भारतात शेतकरी बांधव शेती मध्ये नेहमीच बदल करत आले आहेत. या बदलांचा त्यांना फायदा देखील मिळत आहे. सध्या शेतकरी बांधव अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होणारे पिकांची लागवड करताना बघायला मिळत आहेत. अल्प कालावधीत तसेच कमी खर्चात उत्पादन देणाऱ्या पिकांची सध्या मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे.
अशाच अल्पकालावधीत आणि कमी खर्चात काढणीसाठी येणारे पीक आहे सूर्यफुल. गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील शेतकरी बांधव या पिकाची शेती करत आले आहेत. देशातील आता बहुतांशी शेतकरी सूर्यफूल सारख्या नगदी तसेच औषधी वनस्पतींची शेती करू लागले आहेत आणि विशेष म्हणजे यातून शेतकऱ्यांना चांगला बक्कळ पैसा देखील उपलब्ध होत आहे.
गुजरात राज्यातील सुरेन्द्रनगर येथील एका शेतकऱ्याने देखील सूर्यफुलाच्या शेतीतुन चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले असून लाखो रुपये कमवीत आहेत. सुरेन्द्रनगर येथील मगन परमार यांनी दीड एकर बागायती शेतीत सूर्यफूल लागवड करून अडीच लाख रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे.
महत्वाच्या बातम्या:
भावा फक्त तूच रे…! 10 गुंठ्यात ब्रॉकोली लागवड केली अन मिळवलं 2 लाखांचे उत्पन्न; वाचा काय होतं नियोजन
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर केवळ 25 रोपांची केली लागवड
मगन परमार सांगतात की, एका ओळखीच्या व्यक्तीकडून त्यांना बाजारात सूर्यफूल तेल चांगल्या दराने विकले जाते असे समजले. एवढेच नाही तर सूर्यफुलांच्या बियांनाही मोठी मागणी असून बाजारात त्याला चांगला दर मिळत आहे असे समजले.
यानंतर त्यांनी सूर्यफूलाची शेती करण्याचा निर्धार केला. मात्र असे असले तरी अनोळखी पीक असल्याने, सुरुवातीला त्यांना याची भीती वाटली. त्यांना याच्या शेतीविषयी काहीच माहिती नव्हती. शिवाय त्यांच्या जमिनीत याचे चांगले उत्पादन होईल की नाही याची देखील त्यांना कल्पना नव्हती म्हणूनच मग त्यांनी सुरवातीला केवळ 25 बियाण्याची पेरणी करून सुरुवात केली.
प्रयोग झाला यशस्वी
मगन परमार यांनी केलेला सूर्यफूल लागवडीचा प्रयोग प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर त्यांना खात्री पटली की त्यांच्या जमिनीत सूर्यफुलाची लागवड केली जाऊ शकते. यानंतर त्यांनी गेल्या वर्षी दीड एकर जमिनीवर सूर्यफुलाची लागवड केली.
चांगली गोष्ट म्हणजे पहिल्या वर्षीच चांगले उत्पादन झाले. बिया आणि फुले दोन्ही चांगल्या प्रमाणात तयार झाली. त्यानंतर त्यांनी त्यापासून तेल तयार करून सुरेंद्रनगर व परिसरात विकण्यास सुरुवात केली. सामान्य सूर्यफूल तेलाची किंमत 180 रुपयांपर्यंत आणि सेंद्रिय सूर्यफूल तेलाची किंमत 260 रुपयांपेक्षा जास्त असल्याचे त्यांनी नमूद केले. मगन म्हणतात की, सूर्यफूल शेतीचे त्यांचे पहिले वर्ष आहे आणि त्यांना बाजाराची अजून व्यवस्थित माहिती नाही.
त्यामुळे यंदा थोडी कमी कमाई झाली असली तरी भविष्यात चांगली कमाई होण्याची अपेक्षा आहे. मोठ्या शहरांमधून येणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे आणि त्यांचे उत्पादन खरेदी करण्यात रस दाखवला आहे. निश्चितच आगामी काळात श्रीमान परमार सूर्यफूल शेतीतून अजून अधिक कमाई करू शकतील. पहिल्याच वर्षी मिळालेल्या या दर्जेदार उत्पादनामुळे परमार यांनी इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श काम केले आहे.
Published on: 09 May 2022, 07:01 IST