यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी नैराश्यात असल्याने शेतकरी आत्महत्या करु लागले आहेत. पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्यात. हातचं पीक देखील उध्वस्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात गदाजी बोरी आणि म्हैसदौडका येथे दोन शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. यातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे.
गदाजी बोरी येथील महादेव बेंडे (वय ४८) या शेतकऱ्यांने रविवारी(दि.६) रोजी सायंकाळी विष प्राशन करुन जीवन संपवले. बेंडे यांची वर्धा नदीलगत शेती आहे. अतिवृष्टीने नदीला पूर येऊन पुराचे पाणी शिरल्याने जमीन खरडून गेली. तसंच शेती करण्यासाठी त्यांनी कर्ज घेऊन पीक लावले होते.
दरम्यान, म्हैसदोडका येथील युवा शेतकरी शुभम भाऊराव हेपट (वय २२) याने स्वतःच्या शेतात विष प्राशन केले. लगतच्या शेतातील शेतकऱ्यास ही बाब लक्षात येता त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Published on: 07 August 2023, 03:13 IST