देशातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ समजली जाणाऱ्या नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेत कांद्याचा दर 1 ते 2 हजार 800 रुपयांदरम्यान राहिला. कांद्याचे दर सातत्यने वाढत आहेत. गतवर्षी या काळात कांद्याचा दर 1450 रुपये क्विंटलच्या दरम्यान होता. सध्या उन्हाळी कांदा बाजार समित्यांमध्ये येत आहे. तरी देखील कांद्याचे दर कमी होत नसल्याचे चित्र आहे. किरकोळ बाजारात कांदा 50 रुपये किलोने विकला जातो.
कांदा बाजारपेठांमधील दर
ऑनलाईन मार्केट म्हणजेच ई-नाम नुसार राज्यातील लोणंदमध्ये 1 मार्चला कांद्याचा दर 3600 रुपये क्विंटल होता. तर पंढरपूरमध्ये कांद्याचा दर 3200 रुपये इतका होता. तर दोन्ही बाजारपेठांमध्ये कांद्याचा कमाल दर 4 हजार रुपये क्विंटल राहिला. महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे यांनी गेल्या वर्षाच्या तलनेत कांद्याची आवक निम्मी असल्याचं सांगितलं. त्यामुळे कांद्याचे दर वाढल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांचे नुकसान होईल
भारत दिघोळे यांनी सांगितल्यानुसार महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं मोठं नुकसान झाले आहे. एका एकरामध्ये 120 क्विंटल कांद्याचं उत्पादन होतं त्यापैकी 45 क्विंटल कांदा खराब झाला. तो कांदा शेतामध्येच फेकून द्यावा लागला. एवढं संकट सोसून शेतकऱ्यांनी कांदा बाजारपेठेत आणला आहे. त्याला कमी दर मिळाला तर त्यांचं नुकसान होईल. त्यामुळे सध्या मिळत असलेल्या भाव कायम राहावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.
कांद्याच्या लागवड खर्च किती?
राष्ट्रीय हॉर्टिकल्चर बोर्डाच्या 2017 च्या अहवालानुसार शेतकऱ्यांना एक किलो कांदा उत्पादित करण्यासाठी 9.34 रुपयांचा खर्च येतो. भारत दिघोळे यांनी सांगितल्यानुसार लाल कांद्याला 24 ते 30 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो. रब्बी हंगामामध्ये सरासरी 18 ते व24 रुपये दर मिळतोय. दर अवकाळी पावसामुळे कांद्याचं नुकसान झालं नसतं तर कांद्याचा भाव 8 ते 14 रुपयांदरम्यान राहतो. सध्या कांद्याला चांगला दर मिळतोय मात्र नाशिक, पुणे,धुळे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालयं. जानेवारी महिन्यातील 7 ते 10 तारखेदरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
Published on: 06 March 2021, 12:06 IST