सोमिनाथ घोळवे,
गावरान काटेरी भेंडी गेल्या रविवारी नेकनूरच्या बाजारात मिळाली. आम्ही घरी शेताच्या बांधावर लावली आहे, मात्र तीला अजूनही भेंडी आलेली नाही. म्हणून बाजारात गावरान काटेरी भेंडी दिसली आणि मी ती लगेच विकत घेतली. चालू वर्षी पाऊस कमी असल्याचा अनेक पिकांवर परिणाम झालेला आहे, त्यास गावरान भेंडीचा आपवाद नाही. संकरित आणि बाजार केंद्रित बियाणे -वाण उपलब्ध झाल्याने, गावरान भेंडीचे वाण हळूहळू दुर्मिळ होत चालले आहे. ग्रामीण भागातही केवळ दिवाळीनंतर पीक येते. २५ ते ३० वर्षांपूर्वी आजी पारस बागेतील कानाकोपऱ्यात भेंडी लावत होती.
तसेच तूर, शेंद्री, भुईमूग व इतर पिके पेरली असता, त्यामुळे मूठभर गावरान भेंडीचे बी टाकले, तर आम्हाला पूर्ण हिवाळाभर भेंडी खाण्यास मिळत होती. पण ही पिके घेणे कमी झाले आणि भेंडी गायब झाली. आता केवळ शेताच्या बांधावर भेंडी लावली जाते. या माध्यमातून काही मोजक्याच शेतकरी कुटुंबाने या भेंडीचे वाण जतन करून ठेवलेले दिसून येते. रोगराईचा गावरान भेंडीवर फारसा परिणाम होत नाही. पावसाळी हंगामात खरीपाच्या पेरणीत लागवड केली, तर पाच महिन्यानंतर (हिवाळ्यात) पीक हाती येण्यास सुरुवात होते.
संकरित भेंडीला अतिशय लवकर पीक येण्यास सुरुवात होते. तसेच उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर असते. एकंदर व्यापारी अर्थकारण भेंडीशी जोडले गेले. एक नगदी पीक म्हणूनच संकरित भेंडीकडे मान्यता आहे. अलीकडे भेंडीच्या करार शेतीतून मूल्यसाखळी निर्माण केली आहे. यातून दुबईला मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्यात येते. मात्र गावरान भेंडीची अतिशय चवदार आहे. ती संकरित भेंडीमध्ये मिळत नाही. शहरांमध्ये विक्रीसाठी येत नाही. अलीकडे आपल्याला केवळ संकरित भेंडी बाजारात मिळते.
गावरान भेंडीमध्ये अनेकप्रकारचे पौष्टीक तत्व आणि प्रोटीन असल्याकारणाने आरोग्यासाठी फार फायदेशीर राहते. भेंडीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फास्फोरस, आयर्न, मॅग्नेशिअण, पोटॅशिअम, सोडियम आणि कॉपर आढळतात. यात भरपूर प्रमाणात फायबर आढळतं. तसेच गावरान भेंडी खाण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. त्यात वजन कमी करण्यासाठी भेंडीमध्ये कॅलरी कमी असतात, १०० ग्रॅम भेंडीमध्ये केवळ ३३ कॅलरी असतात.
हृदयरोगांपासून बचाव करणे, डायबिटीज कंट्रोल,इम्यूनिटी मजबूत करणे,गर्भवती महिलांसाठी चांगली, मेंदूसाठी फायदेशीर, कॅन्सर रोखण्यासाठीही मदत होते. पण यावर सखोल संशोधन होणे आवश्यक आहे. हे गावरान वाण जास्त उत्पादन देत नसले तरीही त्याचे जतन करून आहारात ठेवणे अवश्यक आहे. भेंडीचा इतिहास तपासला तर भेंडीची उत्पत्ती अॅबिसिनियन केंद्रातून झाली आहे, एक क्षेत्र ज्यामध्ये इथिओपिया, इरिट्रियाचा एक भाग आणि अँग्लो-इजिप्शियन सुदानचा पूर्व, उच्च भाग समाविष्ट आहे . सातव्या शतकात हे पीक इजिप्तमध्ये घेतले असावे. त्यानंतर भेंडी परकीयांकडून ८ व्या शतकात भारतात आले असावे असा अंदाज आहे.
(लेखक शेती , दुष्काळ , ऊसतोड मजुर प्रश्नांचे अभ्यासक असून 'द युनिक फाऊंडेशन, पुणे' येथे वरिष्ठ संशोधक आहेत.)
ई-मेल - sominath.gholwe@gmail.com
Published on: 02 December 2023, 06:00 IST