फलोत्पादन पिकांकरिता भौगोलिक चिन्हांकनाचे महत्व

26 September 2019 05:29 PM


सन 1995 साली प्रथमच कृषीचा जागतिक व्यापार करारामध्ये सामावेश करण्यात आला. त्यामुळे सदर करारानुसार जागतिक बाजरपेठ खुली झालेली आहे. जागतिक व्यापार करारांतर्गत विविध करार करण्यात आलेले असून त्यामध्ये TRIPS (Trade Related Intellectual Property Right) हे पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्क नोंदणी करण्याकरीती महत्वाचे करार आहेत. या करारानुसार भौगौलिक क्षेत्राशी निगडीत उत्पादित मालास संरक्षण देण्यासाठी संसदेने दि. 30.12.1999 The Geographical Indication of Goods (Registration & Protection) पारीत केला आहे.

सदर कायद्याच्या अंतर्गत बौद्धीक संपदा हक्क (Intellectual Property Right) अंतर्गत कृषी मालाकरीता भौगोलिक चिन्हांकन करण्याचे काम जिओग्राफिकल इंडीकेशन रजिस्ट्रेशन व प्रोटेक्शन कायदा 1999 अंतर्गत नोंदणी करण्याकरीता एकूण 34 विभागात विभागणी केलेली आहे. त्यामध्ये मशीनरी औद्योगिक उत्पादने, वैद्यकिय उपकरणे, कपडे, सौंदर्यप्रसाधने, सिंचन ऊर्जा, कृषी, फलोत्पादन, कुक्कुटपालन, डेअरी इ. समावेश आहे. कृषी व फलोत्पदनाचा समावेश, वर्गवारी क्रमांक 31 मध्ये करण्यात आली आहे.

जागतिक बाजार पेठामध्ये ट्रेडमार्कला (व्यापारी चिन्ह) जसे महत्व प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे भौगोलिक क्षेत्राशी निगडीत कृषी मालाची गुणवत्ता सातत्य व विशेष गुणधर्माबाबत भौगोलिक चिन्हांकन नोंदणीस विशेष महत्व प्राप्त झाले आहे. भारतामध्ये बहुतांश कृषी माल मानवनिर्मित तयार करण्यात येणार्‍या काही कृषी मालाची स्वत:ची अशी खास गुणवत्ता आहे, ओळख आहे. त्या कृषी मालाचीही गुणवत्ता वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या चालत आलेले आढळून येते. त्यामध्ये तसुभरही फरक पडलेला नसतो. त्या मालाच्या खास गुणवत्तापुर्ण उत्पादनामध्ये त्या विशिष्ट प्रदेशामध्ये सातत्य राखलेले आढळून येते. तेच उत्पादन इतर ठिकाणीही तशाच प्रकारच्या हवामानात किंवा जमिनीत घेतले जाते. 

त्या कृषी मालाला अशी खास गुणवत्ता येत नाही. कारण अशी खास गुणवत्ताही त्या त्या प्रकारच्या विशिष्ठ क्षेत्राशी प्रदेशाशी निगडीत असते. त्या खास गुणवत्तापुर्ण उत्पादनासाठी वापरावयाची विशिष्ठ उत्पादन पद्धती, तंत्र, मनुष्य बळाचे कौशल्य हे त्या विशिष्ठ ठिकाणी पिढानपिढ्या विकसित झालेले असते. त्या खास गुणवत्तेची त्या प्रदेशाशी किंवा क्षेत्राशी नाळ जोडलेली असते. ही खास गुणवत्ता ही त्या प्रदेशाची संपत्ती असते. मालमत्ता असते. ती त्यांची खास गुणवत्ता ही त्या त्या भागातील क्षेत्रांशी संबंधित असल्यामुळे खास प्रसिद्ध आहे. यामध्ये अगदी ठळक उदाहरण द्यायचे म्हणजे देशपातळीवरील बासमती तांदुळ, दार्जिलिंग चहा, राज्याच्या पातळीवरील महाबळेश्‍वरची स्ट्रॉबेरी अशी देती येतील. अशा गुणसंपन्न मालाचे कायदेशीर संरक्षण करणे आवश्यक आहे. जागतिक व्यापार करारातील TRIPS (Trade Related Intellectual Property Right) करारानुसार प्रत्येक सदस्य देशास स्वत:च्या निर्मिती मालाच्या संरक्षणासाठी कायदेशीर तरतुदी करण्याचे अधिकार दिलेले आहेत.


