Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी 40 दिवसांची मुदत देऊनही सरकारकडून आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील सध्या उपोषण करत असून मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले आहे. मराठा आंदोलक सत्ताधारी नेत्यांवर नाराज असून त्यांच्या विरोधात ठिकाठिकाणी आंदोलन करत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका वृत्तवाहिनीवर मुलाखत झाली.
या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले कि सरकार जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. सरकार जेवढ्या वेगाने सोडवणूक करता येईल तेवढा प्रयत्न करेल.आमचा प्रयत्न सुरू आहे. मीडियाच्या माईकसमोर संवाद होऊ शकत नाही. संवाद करायचं तर दहा माणसं बसवा. शंभर माणसं बसवा. माईक समोर संवाद होत नाही. चार गोष्टी तुम्ही सांगा, आम्हीही चार गोष्टी सांगू. आमचं त्यांना चर्चेचं नेहमीच आवाहन आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच आंदोलकांनी हिंसा करू नये. लोकशाहीत गावबंदी करणं योग्य नाही. प्रश्न सोडवण्याचं काम आम्हीच करत आहोत. त्यांचा प्रश्न सोडवणं हेच आमचं काम आहे. तेच आम्ही करत आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, त्यांच्या कानात बोळे घातले आहे का? मग मी काल काय म्हणालो होतो. तुम्ही चर्चेला या मराठे तुम्हाला अडवणार नाही. पण फक्त एकदाच चर्चा होणार. जोपर्यंत मला बोलता येत आहे, तोपर्यंत चर्चेसाठी या त्यानंतर येऊन काही फायदा नाही. आमचे मराठे तुम्हाला कुठेच अडवणार नाही. आरक्षण द्यायचे की नाही एकदाच येऊन सांगा, बाकीची वळवळ करायची नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.
Published on: 29 October 2023, 01:48 IST