मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2018 चे तिसरे (हिवाळी) अधिवेशन येत्या 19 नोव्हेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी दिली. विधानभवन येथे विधानसभा व विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
अधिवेशनाचे कामकाज 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून या काळात विधानसभेत प्रलंबित असलेली आठ विधेयके मांडण्यात येणार आहेत. तर विधानपरिषदेची दोन प्रलंबित विधेयके मांडण्यात येणार आहेत. अधिवेशनात दुष्काळावरची महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे श्री. बापट यांनी सांगितले, आवश्यकता भासल्यास सुट्टीच्या दिवशी कामकाज चालू ठेवण्यात येईल तसेच अंतिम आठवड्यात कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन अधिवेशनाचे दिवस वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम) एकनाथ शिंदे, राज्यमंत्री सर्वश्री विजय शिवतारे, डॉ. रणजित पाटील, आमदार सर्वश्री एकनाथ खडसे, गणपतराव देशमुख, जयंत पाटील, राज पुरोहित, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे उपस्थित होते. विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे, डॉ. रणजित पाटील, आमदार भाई गिरकर, भाई जगताप आदींसह विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे उपस्थित होते.
Published on: 02 November 2018, 06:34 IST