नवी दिल्ली
भारतात निर्माण झालेला गव्हाचा तुटवडा भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्र सरकार रशियाकडून गहू आयात करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे देशात गव्हाचा साठा वाढून गव्हाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकार सरकारी सौद्यांद्वारे रशियाकडून ९ दशलक्ष टन गहू आयात करण्याचा विचार करत आहे. भारतीय ग्राहक घाऊक गव्हाची किंमत बुधवारी ६.२ टक्क्यांनी वाढून २४८० रुपये प्रति क्विंटल वरून २६३३ झाली आहे. तसंच गव्हाची आयात करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा देखील सुरु झाल्या आहेत.
देशात आयातीचे नियोजन केले जात आहे कारण देशांतर्गत उत्पादनात तुटवडा निर्माण होण्याची चिंता आहे, त्यामुळे खुल्या बाजारात धान्य व्यापाऱ्यांनी गहू विकल्यामुळे भाव वाढत आहेत. त्यामुळे हे दर कमी करण्यासाठी केंद्राने स्टॉकमधील गहू देखील बाजारात आणला आहे.
रेटिंग एजन्सी क्रिसिलने एका अहवालात म्हटले आहे की, गहू, तांदूळ आणि भरड धान्यांच्या महागाईचा दर गेल्या सहा महिन्यांत दुहेरी अंकात दिसला पोहचला आहे. कमी उत्पादन, घटणारा साठा आणि वाढती मागणी यामुळे ही वाढ झाली आहे.
Published on: 04 August 2023, 12:54 IST