीत चकमा यांनी पश्चिम बंगालमधून 1300 रोप अडिच लाखर रुपये खर्चून विकत घेतली. गेल्यावर्षी मार्च महिन्यात रोपं लावण्यात आली. यंदा जानेवारीपासून सफरचंद मिळण्यास सुरुवात झाली.चकमा यांनी बाजारात आणि मार्केटमध्ये सफरचंद विकून 6 लाखांची कमाई केली. खर्च वजा जाता त्यांना साडेतीन लाख रुपयांचा फायदा झाला आहे.
अपेक्षेपेक्षा जास्त कमाई
विक्रमजीत चकमा यांनी त्यांना सफरचंद शेतीतून अपेक्षेपेक्षा जास्त कमाई झाल्याचं म्हटलं आहे. पश्चिम बंगालमधून रोपं आणली तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळेल, असं वाटलं नव्हतं. चमका पुढील हंगामात सफरचंदाच्या वेगळ्या प्रजातीची लागवड करण्याच्या तयारीत आहेत. स्थानिक शेतकरी देखील आता सफरचंद शेतीकडे वळू लागले आहेत.
स्रोत टीव्ही 9 मराठी
प्रतिनिधी गोपाल उगले
Published on: 26 June 2021, 03:03 IST