जिओग्राफीकल इंडीकेशन किंवा भौगोलिक नोंदणी हे एक प्रकारचे मानांकन नोंद (GI) आहे. जे भौगोलीक क्षेत्राशी निगडीत आहे. हे कृषी क्षेत्रातील नैसर्गिक व उत्पादीत मालाची ओळख करण्यास उपयुक्त असून त्याद्वारे त्याची खास गुणवत्ता गुणवत्तेतील सातत्य व त्याच्यामधील विशेष गुणधर्माचे जतन करण्यासाठी हे चिन्हांकन उपयुक्त आहे.

भौगोलिक चिन्हांकन हा सामुहिक हक्क आहे. जेव्हा एखादा शेतकरी समूह पिक पिकवितो किंवा पदार्थ बनवितो, तेव्हा त्याला तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार काही गुणधर्म, वैशिष्ठ्ये मिळालेली असतात. त्यामुळे त्या पिकाची किंवा उत्पादनाची विशेष गुणवत्ता निर्माण होते. तेथील हवामान, माती आणि पाणी यांचा त्या उत्पादनावर परिणाम झालेला असतो. त्यामुळे त्या उत्पादनाला एक वैशिष्ठ्य प्राप्त झालेले असते. या वैशिष्ठ्यपुर्ण उत्पादनाची बौद्धिक संपत्ती म्हणून भौगोलिक उपदर्शन (नोंदणी व संरक्षण) अधिनियम 1999 या कायद्याखाली नोंदणी करून त्याला संरक्षण देणे म्हणजेच भौगोलिक चिन्हांकन नोंदणी होय.

भौगोलिक चिन्हांकन नोंदणी करण्याचे फायदे आपण लक्षात घेतले तर हे काम आपण अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. या उत्पादनांची कायद्याअंतर्गत नोंदणी होत असलेने भौगोलिक क्षेत्राशी निगडीत मालास कायदेशीर सरंक्षण प्राप्त होते. भौगोलिक चिन्हांकन कायद्याखाली नोंदणी केल्याने इतरांनी त्याबाबत अनधिकृत वापर केल्यास त्याला त्यापासून रोखता येते. भौगोलिक चिन्हांकीत मालास निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होतात. अशा नोंदणीकृत कृषी मालाचा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रॅण्ड विकसित होण्यास मदत होते. व्यापारी चिन्हाला बाजारपेठेत जे महत्व असते. तेच महत्व कृषी मालाच्या भौगोलिक चिन्हांकानास असते. त्यामुळे अशा नोंदणी केलेल्या उत्पादनाच्या उत्पादकाला जास्तीचे आर्थिक उत्पन्न मिळून त्याच्या उन्नतीस हातभार लागतो.


अर्जदार संस्था कोणीही असली तरी त्या पिकाच्या भौगोलिक क्षेत्रामधील इतर शेतकर्‍यांनासुद्धा या नोंदणीचा फायदा घेता येतो. जिओग्राफिकल इंडिकेशन अंतर्गत 10 वर्षाकरिता नोंदणी केली जाते. दर दहा वर्षांनी पुढील दहा वर्षाकरीता नुतणीकरण करणे आवश्यक असते. जर जिओग्राफीकल इंडिकेशनचे नुतणीकरण केले नाही तर नोंदणी आपोआप रद्द होते हे या ठिकाणी राज्यातील अर्जदार संस्थांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. फक्त नोंदणी करून उपयोग होणार नाही. नोंदणीनंतर संबंधित मालाची गुणवत्तेमध्ये सातत्य राखणे, बिगर सभासद शेतकर्‍यांनासुद्धा याचा लाभ देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. या मालाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एक गुणवत्तापुर्ण ब्रॅण्ड म्हणून विकसित करणे हे यापुढे सर्व अर्जदार संस्थांनी काम करावयाचे आहे. आपल्या देशात जीआयची नोंदणी झाल्यानंतर परदेशामध्ये विशेषत युरोपियन युनियनमध्ये या उत्पादनांचे प्रोटेक्टीव्ह जीआय अंतर्गत नोंदणी करता येते.


