उन्नत भारत अभियानात सहभागी होऊन आदर्श ग्राम निर्मितीसाठी अग्रेसर व्हा :- डॉ राजेंद्र गाडेउन्नत भारत अभियाना अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे गोरव्हा गावाची निवड करण्यात आली आहे व उद्योगशील आदर्श ग्रामविकासाचा आराखडा सुद्धा तयार झाला असून आता जिल्ह्यातील सर्वच शासकीय निमशासकीय सहकारी व इतर खाजगी संस्थांचे सहयोगातून प्रत्यक्ष ग्रामविकासाचे कामाला सुरुवात होत सर्वार्थाने उद्योगशील ग्राम निर्मितीच्या कार्यात सर्वांचा सहभाग अपेक्षित असल्याचे विश्वासदर्शक प्रतिपादन गोरव्हा ग्रामपंचायतचे सरपंच श्री राजेश खांबलकर यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विस्तार शिक्षण संचालनालय तथा कृषी विज्ञान केंद्र, अकोला यांचे संयुक्त विद्यमातून आयोजित कृषी दिन तथा कृषी संजीवनी सप्ताहाचे समारोपीय कार्यक्रमाचे प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
उन्नत भारत अभियानाचे माध्यमातून गावातील प्रत्येक घराला व घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हाताला उपलब्ध संसाधनांचा, कौशल्याचा आणि ज्ञानाचा यथायोग्य वापर करत उद्योगशील बनविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच विभागांचे सहयोगातून एकात्मिक प्रयत्नांची मोट बांधत उद्योगशील आदर्श ग्राम निर्मितीचे उद्दिष्ट गाठण्याचा संकल्प देखील श्री खांबलकर यांनी आपले मनोगतात व्यक्त केला. तर वैदर्भय शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न करण्यासाठी कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे मार्गदर्शनात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन व विस्तार विभागाचे माध्यमातून काल सुसंगत कार्य सुरू असून शेतकरी बांधवांनी विद्यापीठ तंत्रज्ञानाचा अवलंब करीत फायद्याची शेती करावी तथा उन्नत भारत अभियानाचे माध्यमातून आपल्या गावाला स्वयंपूर्ण करण्यासाठी विद्यापीठाशी संपर्क करण्याचे आवाहन संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेंद्र गाडे, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई,
कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. चारुदत्त ठिपसे, उन्नत भारत अभियानाचे विद्यापीठ समन्वयक डॉ. किशोर बिडवे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. उमेश चिंचमलातपुरे, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. प्रकाश घाटोळ यांचे सह माजी पंचायत समिती सदस्य श्री प्रभाकर खांबलकर, प्रगतिशील श्री सुरेश खांबलकर, श्री अरुण मानतकर, ग्रामपंचायत सदस्य श्री संदीप राठोड, गृह विज्ञान विभागाच्या प्रा. कीर्ती देशमुख, ग्रामसेवक श्री. भारत भोबळे आदिची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर अतिशय सहजतेने समजून सांगितला व शेतीमधील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यापीठाची सक्षम साथ असल्याचे सुद्धा आपले संबोधनात सांगितले. तर अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई यांनी शेतकरी बांधवांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत फळे व भाजीपाला उत्पादन तथा
प्रक्रिया तंत्रज्ञान साध्या सोप्या भाषेत उपस्थितांना अवगत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा उन्नत भारत अभियानाचे विद्यापीठ समन्वयक डॉ. किशोर बिडवे यांनी केले तर कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.चारुदत्त ठिपसे यांनी उपस्थित यांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाकरिता गोरव्हा गावातील शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत परिसरात आयोजित कार्यक्रमानंतर संपन्न झालेल्या शिवार फेरीत डॉ. विलास खर्चे, डॉ. राजेंद्र गाडे, डॉ. देवानंद पंचभाई, डॉ. चारोदत्त टिपसे, डॉ. उमेश चिंचमलातपुरे, डॉ. प्रकाश घाटोळ, डॉ. किशोर बिडवे, श्रीमती कीर्ती देशमुख यांनी शेतकरी बांधवांच्या शेती विषयक समस्यांचे शेतीच्या बांधावर निराकरण केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ.राजेंद्र गाडे यांचे मार्गदर्शनात विस्तार शिक्षण संचालनालयातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले.
Published on: 03 July 2022, 07:40 IST