शेतीमध्ये ज्या पद्धतीने पाणी एक अविभाज्य घटक आहे अगदी त्याच पद्धतीने शेतीची पूर्व मशागत करणे हा देखील एक अविभाज्य घटकच आहे. मात्र जर आपणास कोणी नांगरटीविना शेती शक्य आहे असे जर सांगितले तर आपला कदाचित विश्वास बसणार नाही.
परंतु नगर जिल्ह्यात असा एक शेतकरी आहे जो सलग पाच वर्षांपासून विना नांगरणीची शेती करत आहे. अकोले तालुक्याच्या मौजे धामणवन येथील संतोष बारामते या शेतकऱ्याने जवळपास आता पाच वर्ष उलटत आले तरी देखील शेतीची नांगरणी केलेली नाही. तुम्ही म्हणाला शेतीची नांगरणी केली नाही अर्थात पिकाची लागवडही केली नसेल तर तसे मुळीच नाही या अवलिया शेतकऱ्याने विना नांगरणी शेतात पिकांची लागवड केली आणि भरघोस उत्पादन देखील मिळवले.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, संतोष शेतीची नांगरणी करत नाही मात्र त्यांच्या शेतीत असलेले गांडुळ नांगरणी सारखेकाम करतात म्हणजेच जमीन भुसभुशीत करत असतात. गांडूळ जमीन भुसभुशीत करत असल्याने शेतीची पूर्वमशागत होत नसली तरी देखील हा शेतकरी शेती मधून चांगले उत्पादन मिळवत आहे.
खर पाहता, धामणवन हे अतिशय दुर्गम भागात वसलेले एक छोटेसे गाव आहे. या परिसरात हवी तशी पाण्याची व्यवस्था देखील नाही. यामुळे शेतकरी संतोष यांनी आपल्या तब्बल तीन एकर क्षेत्रावर शेततळ्याची सोय करून घेतली आहे.
आता त्यांच्याकडे पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्याने ते मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पद्धतीने पिकांची लागवड करीत आहेत. शेतीमध्ये दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढू लागला आहे विशेषता मशागतीसाठी खूप अधिक पैसा शेतकऱ्यांना मोजावा लागतो.
संतोषी यांना देखील मशागतीसाठी अधिक पैसा खर्च करावा लागत होता. यामुळे ते मशागतीसाठी वाढत असलेल्या खर्चाला कंटाळून मशागत टाळता येईल का यावर उपाय शोधत होते. अखेर त्यांना कृषी विभागाकडून मशागत टाळता येऊ शकते असे समजले व त्यांना कृषी विभागातून यासाठी गांडूळ शेतीची कल्पना देण्यात आली.
मशागत टाळता यावी म्हणून संतोष यांनी 2017 मध्ये अकोला येथून गांडूळ बीज आणले आणि चार महिने प्लास्टिकच्या ड्रममध्ये वाढवले. यामुळे गांडुळांची संख्या वाढली शिवाय गांडूळबीज देखील तयार झाले.
गांडूळ बीज तयार झाल्यानंतर त्यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावर गांडूळ बीज सोडले. तेव्हापासून ते आजतागायत संतोष यांनी कधीच जमिनीची नांगरणी केलेली नाही. त्यांनी तेव्हापासून अनेक भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करून चांगले भरघोस उत्पादन मिळवले आहे. संतोष सांगतात की, ते अजून पंधरा वर्षे आपल्या शेतात नांगरणी करणार नाहीत. निश्चितच संतोष यांनी केलेला हा नावीन्यपूर्ण प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे.
Published on: 05 April 2022, 10:59 IST