मुंबई: औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे पाच जानेवारी रोजी शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून कार्यशाळेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे.
राज्यात सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या 1 हजार 700 शेतकरी उत्पादक कंपन्यांना यापुढे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने प्राधान्याने भूखंड वाटप करण्याचा निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतलेला आहे. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांची औद्योगिक चळवळ पुढे नेण्यासाठी सर्व कंपनीच्या प्रतिनिधींची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
सुखी महाराष्ट्र, समृद्ध शेतकरी ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी उद्योग विभागाने राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी कंपन्यांसाठी एमआयडीसीमध्ये प्राधान्याने भूखंड दिला जाणार आहे. यापूर्वी शेतकरी कंपनी स्थापन करण्यासाठी शंभर कोटीपर्यंतची भांडवल मर्यादा आता दहा कोटीपर्यंत खाली आणली आहे. यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र येऊन विविध उद्योग सुरू करतील. शेतकरी कंपन्या सुरू झाल्यास शेतमालावर प्रक्रिया होऊन मूल्यवृद्धी होणार आहे.
Published on: 03 January 2019, 08:28 IST