भौगोलिक चिन्हांकन नोंदणी अंतर्गत सन 2015 अखेर 295 विविध क्षेत्रातील मालाची नोंदणी जीओग्राफीकल इंडीकेशन रजिस्ट्री कार्यालयामार्फत झालेली आहे. त्यामध्ये 73 कृषी मालाचा समावेश आहे. त्यामध्ये राज्यातील 24 कृषीमालाचा समावेश आहे. त्यापैकी वरील 5 कृषी मालास यापुर्वीच भौगोलिक मानांकनाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असून राज्यातील विविध भागामध्ये उत्कृष्ट दर्जाचे फळे व भाजीपाला उत्पादन घेतले जाते. विविध फळे व भाजीपाल्याची ओळख त्या त्या भागातील वैविध्यपुर्ण बाबीकरीता प्रसिद्ध आहेत म्हणून त्या भागाची ओळख पिकाच्या नावाने प्रसिद्ध आहे. वरील वस्तूस्थितीचा विचार करून सदर पिकाच्या गुणवत्तेस हमी भाव मिळण्याचे दृष्टीकोनातून भौगोलिक चिन्हांकन नोंदणीस विशेष महत्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील एकूण 24 कृषी मालाची नोंदणी झालेली आहे.


राज्यातील वैविध्यपूर्ण उत्पादन होणार्‍या फळे व भाजीपाला पिकांकरीता भौगोलिक चिन्हांकनाचा दर्जा मिळविण्याकरीता सन 2014-15 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) अंतर्गत राज्यातील 13 प्रमुख कृषी व फलोत्पादन पिकांचे भौगोलिक चिन्हांकन नोंदणीसाठी (जीआय) राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला. सदर योजनेमध्ये रत्नागिरीचा हापूस, लासलगावचा कांदा, जळगावची केळी, जळगावचे भरीत वांगे, सासवडचे अंजीर, सोलापूरचे डाळिंब, सांगलीची हळद, सांगलीचा बेदाणा, जालनाची मोसंबी, बीडचे सिताफळ, मराठवाड्याचा केशर आंबा वेंगुर्लेचे काजू, घोलवडेचे चिकू, यांचा समावेश आहे भौगोलिक चिन्हांकन नोंदणी करण्याचे काम मे. ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी (जीएमजीसी) पुणे या संस्थेला देण्यात आलेले आहे. जीआय नोंदणीसाठी निवड केलेल्या 13 पैकी 11 पिकांना भौगोलिक चिन्हांकन मानांकन/प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

भौगोलिक चिन्हांकन अंतर्गत नोंदणीचे फायदे खालीलप्रमाणे:

  • भौगोलिक क्षेत्राशी निगडीत मालास कायदेशीर संरक्षण प्राप्त होते.
  • भौगोलिक चिन्हांकन कायद्याखाली नोंदणी केल्याने इतरांनी त्याचा अनधिकृत वापर केल्यास त्यांना त्यापासून रोखता येते.
  • भौगोलिक चिन्हांकित मालास निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होतात. अशा नोंदणीकृत कृषी मालाचा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रॅण्ड विकसित होण्यास मदत होते.
  • व्यापारी चिन्हाला बाजारपेठेत जे महत्व असते तेच महत्व कृषी मालाच्या भौगोलिक चिन्हांकनास असते. त्यामुळे अशा नोंदणी केलेल्या उत्पादनाच्या उत्पादकाला जास्तीचे आर्थिक उत्पन्न मिळून त्याच्या उन्नतीस हातभार लागतो.

लेखक:
श्री. गोविंद हांडे

कृषी सेवारत्न
निवृत्त तंत्र अधिकारी, (आयात निर्यात कक्ष) 
कृषी आयुक्तालय, शिवाजीनगर, पुणे 
९४२३५७५९५६

Geographical Indication GI भौगोलिक चिन्हांकन TRIPS Trade Related Intellectual Property Right जागतिक व्यापार करार The Geographical Indication of Goods Intellectual Property Right बौद्धीक संपदा हक्क
English Summary: Importance of Geographical Indication for crop production

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.